धर्मनिरपेक्ष असलेल्या भारत देशात मुसलमान पुष्कळ सुरक्षित असतात; पण अन्य देशांमध्ये हिंदू तितके सुरक्षित असतात का ? याचे उत्तर खेदाने ‘नाही’ असेच म्हणावे लागेल. अन्य देशांतील हिंदू सुरक्षित तर नाहीच, उलट हालअपेष्टा, अन्याय आणि अत्याचार यांनीच पीडित आहेत. त्यातही ‘मुसलमानबहुल राष्ट्रे म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान येथील हिंदूंचे जीवन तर संकटग्रस्तच असते’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. धर्माच्या नावावर वेगळ्या झालेल्या या राष्ट्रांमध्येच आज अधर्म उफाळून येत आहे. त्यामुळे तेथील हिंदूंसमवेत निरपराध असणार्या अल्पसंख्य हिंदु विद्यार्थ्यांनाही कट्टरतावादी मुसलमानांकडून होणार्या अत्याचारांचा सामना करावा लागतो. हे सर्व त्यांच्यासाठी जणू नित्याचेच झाले आहे. बांगलादेशातील हिंदु विद्यार्थी आज ईशनिंदेच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धर्मांधांच्या षड्यंत्राची शिकार होत आहेत. यात त्यांना अटकही केली जात आहे. धर्मांध हे हिंदु विद्यार्थ्यांचे फेसबूक खाते ‘हॅक’ करतात आणि त्यावरून इस्लामविरोधात निंदनीय गोष्टी प्रसारित करतात. त्यांचा ‘स्क्रीनशॉट’ मुसलमान विद्यार्थ्यांना, तसेच कट्टरतावाद्यांना पाठवतात. अशा प्रकारे ईशनिंदा केल्याप्रकरणी विद्यापीठ प्राधिकरणाकडून तो विद्यार्थी निलंबित होतो. त्याच्यावर गुन्हा नोंदवला जाऊन पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत आयुष्य काढण्याची वेळ ओढवते. आज अनेक विद्यार्थी ही शिक्षा भोगत आहेत. ही काही एकच घटना नव्हे ! बांगलादेशमध्ये याआधीही असे प्रकार झालेले आहेत. बांगलादेशात इसिसच्या आतंकवाद्यांनी एका हिंदु शिंप्याची हत्या केली होती. का ? तर म्हणे त्याने ईशनिंदा केली. हिंदु शिंपी म्हणाला होता, ‘‘तुमचा प्रेषित आणि आमचा श्रीकृष्ण दोघांनीही एकच शिकवण दिली आहे.’’ प्रेषिताची तुलना काफिराने त्याच्या देवाशी केली; म्हणून म्हणे ती ईशनिंदा ठरली. या आरोपानंतर हिंदु शिंप्याचे आयुष्यच संपले. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांच्या विरोधात अतिशय सहजसोपे असलेले हत्यार म्हणजे ईशनिंदा कायदा. या कायद्यामुळे ११ वर्षीय अल्पसंख्य मुलीलाही कारवाईला सामोरे जावे लागले. ती लहानगी अन्न शिजवण्यासाठी चुलीत कागद टाकत होती. त्या कागदांमध्ये म्हणे कुराणाचे एक पान होते; मात्र ते तिला समजलेच नाही. तिने अन्य कागदांप्रमाणे तो कागदही चुलीत टाकला. ज्याने कुणी ते पाहिले, त्याने तिच्यावर खटला भरला. ईशनिंदा म्हणजे काय, हे कळूही न शकणारा तो निष्पाप जीव ! काही वर्षांपूर्वी फेसबूकवरून इस्लामचा अवमान केला गेल्याचे सांगत बांगलादेशमध्ये १५ हिंदु मंदिरांची तोडफोड करण्यात आली. ही आणि अशी अनेक उदाहरणे देता येतील. गेल्या अनेक दशकांपासून कट्टरपंथियांकडून ईशनिंदा कायद्याचा सर्वाधिक दुरुपयोग करण्यात येत आहे. यातूनच प्रत्येक वेळी हिंसक कृती होऊन धार्मिक विद्वेष पसरतो किंवा धार्मिक उन्माद घडतो. हे वेळीच थांबवायला हवे.
वरील सर्व उदाहरणे पहाता मुसलमानबहुल राष्ट्रांमधील कट्टरपंथियांकडून अल्पसंख्यांकांच्या विरोधात वापरले जाणारे सहजसोपे हत्यार म्हणजे ईशनिंदा केल्याचे खापर त्यांच्यावर फोडणे. ‘आमचा देव आणि आमचे धर्मगुरु यांच्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही’, ‘कुणालाही तसे दाखवण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही’, ‘कुणालाही त्यांच्यावर टीका-टिप्पणी करण्याचा अधिकार नाही’, अशीच कट्टरपंथियांची मानसिकता असते. यातूनच अल्पसंख्यांकांच्या विरोधात षड्यंत्रे रचली जाऊन त्यांचा छळ केला जातो आणि काही वेळा हिंसेची परिसीमा गाठून त्यांच्या मृत्यूलाच जणू निमंत्रण दिले जाते. कट्टरपंथियांच्या समर्थकांकडून त्यांचे धर्म आणि पंथ यांवरील प्रेमाचा उदोउदो केला जातो. असे आहे, तर स्वधर्मावरील अल्पसंख्यांकांचे प्रेम काय खोटे आहे का ? धर्मावरील प्रेमात भेदभाव करण्याचा अधिकार कुणालाही नाही, हे अशांनी लक्षात घ्यावे !
हिंदू आणि सरकार यांची भूमिका
अन्य राष्ट्रांमध्ये स्वधर्म किंवा श्रद्धास्थाने यांचा अवमान जराही सहन केला जात नाही. याउलट भारतात मात्र विविध माध्यमांतून हिंदूंच्या देवतांचे विडंबन केले जाते. त्याविरोधात कुणीही आवाज उठवत नाही. का ? तर भारत ‘धर्मनिरपेक्ष’ आहे. भारतात प्रतिदिन धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमणे होतात, हिंदूंच्या मुलींना लव्ह जिहादमध्ये फसवले जाते; मात्र त्यांच्यावरही कारवाई होत नाही. ‘धर्मनिरपेक्ष’ भारतात याहून वेगळे काय होणार ? या सगळ्याला हिंदूंचा निद्रिस्तपणा कारणीभूत आहे. ही निद्रिस्तता दूर व्हावी, यासाठी भारतातील हिंदूंना धर्माचरण करण्यासह धर्मशिक्षण घ्यावेच लागेल. त्याविना पर्याय नाही. ‘धर्म’ हा राष्ट्राचा पाया आहे. तो डळमळीत होता कामा नये.
‘भारतात अन्य धर्म, पंथ, जात, भाषा या सर्वांचा आदर करा’, असे सांगितले जाते. समता, बंधुता ही तत्त्वे शिकवली जातात. यामुळे हिंदूबहुल भारतात अल्पसंख्य समाज गुण्यागोविंदाने राहू शकतो; मात्र मुसलमानबहुल राष्ट्रांमध्ये हिंदूंनी काहीही केले नाही, तरी ते केवळ ‘हिंदु’ असल्याने त्यांच्यावर अन्याय-अत्याचार होतात. हे वास्तव नाकारून चालणार नाही. भारत सरकार अशा घटनांच्या विरोधात राष्ट्रीयत्वाची भूमिका घेऊन कधी आवाज उठवणार ? त्यांचे दुःख, वेदना, अन्याय दूर करणे हे आपले नैतिक दायित्व नाही का ? बांगलादेशातील वरील घटना पहाता आतातरी भारताने अखंड सतर्क राहून इस्लामी राष्ट्रांतील अल्पसंख्यांकांना संरक्षण मिळत आहे ना, ते पहायला हवे. अन्यथा त्यांच्यावरील अत्याचारांची मालिका चालूच राहील. त्यांच्या नागरी हक्कांची पायमल्ली होतच राहील. बांगलादेशातील अन्याय-अत्याचार यांमुळे गेल्या २५ वर्षांत तेथील ५३ लाख हिंदूंनी पलायन केले आहे. हे भयावह आहे. अल्पसंख्यांकांवरील अन्यायाचा परिणाम भारतासमवेतच्या हितसंबंधांवर होतो. इस्लामी राष्ट्रांतील संघर्षाची झळ आताही भारताला बसतच आहे. इस्लामी राष्ट्रांत होणारे अल्पसंख्यांकांचे दमन रोखायला हवे. त्यासाठी भारताने वेळीच शहाणे होऊन बांगलादेशप्रमाणे अन्य इस्लामी राष्ट्रांवर दडपण आणावे आणि तेथील अल्पसंख्यांकांना, पर्यायाने हिंदूंना त्यांचे हक्क मिळवून द्यायला हवेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात