इस्लामिक स्टेट म्हणजेच इसिस ! इसिस या आतंकवादी संघटनेच्या हिंसक कृत्यांचा पाढा आतापर्यंत अनेकांनी वाचला असेल. इराक, सिरीया या देशांमध्ये त्यांनी गाठलेली क्रौर्याची परिसीमा पाहून अंगावर काटा उभा रहातो. आता तेथून पलायन करत हे आतंकवादी आफ्रिका खंडात स्वत:चे वर्चस्व गाजवू पहात आहेत. तेथील मोझाम्बिक या देशातील एका शहराला त्यांनी आपली राजधानी म्हणून घोषित करत तेथे दबदबा निर्माण करण्यास प्रारंभ केला आहे. नुकताच त्यांनी मोझाम्बिकमधील फूटबॉलच्या पटांगणात ‘अल्ला हू अकबर’ म्हणत ५० हून अधिक जणांचा शिरच्छेद केला. अमानुषतेची गाठलेली परिसीमा म्हणजे आतंकवाद्यांनी त्या सर्वांच्या शरिराचे तुकडे तुकडे केले. गावातील महिलांचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवले. गावकर्यांच्या घरांना आगी लावल्या. त्या वेळी तेथून पळून जाणार्या गावकर्यांना पकडून त्यांचाही शिरच्छेद केला. हा घटनाक्रम वाचला, तरी मन सुन्न होते. मोझाम्बिकमधील आक्रमण या देशातील अल्पसंख्यांकांवर झालेल्या मोठ्या आक्रमणांपैकी एक आहे. इसिसने केलेले क्रूर आणि अमानवी आक्रमण म्हणजे डोळ्यांवर पट्टी बांधून ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणार्यांसाठी ही चपराकच ठरेल ! आतापर्यंत इसिसच्या आतंकवाद्यांनी मोझाम्बिकमध्ये १ सहस्र ५०० हून अधिक जणांच्या हत्या केल्या. थोडक्यात तेथे एक प्रकारे अराजकच आहे. इराक आणि सिरीया यांच्याप्रमाणे आता मोझाम्बिकही या हिंसकतेने पूर्णपणे पोखरला जात आहे.
वर्ष २०१९ मध्ये आतंकवाद्यांनी मोझाम्बिक देशातील मोसिम्बाओ दा प्राइआ या शहरावर आक्रमण केले. तेव्हा नौदलाने त्यांचा प्रतिकार केला; पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे नौदलाकडील दारूगोळाच संपला. त्यामुळे त्यांना तेथून जावे लागले. शेवटी इसिसने संपूर्ण शहराचा कब्जा मिळवला. काही ठिकाणी सैन्य तैनात आहे; पण आतंकवाद्यांच्या दबावामुळे तेथून त्यांना माघार घ्यावी लागते. सैन्यापेक्षा आतंकवाद्यांकडील उपकरणेच अद्ययावत आणि आधुनिक आहेत. पोलीस आणि लष्करी ठाणे यांच्यावर आक्रमण करून तेथील शस्त्रसाठाही आतंकवादीच हस्तगत करतात. तेथील पोलीस किंवा सैन्य यांचीच सुरक्षा धोक्यात आलेली आहे. त्यामुळे सामान्यांकडे पहाणार तरी कोण ? मोझाम्बिक देश स्त्रियांसाठीही सुरक्षित नाही; कारण अपहरण करण्यात आलेल्या महिलांना तेथे गुलाम किंवा ‘वेश्या’ अशा स्वरूपाची वागणूक मिळते. अशा प्रकारे आतंकवाद्यांनी घातलेल्या हैदोसामुळे वर्ष २०१७ पासून आतापर्यंत साधारणतः साडेचार लाखांहून अधिक लोक तेथून विस्थापित झाले आहेत. हे वास्तव चिंताजनक आणि तितकेच भयावह आहे. हे दुष्टचक्र कधीही थांबणार नसल्याने त्याची परिणती महाभीषण असेल, हे निश्चित !
इसिसची वाढती फौज
आतंकवाद्यांनी इराक, सिरीया नंतर आता मोझाम्बिक देशाकडे मोर्चा वळवला आहे. त्यांना संपूर्ण जगच इस्लाममय करायचे आहे. ‘वरील सर्व घटना म्हणजे त्याचीच चाहूल आहे’, असे म्हणता येईल. मोझाम्बिक देशातील नैसर्गिक साधनसंपत्ती, तसेच घनदाट जंगल यांचा अपलाभ आतंकवाद्यांकडून घेतला जात आहे. हा देश गरीब असून बेकारीची समस्याही तेथे भेडसावत आहे. पैशांच्या मोहापायी तरुण वाटेल ते करण्यास सिद्ध होतात. नेमकी ही मेख जाणून इसिसच्या आतंकवाद्यांकडून तरुणांना विविध प्रलोभने आणि आमिषे दाखवली जातात. तरुणही त्या सर्वांना बळी पडून इसिसकडे मोठ्या प्रमाणात आकृष्ट होत आहेत. इसिसची हिंसक कृत्ये तरुणांना आवडतात. त्यामुळे ते त्यांच्या नादी लागतात. इसिसमध्ये भरती होणार्या तरुणांवर विशिष्ट धर्माचे विचार लादले जाऊन त्यांना हिंसक कारवायांसाठी उद्युक्त केले जाते. पैशांच्या लालसेमुळे हे तरुण हिंसकतेच्या वाटेकडे मार्गक्रमण करण्यास सिद्ध होतात. हे सर्व पहाता लक्षात येते की, इसिसची फौज वाढतच चालली आहे. इराकमध्ये इसिसने त्यांचे राज्य ‘खिलाफत’ म्हणून घोषित केले आणि कोणत्याही धर्माच्या लोकांना पशूप्रमाणे वागवले जायचे. जे इराक किंवा सिरीयामध्ये याआधी घडले, त्याची पुनरावृत्ती आज मोझाम्बिकमध्ये होत आहे. आता या आतंकवाद्यांच्या बंडखोरीचा सामना करण्यासाठी मोझाम्बिकनंतर पुढील क्रमांक कोणत्या देशाचा असेल ?…
आतंकवादाची विषवल्ली रोखा !
इसिस म्हणजे आतंकवादाचा भस्मासुर ! त्याचा जगाभोवतीचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. या भस्मासुराचा वेळीच नाश करायला हवा अन्यथा तो संपूर्ण जगाला गिळंकृत करेल. इराक आणि सिरीया येथे इसिस कार्यरत असतांना भारतातील अनेक राज्यांतील तरुण कुटुंबांचा विचारही न करता तिथपर्यंत पोचले. त्यात एका भारतीय युवतीचाही समावेश होता. आता भारतातून एकही तरुण इसिसमध्ये जाऊ नये, यासाठी प्रत्येकानेच डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवायला हवे. जे इसिसमध्ये सामील होत आहेत, त्यांना वेळीच कह्यात घेऊन त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करायला हवी. तसे झाल्यासच धर्मांध जिहादी होऊन इसिसच्या कह्यात जाण्यापासून परावृत्त होतील. भारतातही यापूर्वी इसिसचे झेंडे फडकावले गेले आहेत. असे होणे म्हणजे भारतात इसिसचा शिरकाव झाल्याचेच निदर्शक आहे. या अनुषंगाने भारताने वेळीच सतर्क व्हायला हवे. आज जग तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. या महायुद्धाचा भडका कधीही उडू शकतो. त्यात जर इसिसनेही उडी घेतली, तर येणार्या अनेक रात्री या संपूर्ण जगासाठी काळरात्री ठरतील. इसिसने आतंकवादाचा विखारी खेळ चालवून त्याचे एक विवरच निर्माण केले आहे. त्यात अनेक देश अडकत जाऊन राष्ट्रहानी होत आहे. मोझाम्बिक देशात झालेल्या घटनेतून सर्वांनीच बोध घ्यायला हवा. आतंकवादाने निर्माण केलेले अशांतता आणि हिंसकता यांचे लोण आता सर्वत्र पसरून चालणार नाही. राष्ट्राला स्थैर्य लाभायला हवे. इसिसरूपी आतंकवादाची विषवल्ली पूर्णपणे उखडली जावी, यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयत्नांसह देशांतर्गत कठोर प्रयत्नांचीही आवश्यकता आहे. सर्वांनीच वज्रमूठ आवळून या आतंकवादाचा समूळ बीमोड करण्यासाठी संघटित व्हावे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात