Menu Close

अन्सारींचे नक्राश्रू !

भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ‘कोरोनाआधी देश धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवाद या दोन महामारीने ग्रस्त आहे’, असे नक्राश्रू ढाळले आहेत. अन्सारी यांच्या नक्राश्रूविषयी सांगायचे झाल्यास त्यांना काही ना काही कारणाने अशी विधाने करण्याची सवयच आहे, असे लक्षात येते. अनुमाने ३ वर्षांपूर्वी उपराष्ट्रपतीपदावरून पायउतार होतांना केलेल्या भाषणात अन्सारी बरळले होते, ‘‘देशाच्या मुसलमान समाजामध्ये आज असुरक्षितता आणि भीतीची भावना आहे. देशाच्या विविध भागांमधून मला अशा अनेक घटना ऐकायला मिळाल्या आहेत. भारतीय समाज वर्षानुवर्षे विविधतावादी आहे; पण आता हे वातावरण धोक्यात आहे.’’ तसेच निवृत्तीनंतर जामिया मिलियाच्या विचारपिठावरून भाषण करतांना त्यांनी देशात असहिष्णुता वाढीविषयी वक्तव्य केले होते.

हमीद अन्सारींची मानसिकता आणि एखाद्या धर्मांधाची मानसिकता एकच आहे, असे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. गल्लीपासून ते देहलीपर्यंत धर्मांधांची एकच भाषा असते ती म्हणजे ‘इस्लाम असुरक्षित आहे !’ साधा कामगार ते अगदी उपराष्ट्रपतीपदासारखे सर्वोच्च पद भोगूनही धर्मांधांचे समाधान झालेले नाही आणि ते कुणी करूही शकत नाही. प्रत्येक ठिकाणी सरकारने जनता आणि जनतेतील बहुसंख्य हिंदू यांनी त्यांच्यावर कितीही जीव ओवाळून टाकला, तरी त्यांची ‘आमच्यावर अन्याय झाला’, हीच भावना असते. अपवाद भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांसारख्या राष्ट्रप्रेमींचा !

धोका राष्ट्रवादाचा कि धर्मांधतेचा ?

धार्मिक कट्टरतेचा विचार केल्यास प्रथम धर्मांधच डोळ्यांसमोर येतात. धर्मांधांची ही कट्टरता आजची नाही आहे, ती भारतावर वर्ष ७१२ मध्ये पहिल्यांदा आक्रमण करणारा महमंद बिन कासीम याच्यापासून देश अनुभवत आहे. मोगल हे धर्मांधच होते. त्यांनी संस्कृती, संपन्नता, विविधता, संस्कार यांनी नटलेल्या या देशात कट्टरतेचा परमोच्च बिंदु गाठला. हिंदूंची सहस्रो मंदिरे पाडून त्यांच्या अवशेषांपासूनच मशिदी बनवल्या, सहस्रो हिंदु महिलांवर अत्याचार केले आणि त्यांना जनानखान्यात डांबले. लक्षावधी निरपराध हिंदूंच्या हत्या केल्या आणि लक्षावधींचे धर्मांतर केले. अगदी केरळमधील मोपला येथे स्वातंत्र्यपूर्व काळात खिलाफतचे राज्य भारतात आणण्यासाठी केलेल्या तथाकथित चळवळीच्या वेळी सहस्रो हिंदूंना ठार केले. हिंदु महिलांवर अत्याचार करण्यात आले. त्याविषयी काँग्रेस आणि तिचे नेते मो. गांधी यांनी मोपल्यांना विरोध करण्याऐवजी ‘मोपले त्यांच्या धर्माप्रमाणे वागले’, असे बोलून त्यांनी उलट समर्थन केले.

याचाच अर्थ धर्मांधांनी बहुसंख्य हिंदु समाजावर काहीही अत्याचार केले, तरी तो त्यांचा धर्म म्हणून त्याकडे दुर्लक्ष करायचे आणि हिंदूंनी विरोध केल्यावर त्याला ‘धार्मिक कट्टरता’ म्हणायची. हिंदूंनी लव्ह जिहादविरोधी कायदा, समान नागरी कायदा, नागरिकत्व सुधारणा कायदा, गोवंश हत्याविरोधी कायदा यांचे समर्थन केल्यास तो ‘उग्र राष्ट्रवाद’ म्हणून त्याची निर्भत्सना करायची, ही काँग्रेसची नीती आहे. या नीतीचे काँग्रेसने इमानइतबारे स्वातंत्र्योत्तर काळात अगदी त्यांची केंद्रातील सत्ता जाईपर्यंत पालन केले आहे. ‘हिंदुत्व म्हणजे काँग्रेसला अंगावर पाल पडावी आणि ती पटकन् झटकून टाकावी’, असे वाटते. अन्सारींचा उदारमतवाद म्हणजे धर्मांधांना काहीही करण्याची आणि डाव्यांना देशात गोंधळ घालण्याची, लुटण्याची मोकळीक ! कैराना, नवी देहली आणि काश्मीर येथील हिंदूंवरील अत्याचार अन् त्यांचे स्थलांतर यांविषयी ‘ब्र’ही न काढणारे अन्सारी कोणत्या तोंडाने राष्ट्रवाद अन् कट्टरता यांच्या गोष्टी करतात ?

सहिष्णू हिंदू

‘जगात कुठे मुसलमान सुरक्षित असतील, तर भारतात आहेत’, असे काही मुसलमान नेतेच म्हणतात. पाकमध्ये अल्पसंख्य हिंदु समाजावर अनन्वित अत्याचार होत आहेत, त्याचप्रमाणे सुन्नींकडून शिया मुसलमानांवर पुष्कळ अत्याचार होत आहेत, तसेच अन्य मुसलमानांवरही पुष्कळ अत्याचार होत आहेत. भारतात शेकडो आतंकवादी आक्रमणे होऊनही मुसलमानांना धोका नाही. उलट अमेरिकेवर एक मोठे आतंकवादी आक्रमण झाले आणि भारतातील अनेक खानांना तेथील विमानतळावरील कडक सुरक्षाव्यवस्थेला सामोरे जावे लागले. भारतात लोकप्रिय असणार्‍या शाहरुख खान यांची अमेरिकेच्या विमानतळावर घंटोन्घंटे तिष्ठत राहून चौकशी झाली. तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्रवादावर अन्सारी यांनी टीका का केली नाही ?

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, ‘‘हिंदु सहिष्णू आहेत; म्हणून ओवैसी भारतात राहून काहीही बोलू शकतात. त्यांच्यावर कुणी आक्रमण केले नाही.’’ हे खरेच म्हणावे लागेल; कारण अकबरुद्दीन ओवैसी यांनी सर्व हिंदूंना संपवण्याची भाषा केली, तरी ते देशभर बिनबोभाटपणे फिरू शकतात, निवडणुका लढवू शकतात. याउलट महंमद पैगंबर यांच्यावर तथाकथित टीका केली, म्हणून धर्मांधांनी हिंदुत्वनिष्ठ कमलेश तिवारी यांची त्यांच्या रहात्या घरी निर्घृण हत्या केली. हरियाणातील मेवात येथे धर्मांधांची संख्या अधिक आहे. तेथील अनेक अल्पवयीन हिंदु मुलींवर सामूहिक बलात्कार झाले असून काहींनी आत्महत्या केल्या आहेत. तेथे हिंदू रहाण्यास घाबरत आहेत. पोलीसही धर्मांधांच्या परिसरात जाण्यास मारहाण होईल, या कारणाने घाबरतात.

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही अजानाच्या ५ वेळा वाजणार्‍या भोंग्यांचा त्रास हिंदूंनी पहाटेपासून रात्रीपर्यंत सहन करत दिवस काढायचे. ते बंद करण्यासाठी पोलीस घाबरतात. मग देशात कुणाची कुणाला भीती आहे, हे लहान मूलही सांगू शकते. हे देशात एक दशकाहून अधिक काळ मोठी पदे उपभोगलेल्या अन्सारींना कळू नये, यात आश्‍चर्य ते काय ? फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘इस्लाम संकटात’, असे उपरोधिक बोलून तेथील शिक्षकावर धर्मांध मुलाकडून झालेल्या आक्रमणाला ‘आतंकवादी आक्रमण’ संबोधले, तसेच आतंकवाद्यावर कारवाई करून देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची घोषणा केली. भारताच्या शासनकर्त्यांना हे केव्हा उमजणार आहे ? हा प्रश्‍न आहे !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *