Menu Close

हिंदूंची ‘सद्भावना’ !

हिंदूंमध्ये सद्गुण असल्याने हिंदू आक्रमक होत नाहीत, असे सांगितले जाते; मात्र हे अर्धसत्य आहे. हिंदूंमध्ये आक्रमकता आहे; मात्र ती अधर्म आणि अन्याय यांच्या विरोधात आहे. ती त्यांच्यामध्ये मुळातच आहे; मात्र भारतात स्वातंत्र्यापूर्वी गांधीगिरी चालू झाल्यानंतर ही आक्रमकता जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आली, तिचे खच्चीकरण करण्यात आले. त्या तुलनेत सद्गुणाची मर्यादा इतक्या टोकाला गेली की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना तिला ‘सद्गुणविकृती’ म्हणावे लागले. या विकृतीमुळे हिंदूंना मोठ्या प्रमाणावर हानी स्वीकारावी लागली आणि लागत आहे. यामुळेच भारताची फाळणी झाली आणि एक शत्रू राष्ट्र निर्माण झाले. इतकेच नव्हे, तर देशातच राष्ट्रघातकी मानसिकता असणारे पोसले जाऊ लागले. त्याचा परिणाम हिंदू सध्या भोगत आहेत. ही विकृती घालवून केवळ सद्गुण ठेवण्याची आवश्यकता आहे. तो ठेवतांना भगवान श्रीकृष्णाच्या नीतीने चालण्याची आवश्यकता आहे. हिंदु तसा प्रयत्न करत आहे, असे म्हणायला हवे, अशीच एक घटना मथुरा येथे घडली आहे.

मथुरा येथील नंदगावामधील म्हणजेच जेथे भगवान श्रीकृष्ण नंदाच्या घरी होते, त्या नंदगावातील नंद महाल मंदिरात दोघा मुसलमानांनी नमाजपठण केले. या वेळी खुदाई खिदमतगार या गांधीवादी संघटनेचे दोन हिंदु कार्यकर्तेही उपस्थित होते. मंदिरांतील पुजार्‍यांना विचारून नमाजपठण केल्याचा दावा या दोघा मुसलमानांनी केला; मात्र पुजार्‍यांनी तो फेटाळून तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी चांद महंमद आणि फैसल खान यांना अटक केली. या दोघांचा दावा होता की, त्यांनी ‘ब्रज ८४ कोस यात्रा’ करतांना मध्ये थांबतांना येथे ‘धार्मिक सद्भावना’ निर्माण करण्यासाठी नमाजपठण केले. येथे त्यांना विचारावेसे वाटते की, त्यांना सद्भावनाच निर्माण करायची होती, तर त्यांनी हिंदु पुजार्‍यांची अनुमती घेऊन आरती करायला हवी होती किंवा भगवान श्रीकृष्णाचा नामजप करायला हवा होता, तर हिंदूंनी ही ‘सद्भावना आहे’, असे म्हटले असते आणि त्यांचे समर्थन केेले असते; मात्र मोगलांच्या इतिहासानुसार हिंदूंची मंदिरे तोडून तेथे मशिदी उभ्या करण्यात आल्या आणि तेथे नमाजपठण चालू झाले, तसाच काहीसा प्रकार मंदिर तोडून नव्हे, तर अस्तित्वात असतांना तेथे नमाजपठण करण्यात आले. हिंदू सहिष्णु आणि अन्य धर्माचा आदर करणारे असल्याने त्यांचा नमाजपठणाला कधीही विरोध नाही आणि नसेल; मात्र त्याचा वापर जर हिंदूंना डिवचण्यासाठी करण्यात येत असेल, तर त्याचा वैध मार्गाने विरोध केला जाईल अन् तो हिंदूंनी केला. हिंदू जागृत झाल्याचेच हे दर्शक आहे. इतकेच नव्हे, तर ४ हिंदु तरुणांनी सद्भावना दाखवण्यासाठी मथुरेतील गोवर्धन येथील इदगाह मशिदीमध्ये जाऊन ‘हनुमान चालिसा’चे पठण केले. याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर पोलिसांनी त्यांना स्वतःहून कारवाई करत अटक केली. ही पोलिसांची हिंदूंच्या प्रती राहिलेली नेहमीची ‘सद्भावना’ (?) होती. अशी ‘सद्भावना’ धर्मांधांविषयी ते कधी दाखवत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. हिंदु तरुणांनी दाखवलेली ‘सद्भावना’ आतापर्यंत हिंदूंनी कधीच दाखवली नव्हती. त्यामुळे हिंदूंच्या मानसिकतेत पालट होत आहे, असे म्हणणे चुकीचे ठरू नये. याची नोंद आता हिंदुद्वेषी घेतील आणि हिंदूंशी नम्रपणे वागतील, अशी अपेक्षा !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *