हिंदु महिलांवर बलात्कार, धर्मांतर, तसेच हिंदूंना गावातून हाकलून लावणे यांसारख्या घटनांची ‘एस्.आय.टी.’कडून चौकशी करण्याची मागणी
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना तेथे हिंदू असुरक्षित असणे, अपेक्षित नाही ! तेथील हिंदूंची दुःस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या रक्षणार्थ भाजप सरकारने पावले उचलावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
मेवात (हरियाणा) : हरियाणाच्या नूह जिल्ह्यातील मुसलमान समुदायाने त्या भागातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले असल्याचा दावा करत सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. तसेच या घटनांची विशेष अन्वेषण पथकाकडून (एस्.आय.टी.कडून) चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हिंदु अधिवक्ता आणि कार्यकर्ते यांच्या गटाने अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्या माध्यमातून प्रविष्ट केलेल्या याचिकेत म्हटले आहे की,
१. नूह जिल्ह्यातील हिंदूंचे जीवन, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि धार्मिक हक्क हे मुसलमान समाज, राज्यशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून संपवले जात आहेत.
२. कायद्यानुसार पोलिसांना देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करण्यात स्थानिक पोलीस अपयशी ठरले आहेत आणि यामुळे प्रत्येक हिंदूचे जीवन अन् स्वातंत्र्य धोक्यात आले आहे.
३. तबलिगी जमातचे सदस्य असलेल्या मुसलमानांनी त्यांची शक्ती हळूहळू वाढवली आहे आणि आता अशी स्थिती आहे की, हिंदु लोकसंख्या न्यून होत आहे अन् वर्ष २०११ च्या जनगणनेपासून हिंदू २० टक्क्यांवरून आता १० – ११ टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत.
४. अनेक हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर झाले आहे. मोठ्या प्रमाणावर हिंदु महिला आणि अल्पवयीन मुली यांचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले आहेत. हिंदु महिला सुरक्षित नाहीत. मुसलमान समाजातील लोकांनी मोठ्या संख्येने अनुसूचित जातीच्या सदस्यांवर अत्याचार केले आहेत.
५. मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हे केल्याविषयी हिंदूंनी प्रविष्ट केलेले वेगवेगळे एफ्.आय.आर्. आणि तक्रारी यांमधील तथ्य घोषित करण्यात हरियाणा राज्य अपयशी ठरले आहे. एफ्.आय.आर्. आणि तक्रारी यांवर कोणतीही कारवाई करणे तर दूरच राहिले.
मेवातमध्ये देशद्रोही घटक मोठ्या प्रमाणात सक्रीय आहेत, असे सांगून याचिकाकर्त्यांनी असा दावा केला आहे की, राज्यशासन मेवात-नूह येथे रहाणार्या नागरिकांच्या परिस्थितीकडे लक्ष देण्यास रस घेत नाही आणि हिंदू हे पशूंचे जीवन जगत आहेत.
६. सर्वोच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधिशांद्वारे देखरेख ठेवण्यात यावी, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) यांचे सदस्य असलेल्या विशेष अन्वेषण पथकाची (एस्.आय.टी.ची) स्थापना करून तिच्याकडून हिंदु महिलांवरील आणि अल्पवयीन मुलींवरील बलात्कार, सक्तीने धर्मांतर आणि मालमत्तेवर अवैध अतिक्रमण करण्याचे पैलू जाणून घ्यावेत, अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे. गेल्या १० वर्षांत हिंदूंकडून बलपूर्वक केलेले सर्व विक्रीकरार रहित करण्याची विनंतीही न्यायालयाला करण्यात आली आहे.
चौकशी समितीच्या अहवालाचा आधार घेत याचिका !
हिंदूंच्या स्थितीचे निरीक्षण करण्यासाठी स्थापन केलेल्या ४ सदस्यांच्या चौकशी समितीने ३१ मे २०२० या दिवशी दिलेल्या अहवालाचा आधार या याचिकाकर्त्यांनी घेतला आहे. या भागात चौकशी समितीने अनेक ग्रामस्थांचे जबाब घेतले आणि त्यांच्या अहवालाची एक प्रत हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना दिली. मेवात आणि नूह येथे जवळपास ४३१ गावे आहेत, त्यापैकी १०३ गावे पूर्णपणे मुसलमानबहुल झाली आहेत. ८२ गावांत केवळ ४ – ५ हिंदु कुटुंबे शिल्लक आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात