संभाजीनगर : येथील राधा गोविंद सेवा मिशन आश्रमातील प्रियाशरण उपाख्य यादवचंद्र राधाकृष्ण पराशर महाराज यांच्यावर अज्ञात आक्रमणकर्त्यांनी धारधार शस्त्राने आक्रमण केले. या मारहाणीत महाराज जायबंदी झाले असून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
‘‘आक्रमण झाल्यानंतर महाराजांनीही आक्रमणकर्त्यांचा प्रतिकार केल्याने जीवघेणे आक्रमण हातावर निभावले. असे आक्रमण प्रथमच झाले. भीतीचे वातावरण जरी असले, तरी महाराजांनी प्रतिकार केल्याप्रमाणे आम्हीही धैर्याने प्रत्येक संकटाचा सामना करू, अशी भावना आमच्या मनात आहे’’, असे आश्रमातील समस्त सेवेकरींनी सांगितले.
या संदर्भात फुलंब्री पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा नोंद केला आहे. १० नोव्हेंबरच्या मध्यरात्री आश्रमाच्या दरवाज्याची कडीकोयंडा तोडत अज्ञात आक्रमणकर्त्यांनी आश्रमात प्रवेश केला. प्रियाशरण महाराजांवर चाकूने वार करत मारहाण केली. आक्रमणकर्त्यांनी महाराजांना जिवे मारण्याची धमकीही दिली आहे. आक्रमणकर्त्यांनी आश्रमातील कुठल्याही वस्तूला हात लावला नाही. तसेच कुठल्याही प्रकारची चोरी केली नाही. यामुळे सूड घेण्याच्या उद्देशाने आक्रमण केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक पोलिसांसह श्वान पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही जागेची पहाणी केली आहे. चौका परिसरातील साताळा शिवारात राधा गोविंद सेवा मिशन या नावाने असलेल्या आश्रमात मोठ्या संख्येने भक्तगण येतात. आश्रमाकडून गोपालनाचेही अनेक उपक्रम राबवण्यात येतात. (बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या भारतात हिंदु साधू-महाराजांवर आक्रमण होत आहेत, हे दुर्दैवी ! आक्रमणकर्त्यांना त्वरित पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात