पाकला आतापर्यंत नष्ट न केल्याचा हा परिणाम आहे ! अन्य इस्लामी देशांकडून पाकला अशा प्रकारचे साहाय्य मिळण्यापूर्वीच त्याला आता नष्ट करणेच आवश्यक !
अॅथेन्स (ग्रीक) : तुर्कस्तानचे भारतविरोधी राष्ट्रपती एर्दोगॉन सीरियामधील जिहादी आतंकवाद्यांना पाकच्या साहाय्यतेसाठी काश्मीरमध्ये पाठवण्याची योजना बनवत आहेत, अशी माहिती ग्रीसचे पत्रकार अँड्रियास माऊंटजॉरोली यांनी दिली आहे. यासाठी तुर्कस्तानने सीरियातील काही आतंकवादी गटांशी चर्चाही केली आहे, असे या पत्रकाराने त्याच्या वृत्तात म्हटले आहे. तुर्कस्तान काश्मीरप्रश्नी पाकचे पूर्वीपासून समर्थन करत आला आहे. तुर्कस्तानने यापूर्वी आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्या युद्धात इस्लामी देश अझरबैजानच्या बाजूने लढण्यासाठी जिहादी आतंकवाद्यांना पाठवले होते.
१. ग्रीसमधील वृत्तसंकेतस्थळ ‘नेन्टापोस्टेग्मा’मध्ये प्रकाशित झालेल्या लेखामध्ये माऊंटजॉरोली यांनी म्हटले आहे की, सीरियन नॅशनल आर्मी मिलिशियाच्या सुलेमान शाह ब्रिगेड्सचे कमांडर महंमद अबू इम्सा यांनी त्यांच्या काही सहकारी अधिकार्यांना सांगितले, ‘तुर्कस्तान येथून त्याच्या काही गटांना काश्मीरमध्ये पाठवू इच्छित आहे.’ सुलेमान शाह ब्रिगेड्सला तुर्कस्तानचे उघड समर्थन आहे. या ब्रिगेड्गसचे उत्तर सीरियातील अफरीन जिल्ह्यावर नियंत्रण आहे.
२. अबू इम्सा याने असेही म्हटले की, तुर्कस्तानचे अधिकारी अन्य गटांशीही या संदर्भात चर्चा करत आहेत. त्यांनी काश्मीरमध्ये कोण जाणार त्यांची नावे सांगण्यासही सांगितले आहे. काश्मीरमध्ये जाणार्या आतंकवाद्याला तुर्कस्तानकडून २ सहस्र डॉलर (१ लाख ४७ सहस्र ५०० रुपये) देण्यात येणार आहेत.
३. पत्रकार माऊंटजॉरोली यांनी पुढे लिहिले आहे की, तुर्कस्तान आणि पाकिस्तान एकमेकांमध्ये संरक्षणविषयक सहकार्य वाढवून दुसर्या देशाची भूमी हडपण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकत्याच या दोन्ही देशांत झालेल्या युद्धाभ्यासाच्या वेळी पाकची लढाऊ विमाने तुर्कस्तानमध्ये गेली होती. तुर्कस्तान पाकच्या साहाय्याने ग्रीसच्या भूमीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ते पाकला काश्मीरच्या सूत्रावर साहाय्य करत आतंकवाद्यांना तेथे पाठवण्याची योजना आखत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात