Menu Close

बलुचिस्तानचे स्वातंत्र्य !

शक्तिपिठांपैकी एका पिठाचे स्थान असलेला आणि महाभारत काळच्या १६ प्रमुख राज्यांपैकी एक राज्य असलेल्या पाकमधील बलुचिस्तान प्रांत दिवसेंदिवस अधिक अशांत होत आहे. गेली ७० वर्षे दबलेला बलुची लोकांचा आवाज त्यांच्या प्रांताबाहेर आंतरराष्ट्रीय स्तरावर आता पोचू लागला आहे. कॅलिफोर्निया आणि जिनिव्हा या दोन ठिकाणी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये काही प्रतिनिधींनी येथील लोकांच्या अत्याचारांविषयी मध्यंतरी आवाज उठवला. पंतप्रधान मोदी यांनी वर्ष २०१६ मध्ये लाल किल्ल्यावरील भाषणात प्रथम बलुची लोकांना धन्यवाद देत त्यांचा उल्लेख केला. हे एक प्रकारे त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देण्याप्रमाणेच होेते. तेव्हापासून भारतात बलुचिस्तानच्या चर्चेने अधिक जोर धरला आणि माध्यमांचे त्याच्याकडे लक्ष जाऊ लागले. आता हे सूत्र ऐरणीवर आले आहे. बलुची लोकांनी पाक सैन्याशी लपूनछपून चालू केलेला लढा आता वाढत आहे. त्यामुळे ‘भारताने आता या संदर्भात निर्णायक भूमिका घ्यायला हवी’, अशी मागणीही वाढत आहे. ‘येथील आंदोलक आता आरपारची सिद्धता करत आहेत’, अशा स्वरूपाची वृत्तेही येत आहेत. सामाजिक माध्यमांतूनही लोक बलुचिस्तानला पाठिंबा देत आहेत.

बलुचींची स्थिती

कोळसा, सोने आणि नैसर्गिक वायू प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेला बलुचिस्तान पाकला ५० टक्क्यांहून अधिक रक्कम पुरवतो; मात्र पाकच्या एकूण लोकसंख्येच्या ५ टक्के असलेले बलुची मात्र अत्यंत हलाखीत आणि भिकार्‍यांप्रमाणे जीवन जगतात. येथे बहुसंख्य भागात वीज किंवा साधे मार्गही नाहीत. लोक उंटावरून प्रवास करतात. पाक ही सारी नैसर्गिक संसाधने घेऊन अत्यल्प पैसे येथील लोकांना देतो. पाकने येथे कोणत्याही प्रकारचा मूलभूत विकास केलेला नाही, उलट अत्याचारांचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे ‘आपण स्वतंत्र झालो, तर इराणप्रमाणे धनवान होऊ’, असे बलुची लोकांना वाटते, त्यात चूक नाही. बलुचिस्तानात ४ संघटना स्वातंत्र्यासाठी कार्यरत आहेत. येथील शिया मुसलमान पाकिस्तानी मुसलमानांसारखे भारताचा द्वेष करत नाहीत. येथे सुन्नीही आहेत आणि शिया-सुन्नी संघर्षही आहे. बलुचिस्तान प्रांताचा काही भाग इराणमध्ये, काही अफगणिस्तानात आणि काही पाकमध्ये आहे. ‘येथील गरीब आदिवासी समाजाच्या नेत्यांना मात्र स्वातंत्र्याविरुद्धचा लढा पूर्णत्वाला न नेता केवळ चालू ठेवण्यासाठी काही देश पैसे देत आहेत’, अशीही चर्चा आहे. येथील आंदोलकांचे नेते पंतप्रधान मोदी यांना उघडपणे त्यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी साहाय्य मागत आहेत. पाक बलुचिस्तान प्रांताला चीनला विकल्याप्रमाणे वागवत आहे. पाकने आतापर्यंत बलुचींवर केलेल्या अत्याचारांना तर तोडच नाही. येथील सहस्रो युवकांना गायब केले जाते. ‘काहींना देशद्रोही ठरवून हेलिकॉप्टरमधून खाली टाकण्यात येते’, असेही सांगतात. पाकचे सैन्य येथील महिलांवर अत्याचार करते. काश्मीरप्रश्‍नी मानवाधिकाराचे गळे काढणार्‍या पाक नेत्यांनी बलुचींचे मानवाधिकार विकून खाल्ले आहेत. बॉम्बस्फोट, हत्या, बलात्कार, अपहरण या गोष्टी अगदी नित्याच्या झाल्या आहेत.

स्वतंत्र बलुचिस्तानवर आक्रमण करणारा पाक !

मेहेरगड हे मोहंजोदाडोेपेक्षा जुने म्हणजे ९ सहस्र वर्षांपूर्वीचे शहर या प्रांतात मिळाले. ‘येथे मिळालेल्या चाकाप्रमाणे ‘नासा’ने त्याच्या अंतराळ मोहिमेतील उपकरणांचे चाक बनवले आहे’, असे सांगितले जाते. भारत आणि पाक यांच्याप्रमाणे वर्ष १९४७ मध्ये बलुचिस्तानला स्वतंत्र अधिकार मिळाले अन् त्यांनी त्यांची संसदही स्थापन केली; मात्र अल्पावधीतच पाकने आक्रमण करून बलपूर्वक बलुचिस्तान कह्यात घेतले. येथील लोकांनी मागितलेले स्वातंत्र्याचे अधिकार त्यांना दिलेच नाहीत. वर्ष १९५५ मध्ये बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या नौरोजी खान यांना आयुष्यभरासाठी कारागृहात, तर त्यांच्या नातेवाइकांना फाशी देण्यात आले. वर्ष १९६२ पासून पाकने येथे सैन्य ठेवण्यास आरंभ केला. वर्ष १९७१ मध्ये येथील संसद बलपूर्वक विसर्जित करण्यात आली आणि पाकच्या सैन्याने येथे हवाई आक्रमणे केली. वर्ष १९७३ मध्ये येथील नेत्याचे अपहरण करून खून करण्यात आला. वर्ष २००५ मध्ये बुक्ती येथील नेत्याचे अपहरण करून त्यांना ठार मारण्यात आले. वर्ष २००९ मध्येही नेत्यांना रातोरात गायब करण्यात आले. अशी ही सूची मोठी आहे.

भारताची भूमिका आणि लाभ

खरे तर कुठल्याही राज्यात अन्याय होत असेल, तर त्यांच्या प्रजेला त्या अन्यायातून मुक्त करणे, ही भारतीय राजांची प्राचीन काळापासूनची संस्कृती आहे. भगवान श्रीरामाने तेच केले. काँग्रेसच्या तत्कालीन सत्ताकाळात मात्र ‘बलुचिस्तान हा पाकची अंतर्गत गोष्ट आहे’, अशी भूमिका नेहमीच घेण्यात आली. बलुचिस्तानमधील पीडित लोकांचे आंदोलन आता अधिक हिंसक रूप धारण करत आहे आणि भारताकडून साहाय्याची अपेक्षा करत आहे. भारतातही त्यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात जनमत निर्माण होत आहे. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ हा तर नियम आहेच; परंतु बलुची लोकांच्या लढ्याला पाठिंबा दिल्याने अनेक गोष्टी साध्य होणार आहेत. उद्या बलुची लोकांचा लढा अधिक उग्र रूप धारण करून ते स्वतंत्र होण्याचीही चिन्हे आहेत. ‘बलुचिस्तान स्वतंत्र होणे म्हणजेच पाकचे तुकडे होणे.’ त्यामुळे पाकचे खच्चीकरण होणार आहे. बलुचीमधील ग्वादर बंदर हे चीनने ‘लीज’वर (भाडेतत्त्वावर) कह्यात घेतले असून ते सामरिक आणि व्यापारी केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे. बलुचिस्तान स्वतंत्र झाले, तर चीनच्या या मनसुब्यांना आळा बसणार आहे. पाक अनेकदा काश्मीरचे सूत्र मानवतावादाच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडून भारतियांच्या जखमांवर मीठ चोळत आहे. जेव्हा बलुचिस्तानमध्ये तो करत असलेले अत्याचार आंतरराष्ट्रीय स्तरावर बाहेर येऊ लागले, तेव्हा त्याचे नाक कापले गेले. त्यामुळे भारताने बलुचींच्या स्वातंत्र्याला वारंवार उघडपणे पाठिंबा देणे म्हणजे ‘पाक बलुचींवर कसे अनन्वित अत्याचार करतो’, हे वारंवार उघड करणे आहे. सध्या ‘इराण-पाक वायू वाहिन्यां’चे काम अनेक गोंधळामुळे बंद पडले आहे. या दोन्ही वाहिन्यांचे मार्ग बलुचिस्तानमधून जातात. बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याने ही वाहिनी पुढे भारतात आणण्यास साहाय्य होणार आहे. काळाच्या उदरात काय काय दडले आहे, ते पुढे येत जाईलच. तूर्तास भारताने बलुचिस्तानचा पाठिंबा वाढवल्यास पाकला कठीण जाईल हे नक्की !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *