जो स्वतःच्या मित्रराष्ट्रांना फसवू शकतो, तर तो भारतासारख्या त्याच्या शत्रूराष्ट्राची किती फसवणूक करत असेल, हे लक्षात येते ! वर्ष १९६२ चे भारतावरील आक्रमण ही सद्धा भारताची मोठी फसवणूकच होती ! अशा चीनला आता संपूर्ण जगाने संघटित होऊन कायमस्वरूपी धडा शिकवला पाहिजे !
नवी देहली : चीन हा जगातील ५ व्या क्रमांकाचा शस्त्रास्त्रे निर्यात करणारा देश आहे. चीनने त्याच्या मित्रराष्ट्रांना शस्त्रास्त्रांची विक्री करतांना निकृष्ट दर्जाची शस्त्रे देऊन त्यांची फसवणूक केल्याची माहिती आता उघड होत आहे. यापूर्वी नेपाळला निकृष्ट प्रवासी विमान विकून त्याची फसवणूक केल्याचे उघड झाले होते. तसेच कोरोनाच्या काळात अनेक देशांना निकृष्ट दर्जाचे पीपीई किट्स, मास्क पाठवले होते.
१. चीनने बांगलादेशला वर्ष २०१७ मध्ये वर्ष १९७० मधील ‘मिंग’ श्रेणीतील ‘०३५ जी’ या पाणबुड्या विकल्या होत्या. या पाणबुड्यांचे मूल्य सुमारे १०० मिलियन डॉलर इतके होते. या पाणबुड्यांचा उपयोग केवळ लढाऊ प्रशिक्षणात केला जात असतांना त्या पुरेपूर क्षमतेने कार्य करण्यास सक्षम नव्हत्या.
२. बांगलादेशने वर्ष २००३ मध्ये चीनकडून खरेदी केलेली ‘मिंग’ श्रेणीतील पाणबुडी अपघाताला बळी पडली. तसेच चीनकडून खरेदी केलेल्या ‘ओमर फारूक’ आणि ‘अबू उबैदा’ या दोन्ही युद्धनौकांच्या नेव्हिगेशन रडार आणि तोफा यंत्रणेत बिघाड असल्याचे आढळले होते.
३. बांगलादेशने नाकारलेली चीनची (वाय १२ इ आणि एम्ए ६०) ६ विमाने नेपाळने त्याच्या राष्ट्रीय विमान आस्थापनासाठी खरेदी केली होती; मात्र ही सर्व विमाने नेपाळमध्ये पोचताच निरुपयोगी झाली होती.
४. चीनने पाकशी मैत्रीच्या नावाखाली निकृष्ट दर्जाची शस्त्रसामग्री विकली. चीनने पाकला युद्धनौका ‘एफ् २२ पी’ दिली होती. काही काळानंतर बर्याच तांत्रिक अडचणींमुळे ती खराब झाली.
५. केनियाला युद्धवाहनांची आवश्यकता होती, तेव्हा त्याने चीनकहून ती खरेदी केली; मात्र यात आलेल्या तांत्रिक समस्यांमुळे केनियांच्या अनेक सैनिकांना जीव गमवावा लागला होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात