युरोपातील देशांनाही आता जिहादी आतंकवादाचा सामाना करावा लागत आहे. त्यामुळे आता सर्वच देशांनी याविरोधात संघटित होऊन कारवाई करणे आवश्यक आहे !
व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) : युरोपमधील ऑस्ट्रिया देशाची राजधानी व्हिएन्नामध्ये २ नोव्हेंबरच्या रात्री जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केले. यात एका आतंकवाद्यासह ७ जण ठार झाले, तर अनेक जण घायाळ झाले. घायाळांमध्ये पोलीस अधिकार्यांचाही समावेश आहे. या आक्रमणामध्ये शहरातील ६ वेगवेगळ्या ठिकाणी आतंकवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार करण्याच्या घटना घडल्या. त्याला पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात १ आतंकवादी ठार झाला. या आक्रमणानंतर पोलिसांनी लोकांना सावध रहाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ‘कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. त्यापासून दूर रहा’ असेही म्हटले आहे. या आक्रमणानंतर मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ऑस्ट्रियाच्या गृहमंत्र्यांनी ‘हे आतंकवादी आक्रमण असण्याची शक्यता असून लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. हे आक्रमण फ्रान्समधील महंमद पैगंबर यांच्या व्यंगचित्रांच्या प्रकरणातून झाले आहे का ?’ हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रियात पुन्हा दळणवळण बंदी चालू होणार होती. त्या पार्श्वभूमीवर लोकांकडून मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी गर्दी झाली होती.
आतंकवादासमोर आम्ही कधीच झुकणार नाही ! – ऑस्ट्रियाचे चान्सलर सेबेस्टियन कुर्ज
ऑस्ट्रियाचे चान्सलर सेबेस्टियन कुर्ज यांनी या आक्रमणाचा तीव्र निषेध केला आहे. ते म्हणाले, ‘‘पोलीस आणि सुरक्षायंत्रणा या आतंकवादी आक्रमणाचा कट आखणार्यांना नक्कीच शोधून काढतील. आतंकवादासमोर आम्ही कधीच झुकणार नाही.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात