-
बुटांचे विज्ञापन करतांना श्री दुर्गादेवीच्या हातात बूट दाखवले !
-
संतप्त हिंदूंकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त !
जगभरात हिंदूंच्या देवतांचा कुठेही, कुणी आणि कशाही प्रकारे अवमान झाला, तर भारत सरकारने लगेच त्याची नोंद घेत तो रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असे हिंदूंना वाटते ! त्यासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे !
नवी देहली : अमेरिकेतील प्रसिद्ध ‘रॅपर स्टार’ (गायिका) कार्डी बी आणि ‘रिबॉक’ हे बूट निर्मिती करणारे आस्थापन यांनी बुटांचे विज्ञापन करतांना श्री दुर्गादेवीचा अवमान केला आहे. बुटांचे जोड हातात घेतलेले अष्टभुजा श्री दुर्गादेवीच्या रूपातील छायाचित्र प्रसारित करण्यात आले आहे. या अवमानामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. हे छायाचित्र प्रसारित होताच संतप्त हिंदूंकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
१. या छायाचित्राच्या तळपट्टीवर लिहिले आहे, ‘‘या वेशभूषेत कार्डी बी हिंदु देवी माता श्री दुर्गादेवीला वंदन करत आहे. या देवीमध्ये प्राचीन काळाप्रमाणेच आधुनिक काळातही संरक्षण आणि आंतरिक शक्ती यांचे प्रतीक प्रतिध्वनीत होत आहे. सध्याच्या निर्णायक घडीला कार्डी बी या श्री दुर्गादेवीप्रमाणेच प्रभावी महिला शक्ती ठरल्या आहेत.’’ (हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या श्री दुर्गादेवीशी स्वत:ची तुलना करून कार्डी बी यांनी हिंदु देवतेचा अनादरच केला आहे ! त्या ख्रिस्ती धर्माचा अशा प्रकारे अवमान करू शकतात का ? – संपादक)
(सौजन्य : midday india)
(वरील चित्रे आणि व्हिडीओ प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
२. संतप्त हिंदूंनी सामाजिक माध्यमांतून याविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. काही धर्माभिमानी हिंदूंनी याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे, ‘‘हिंदु धर्मात श्री दुर्गादेवीला अत्यंत पूजनीय स्थान असून या छायाचित्रात देवीला बिभत्स रूपात दाखवण्यात आले आहे. हिंदूंच्या मंदिरांत चपला, बूट यांना प्रतिबंध असतो आणि कार्डी बी यांनी श्री दुर्गादेवीच्या रूपातील छायाचित्रात हातामध्ये बूट घेतले आहेत. ही श्री दुर्गादेवीची विटंबना आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात