पणजी : वाढत्या विरोधामुळे गोवा शासनाने वागातोर येथे डिसेंबर मासात होणार असलेला ‘सनबर्न’ हा इलेक्ट्रॉनिक संगीत रजनीचा कार्यक्रम रहित केला आहे. पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या आरोग्याचा विचार करून हा संगीत रजनी कार्यक्रम रहित करत असल्याचे म्हटले आहे. ‘सनबर्न’ला राष्ट्रवादी काँग्रेस, गोवा सुरक्षा मंच, तसेच गोव्यातील अन्य काही संघटनांनी विरोध केला होता. ‘मिलिंद सोमण यांच्यावर कारवाई न करणारे पर्यटनमंत्री आजगावकर यांना कॉसिनो, ‘सनबर्न’ हवा’, असे सांगत ‘त्यांनी मंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे’, अशी मागणी गोवा सुरक्षा मंचने केली होती.
तत्पूर्वी ६ नोव्हेंबरला ‘गोव्यातील कोरोनाची स्थिती सुरक्षित झाली, तरच ‘सनबर्न’ महोत्सव पार पडेल’, असे ‘सनबर्न’ संगीत महोत्सवाच्या आयोजकांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले होते. ‘सनबर्न’ महोत्सवाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आम्ही अनुमती घेतली आहे आणि याविषयीचा अंतिम निर्णय सरकार घेणार आहे. आम्ही कुणाचाही जीव धोक्यात घालू इच्छित नाही’, असे ‘सनबर्न’ महोत्सवाच्या प्रतिनिधीने या पत्रकार परिषदेत सांगितले होते.
‘गोवा ऑन फ्रायडे’चा ‘सनबर्न’ला विरोध
‘सनबर्न’ महोत्सवाच्या आयोजकांनी ज्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली, त्या तारांकित हॉटेलच्या बाहेर ‘गोवा ऑन फ्रायडे’ या संघटनेने निदर्शने करून ‘सनबर्न’ महोत्सवाला विरोध दर्शवला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव रहित करण्याची या संघटनेने मागणी केली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात