स्वतःमध्ये तेज निर्माण करण्याचे सामर्थ्य केवळ धर्माचरण आणि स्वरक्षण यांमध्येच आहे ! – विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती
खेड (रत्नागिरी) : आज धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था कुठेही नाही. आपल्याला धर्म आणि शौर्य यांचे शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. स्वतःमध्ये तेज निर्माण करण्याचे सामर्थ्य केवळ धर्माचरण आणि स्वरक्षण यांमध्येच आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी केले. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धर्मप्रेमी युवकांसाठी ३१ ऑक्टोबर २०२० या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन कु. कृपाली भुवड हिने केले. व्याख्यानानंतर श्री. विनय पानवळकर यांनी जोडलेल्या सर्व धर्मप्रेमींना स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात सहभागी होण्याचे आवाहन केले आणि व्याख्यानाची सांगता झाली. या व्याख्यानाला समाजातील अनेक धर्मप्रेमी जोडले होते.
श्री. विनय पानवळकर यांनी म्हटले की,
१. हिंदु धर्माचा मूळ पायाच शौर्य आहे. आपल्या धर्माची उत्पत्तीच शौर्याने झाली आहे.
२. आपला प्रत्येक सण हा पराक्रमाचे, शौर्याचे प्रतीक आहे; पण सद्य:स्थितीमध्ये हिंदु धर्माचे महत्त्व आपल्या मनावर बिंबवलेच जात नाही.
३. आपल्याला शाळेमध्ये विविध खेळ, नृत्य, गायन शिकवले जाते. पैसा, उच्च नोकरी आवश्यक आहे, हे शिकवले जाते. आतापर्यंत आपल्याला मोगलांचा आणि इंग्रजांचा इतिहास शिकवला जात आहे; पण आपल्या भारतातील पराक्रमी राजे किंवा विरांगना यांचा पराक्रम शिकवला जात नाही.