भजन, मंत्र, वेद, नामजप करत होणार महिलांचे बाळंतपण
- भारताने जगाला दिलेली सनातन आयुर्वेदीय चिकित्सा पद्धती सर्वत्र कुतुहलाचा विषय राहिली आहे. सनातन परंपरांना पुनरुज्जीवित करून त्यांना दैनंदिन जीवनात उपयोगात आणणार्या बनारस हिंदु विश्वविद्यालयाचे अभिनंदन ! आता केंद्रशासनाने या पद्धतींना शासकीय स्तरावर पाठिंबा देऊन पूर्ण भारतात त्यास चालना द्यावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे.
- पुरो(अधो)गामी, तथाकथित सेक्युलरवादी, साम्यवादी यांनी बनारस हिंदु विश्वविद्यालयाच्या या चिकित्सापद्धतीला ‘वैद्यकीय उपचारांचे भगवेकरण’ म्हणून हिणवल्यास कुणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही !
वाराणसी : भारतातील प्रसिद्ध बनारस हिंदु विश्वविद्यालयातील आयुर्वेद विज्ञान विभागाने ‘गर्भसंस्कार चिकित्सा’ नावाने एका वैशिष्ट्यपूर्ण उपचार पद्धतीस आरंभ केला आहे. आईच्या गर्भात असलेल्या बाळावर जन्माच्या आधीच चांगले संस्कार व्हावेत, हा या चिकित्सेमागील उद्देश आहे. गर्भवती महिलांवर वेद, ध्यानधारणा, आध्यात्मिक संगीत, तसेच पूजापाठ यांच्या ‘थेरपी’च्या (चिकित्सेच्या) साहाय्याने गर्भात असलेल्या बाळाचे पालन-पोषण केले जाईल.
विश्वविद्यालयाच्या अंतर्गत असलेल्या सुंदर लाल रुग्णालयाचे चिकित्सकीय अधीक्षक प्रा. एस्.के. माथुर यावर माहिती देतांना म्हणाले की,
१. गर्भसंस्कार काही नवीन प्रक्रिया नाही. आयुर्वेदानुसार याचे अनुसरण सहस्रावधी वर्षांपासून होत आले आहे; परंतु (आधुनिक) वैज्ञानिक स्वीकारार्हता नसल्याने या प्रक्रियेला तेवढे महत्त्व प्राप्त होऊ शकले नव्हते.
२. आम्ही गर्भसंस्कारांना प्रसुती विभागाच्या अंतर्गत पुन्हा नव्या जोमाने आरंभ करत आहोत. हे संस्कार गर्भवती महिलांसाठीही आवश्यक असतात.
३. सप्टेंबर मासाच्या शेवटी या प्रक्रियेला आरंभ करण्यात आला होता. आता ही प्रक्रिया पूर्ण रूपाने कार्यान्वित करण्यात आली आहे.
४. विज्ञानाने हे आधीच स्वीकारले आहे की, चांगले संगीत आणि चांगल्या वातावरणाचा गर्भावर सकारात्मक प्रभाव पडत असतो. आता या गर्भसंस्कारांमुळे गर्भावर होणारा परिणाम वैज्ञानिक स्तरावर अभ्यासला जाईल.
‘गर्भसंस्कार चिकित्से’च्या प्रक्रियेत काय असेल ?
आयुर्वेद विभागाच्या अंतर्गत येणार्या प्रसुती तंत्र उपविभागाच्या प्रमुख डॉ. सुनीता सुमन यांनी या चिकित्सेविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘आयुर्वेदामध्ये एकूण १६ संस्कारांचा उल्लेख आहे. यातील ‘गर्भसंस्कार’ हा अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला जातो. या चिकित्सेच्या अंतर्गत महिलांना वेदपठण शिकवले जाते. रुग्णालयात भरती केलेल्या महिलांना भजने ऐकवली जातात. त्यांना महापुरुषांशी संबंधित साहित्य वाचण्यास दिले जाते. ही संपूर्ण प्रक्रिया गर्भवती महिलांसाठी मोठे वरदान सिद्ध होईल.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात