असे जरी असले, तरी अद्याप भारतात आयुर्वेदाद्वारे कोरोनावर अधिकृतरित्या औषधोपचार करण्याला केंद्र सरकारने अनुमती दिलेली नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांना आयुर्वेदाद्वारे उपचार करून घेण्याची इच्छा असतांनाही ते करून घेता येत नाहीत किंवा सरकारही ते करत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे !
नवी देहली : कोरोनाच्या संकटाच्या वेळी जेव्हा त्याच्यापासून बचाव करण्यासाठी प्रभावशाली पर्याय उपलब्ध नव्हते, तेव्हा देशात घराघरांत हळदीचे दूध, काढा आदी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पर्याय उपयोगी पडले. त्याखेरीज संपूर्ण देशात आयुर्वेदाच्या उत्पादनांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सप्टेंबर मासामध्ये आयुर्वेदीय उत्पादनांची निर्यात दीड पटीने वाढली आहे. तसेच मसाल्याच्या निर्यातीतही वाढ झाली आहे.
एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात जर आज कोरोनाचे संकट असतांनाही स्थिती चांगली राहिली असेल, तर आपल्या या परंपरांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ नोव्हेंबरला ५ व्या आयुर्वेद दिवसानिमित्तच्या एका ऑनलाईन कार्यक्रमात बोलतांना केले. या वेळी त्यांनी धन्वंतरि देवतेकडे भारतासहित संपूर्ण जगाला चांगले आरोग्य लाभण्यासाठी प्रार्थना केली. (धन्वंतरि देवतेची कृपा संपादन करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आचारधर्माचे पालन आणि साधना केली पाहिजे. तसेच स्वयंशिस्त पाळत व्यायाम आणि पथ्यपाणी पाळणेही आवश्यक आहे. हे सर्व केले, तर आजार होण्याची शक्यताच अल्प होते आणि झालाच, तर आयुर्वेदीय औषधांचा वापर करावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात