Menu Close

मेवाती हिंदूंना वाली कोण ?

काही दिवसांपूर्वी हरियाणात निकिता तोमर या हिंदु तरुणीची तौसिफने गोळ्या झाडून हत्या केली. तौसिफने २ वर्षांपूर्वीही निकिताचे अपहरण केले होते आणि तिच्यावर धर्मांतरासाठी बळजोरी करत होता. हे प्रकरण लव्ह जिहादचे आहेच; मात्र त्याही पुढे या प्रकरणाची पाळेमुळे पुष्कळ दूरवर पसरली आहेत. तौसिफ हा मेवातचा आहे, तसेच तो मेवात येथील काँग्रेसचे आमदार आफताब अहमद यांचा नातेवाईक आहे. मेवात गेल्या काही वर्षांपासून हिंदु महिलांवर सामूहिक बलात्कार, त्यांचे धर्मांतर आणि अपहरण करणे यांसाठी चर्चेत आहे. हे सर्व अत्याचार मेवातमधील धर्मांधांनीच केले आहेत. विशेष म्हणजे या धर्मांधांच्या अत्याचारांना बळी पडलेल्या सर्व मुली या १४ ते १८ या वयोगटांतीलच आहेत. काही मुलींना अनेक दिवस डांबून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत, त्यांपैकी काही मुलींनी आत्महत्या केल्या आहेत.

मेवात येथे शाळांमध्ये हिंदु मुलांना नमाज पढणे, धर्मांतर करण्यास दबाव टाकणे असे प्रकार होत असल्याची धक्कादायक बातमी ३ वर्षांपूर्वी उघडकीस आली होती. वर्ष २०१८ मध्ये मेवातमधून अल-कायदाच्या २ जणांना अटक करण्यात आली होती. मे २०२० मध्ये महंत रामदास यांच्यावर धर्मांधांकडून आक्रमण करण्यात आले होते. येथे गोतस्करांचेही मोठे जाळे आहे. मेवातच्या नूंह येथून २ सहस्र ५७२ गाईंची कातडी येथील घरे आणि गोदाम यांमध्ये लपवलेली पोलिसांनी घातलेल्या धाडीत सापडली. पोलिसांवर अधूनमधून आक्रमणे होण्याच्या घटना घडत असतात. येथील पोलिसांनी न्यायालयात शपथपत्र सादर केले आहे की, कामावर असतांना त्यांचा जीव धोक्यात असतो. मेवात गुडगाव या आधुनिक शहरापासून केवळ ६० किलोमीटर अंतरावर असूनही ते मागास राहिले आहे. येथे सरकारने मोठा निधी व्यय करूनही त्याचा काही उपयोग झालेला नाही.

मेवातमध्ये ७९ टक्के मुसलमान लोकसंख्या आहे. मेवाती किंवा मेऊ मुसलमानांचे हे गाव आहे. त्यांचा पूर्वज दर्याखान याने शशी बदानी मीना या हिंदु मुलीशी लग्न करून तिचे धर्मांतर केले होते. या लग्नात हिंदु मीना समाज आणि मुसलमान मेऊ यांच्यात लढाई झाली होती. ज्यात मुसलमान जिंकले होते. ही कथा येथे पारंपरिक प्रेमकहाणी म्हणून सांगितली जाते. या कथेचा हिंदु मुलींचे धर्मांतर करण्यासाठी प्रेरक कथा म्हणून वापर होतो.

मेवाती धर्मांधांचा इतिहास

स्वातंत्र्यपूर्व काळाचा मेवाती धर्मांधांचा इतिहास पाहिला, तर ते लूटमार, अपहरण यांसाठी कुप्रसिद्ध होते. वर्ष १८७१ मध्ये तत्कालीन भारत सरकारने मेऊ यांना ‘गुन्हेगार जमात’  म्हणून घोषित करून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले. वर्ष १९४७ मध्ये मेवात अलवर येथील महाराजांच्या अधिपत्याखाली होता. त्यांनी भारतात विलीन होण्याचे ठरवले होते; मात्र मेवाती ज्यांना पाकमध्ये जायचे होते, त्यांनी बंड करून हत्या, लूटमार, बलात्कार आणि अपहरण यांना प्रारंभ केला. हिंदु मंदिरांवर आक्रमण करण्यात आले. त्यांनी स्वतंत्र ‘मेऊस्तान’ची घोषणा केली. तिजारा येथील श्रीमंत हिंदूंचे मेऊंनी हत्याकांड घडवले. हे पाहून अलवरच्या महाराजांनी मेऊंविरुद्ध मोहीमच चालू केली आणि तेव्हा त्यांनी पलायन करून सीमाभागामध्ये आश्रय घेतला. तसेच त्यांच्यावर अत्याचार होत असल्याची खोटी ओरड गांधी, नेहरू, जिन्हा यांच्याकडे केली. हिंदूंनीही मेऊंना प्रतिकार केला. त्यामुळे काहींनी पाकमध्ये जाऊन आश्रय घेतला. या गोष्टीकडे काँग्रेसचे लक्ष गेले आणि गांधींनी ‘गुन्हेगाराला शिक्षा नको त्याच्यात सुधारणा घडवली पाहिजे’, असे सांगितले. नेहरूंचे उजवे हात गोपालस्वामी अय्यंगार यांनी अलवरच्या प्रमुखाला सर्व मेऊंना भारतात परत बोलावण्याची मागणी केली. तेव्हा तत्कालीन प्रमुखांनी ‘मेऊ हे कायदा-सुव्यवस्था जुमानत नाहीत, गुन्हे करतात’, असे सांगितले. अलवरच्या प्रमुखांची ही भूमिका काँग्रेसला आवडली नाही आणि त्यांनी अलवरच्या महाराजांना धमकावणे चालू केले. सैन्य कारवाईची धमकी देण्यात आली. गांधींनी मेऊंना पुन्हा आणण्यासाठी दबाव आणला. परिणामस्वरूप पाकमध्ये पळून गेलेले मेऊ पुन्हा भारतात परत आले. हे मेवाती आजही गांधींची स्तुती करतात. म्हणजे एका गुन्हेगार समाजाला पुन्हा आश्रय दिला असे झाले. याविषयी ‘ट्रू इंडॉलॉजी’ या ‘ट्विटर हँडल’वर पुरावेही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. मेवातींचा इतिहास पाहिला, तर मेवातला आज ‘मिनी पाकिस्तान’ का म्हणतात, हेसुद्धा लक्षात येईल. हिंदूंवरील अत्याचार आजतागायत चालू असल्यामुळे मेवात येथून अनेक हिंदु कुटुंबांनी पलायन करून आसपासच्या गावांमध्ये आश्रय घेतला आहे, तसेच काहीजण पळून जाण्याच्या मार्गावर आहेत.

मेवातींसाठी आशेचा किरण

बहुसंख्य हिंदूंच्या भारतात एखाद्या भागात हिंदूंवर एवढी दशके अत्याचार होत असणे, हे निश्‍चितच चीड आणणारे आहे. अन्य देशांमध्ये असे कधी झाले असते का ? भारतावर ५० हून अधिक वर्षे राज्य करणारी हिंदुद्वेष्टी काँग्रेसच हिंदूंच्या या दु:स्थितीला उत्तरदायी आहे. हिंदू-मुसलमान ऐक्याचे गाजर दाखवायचे, हिंदूंनी इतर धर्मियांशी रोटी-बेटीचा व्यवहार करायचा आणि हिंदूंवर अत्याचार झाले, तर धार्मिक गोष्ट म्हणून नव्हे, तर घरगुती वाद, भूमीचा वाद इत्यादी ‘लेबल’ लावून त्याकडे कानाडोळा करणे केले आहे.  काश्मीर येथे झालेला हिंदूंचा वंशविच्छेद आणि हिंदूंच्या विस्थापनाच्या वेळीही काँग्रेस निष्क्रीय राहिली. राजकीय पक्ष निष्क्रीय राहिले, तरी हिंदु समाज निष्क्रीय राहू शकत नाही. याविषयी ‘सुदर्शन न्यूज’ वाहिनीने चांगले वार्तांकन करून मेवातला प्रकाशझोतात आणले होते. श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी कायदेशीर लढाई लढणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी मेवात येथील हिंदूंवरील अत्याचारांची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण पथकाची स्थापना करण्यासाठी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहेत. हिंदु संघटना आणि सामाजिक प्रसारमाध्यमे हा विषय उचलून धरत आहे. या सर्वांच्या दबावामुळे आणि जनजागृतीमुळे हिंदूंची नोंद घेणे सरकारला भाग पडेल, अशी अपेक्षा करूया !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *