भगिनी मंचाच्या वतीने ‘भगिनी महोत्सव २०१६’चे आयोजन – सौ. वैशाली राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून भगिनी मंचच्या वतीने सलग सहाव्या वर्षी २२ ते २४ एप्रिल या कालावधीत ‘भगिनी महोत्सव २०१६’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव प्रायव्हेट हायस्कूल मैदान, मंगळवार पेठ येथे होईल. या महोत्सवात २४ एप्रिल या दिवशी ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री मधुताई कांबीकर, सामाजिक कार्यकर्त्या शालन शेळके, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू स्म्रिती मानधना, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा टोकले आणि रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर (हिंदु धर्मप्रसारक) यांना ‘भगिनी पुरस्कार २०१६’ देण्यात येणार आहे, अशी माहिती भगिनी मंचच्या अध्यक्षा सौ. वैशाली राजेश क्षीरसागर यांनी दिली. या वेळी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर उपस्थित होते.
या सोहळ्याचे उद्घाटन २२ एप्रिल या दिवशी सकाळी १० वाजता कोल्हापूरच्या महापौर सौ. अश्विनी रामाणे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवहनमंत्री श्री. दिवाकर रावते उपस्थित रहाणार आहेत. तसेच या सोहळ्यास जलसंपदा राज्यमंत्री श्री. विजय शिवतारे, शिवसेना संपर्कप्रमुख श्री. अरुण दुधवडकर, शिवसेनेचे आमदार, आजी-माजी पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. उद्घाटनप्रसंगी पाहुण्यांचे स्वागत महिलांचे लेझीम, शाहू गर्जना ढोल पथक, मर्दानी खेळ यांद्वारे होणार आहे. भगिनी पुरस्कार कार्यक्रम शिवसेना सचिव खासदार श्री. विनायक राऊत, पालकमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पार पडणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांसाठी अधिकाधिक नागरिक आणि महिला यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रसिद्धीपत्रकात कु. प्रतीक्षा कोरगावकर यांचा देण्यात आलेला परिचय
गेली ११ वर्षे हिंदु धर्मासाठी पूर्णकालीन कार्य करत आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि झारखंड या राज्यात हिंदुधर्मप्रसार, विशेषत: महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात गावांगावांत थेट संपर्क करून महिलांचे प्रबोधन करतात. एक महिला असूनही प्रतिदिन दुचाकीवरून ६० ते ७० किलोमीटर प्रवास करतात, ‘लव्ह जिहाद’सारख्या गंभीर समस्येवर युवतींचे प्रबोधन करण्यासाठी पुढाकार, दूरचित्रवाहिन्यांवर हिंदु धर्माची बाजू प्रभावीपणे मांडतात. शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर आणि कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर येथे प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्यांना रोखण्याकरिता स्थानिक महिलांचे यशस्वी संघटन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात