Menu Close

मराठी, कन्नड, गुजराती, तेलगू आणि इंग्रजी भाषेतील ‘सनातन पंचांग २०२१’च्या अँड्रॉईड अ‍ॅपचे उद्घाटन !

भारतीय अर्थव्यवस्था आणि कुटुंबव्यवस्था हिंदु पंचांगावर अवलंबून असल्याने पंचांगाचे महत्त्व ‘यावच्चंद्रदिवाकरौ’ राहील ! – पंचागकर्ते मोहन दाते

‘सनातन पंचांग २०२१’च्या अँड्रॉईड अ‍ॅपचे उद्घाटन !

मुंबई : हिंदूंची कालगणना लाखो वर्षे जुनी असून ती सूर्य-चंद्र यांच्या गतीवर आधारित आहे. तशीच ती निसर्गचक्र आणि ऋतूचक्र यांना अनुकूल आहे. त्यामुळे प्रतिवर्षी सण, ऋतू, व्रते आदी दिवस पालटत नाही; मात्र अन्य पंथियांची २-४ सहस्र वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेली कालगणना सदोष आहे. आजही लोक इंग्रजी कॅलेंडर दिनांक पहाण्यासाठी नव्हे, तर त्या त्या दिवशी असलेली तिथी, नक्षत्र, मुहूर्त, एकादशी, प्रदोष, सण, व्रते आदी सर्व पहाण्यासाठी ते विकत घेतात. भारताची अर्थव्यवस्था ही सण-उत्सवांवर अवलंबून आहे. त्यानुसार खरेदी-विक्री होते. व्यापारात उलाढाल होते. हे सर्व हिंदु पंचांगामुळे होते. त्यामुळे पंचांगाचे महत्त्व येणार्‍या काळात ‘यावच्चंद्रदिवाकरौ’  (जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत) राहील, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध पंचांगकर्ते श्री. मोहन धुंडिराज दाते यांनी केले. सनातन संस्थेने अनेक वर्षे गुढीपाडव्यालाच नवीन वर्ष साजरे करण्याचे महत्त्व बिंवबल्यामुळे आज युवा पिढी १ जानेवारीच्या जागी गुढीपाडव्याला मोठ्या प्रमाणावर स्वागतयात्रा काढून नववर्ष साजरे करत आहे, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हिंदु कालगणना आणि सनातन पंचाग यांची विशेषता’ या ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सनातन संस्था निर्मित मराठी, कन्नड, गुजराती, तेलगू आणि इंग्रजी भाषेतील ‘सनातन पंचांग २०२१’च्या अँड्रॉईड अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले. मराठी भाषेतील अ‍ॅपचे प्रसिद्ध पंचागकर्ते श्री. मोहन दाते यांच्या हस्ते; कन्नड भाषेतील हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते; गुजराती भाषेतील पटना (बिहार) येथील वर्ल्ड एस्ट्रो फेडरेशनचे प्रा. आचार्य अशोककुमार मिश्र यांच्या हस्ते; तेलगू भाषेतील ओडिशा येथील सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक श्री. अरुणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते; तर इंग्रजी भाषेतील अ‍ॅपचे लोकार्पण नेपाळ येथील विश्‍व ज्योतिष महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. लोकराज पौडेल यांच्या हस्ते करण्यात आले. काही दिवसांपूर्वी हिंदी भाषेतील पंचांगाचे उद्घाटन मध्यप्रदेश येथील श्री गुप्तेश्‍वरधामचे पीठाधीश्‍वर डॉ. मुकुंददास महाराज यांच्या करण्यात आले होते. ‘अँड्रॉईड आणि आय.ओ.एस्. प्रणालीवर असणारी सर्व ‘सनातन पंचांग २०२१’ अ‍ॅप https://sanatanpanchang.com/download-apps/ या लिंकवरून डाऊनलोड करावीत’, असे आवाहन सनातन संस्थेने केले आहे.

या वेळी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी सांगितले की, ‘हिंदु पंचांग’ हे हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा पाया आहे. आपण इंग्रज आणि मोगल यांना या देशातून पळवून लावले; मात्र त्यानंतर आलेल्या राज्यकर्त्यांनी महान हिंदु कालगणनेची उपेक्षा करून इंग्रजी कालगणना कार्यान्वित केली. ही पाश्‍चात्त्यांची सांस्कृतिक गुलामगिरी स्वीकारून देशाची मोठी हानी केली आहे. या गुलामगिरीतून जनतेला बाहेर काढून त्यांच्यात हिंदु धर्म, संस्कृती, भाषा, राष्ट्र आदींविषयी स्वाभिमान अन् प्रेम निर्माण करण्यासाठी सनातन संस्थेचे वर्ष २००५ पासून ‘सनातन पंचांग’ चालू केले आहे. या निमित्ताने आपण सर्वांनी निश्‍चय करूया की, आपण स्वतःचा वाढदिवस आणि नवीन वर्ष हे तिथीनुसार साजरे करणार.

योग्य कालगणना सांगणे हेच भारतीय कालगणनेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य ! – अरुणकुमार उपाध्याय, सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक, ओडिसा

अनेक लोकांना वाटते की, ज्योतिष विद्या आणि कालगणना चुकीची आहे; मात्र संवत आणि शके अशा कालगणनेच्या २ पद्धती आपल्याकडे प्रचलित आहेत. संवत हे सौर आणि चांद्रमास दोन्ही एकत्रित मिळून निर्मित केले जाते. तिथीचे अचूक मापनासाठी शक कालगणना वापरले जाते. इंग्रजांच्या काळात एक भ्रम निर्माण केला गेला की, शक हे त्यांच्या कालगणनेला अनुसरून आहेत; मात्र हे अयोग्य आहे. दिवस, मास आणि वर्ष यांचे अनुपात एकसारखे नसल्याने विविध गणना वापरल्या जातात. आधुनिक काळातील प्रणालीच्या साहाय्याने योग्य कालगणना केली जाऊ शकत नाही. अनेक गणनांचा अभ्यास करून योग्य कालगणना सांगणे, हेच भारतीय कालगणनेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे.

पाश्‍चात्त्यांच्या सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर काढून हिंदु धर्मजागृतीसाठीच ‘सनातन पंचांगा’ची निर्मिती ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

ऋषिमुनींनी खगोलीय अभ्यास करून पंचांगनिर्मिती केली. त्यांनी खगोलीय उपकरण न वापरणे हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे; पण भारतीय कालगणनेची व्याप्ती न समजलेले इंग्रज भारतीय कालगणनेला चुकीचे ठरवतात. भारतातून आक्रमकांना हाकलल्यावर इसाई साम्राज्यवाद आणि त्यांचे राज्यकर्ता यांनी स्वकीय कालगणना पद्धतीऐवजी इंग्रजी कालगणनेचा स्वीकार करायला लावला. हा स्वतंत्र भारताचा पहिला सांस्कृतिक पराजय अन् पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणाचे उत्तम उदाहरण आहे.  सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेचा काळ जवळ येत आहे. धर्म संकटात असतांनाही धर्मप्रेमींनी धर्मरक्षण करत बीजरूपात हिंदु परंपरा, संस्कृती जागृत ठेवली. ते बीज मशाल स्वरूपात सिद्ध झाले असून ती मशाल हिंदु राष्ट्र स्थापनेची ज्योत होणार आहे. सनातन सिद्धांतावर आधारित असलेल्या, ऋषिपरंपरेच्या माध्यमांतून मिळालेल्या पंचागरूपी ज्ञानाचे हिंदु राष्ट्रनिर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान असेल.

युवा पिढी हिंदु पंचांगाचे अवलोकन करत आहे हे आनंददायी ! – आचार्य अशोककुमार मिश्र, वर्ल्ड एस्ट्रो फेडरेशन, बिहार

युवा पिढी पंचांगाचे अवलोकन करत आहे, हे अतिशय आनंददायी आहे. भारतीय पंचांग मनाच्या अवस्थेशी निगडीत असून त्यातील प्रत्येक गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासलेली आहे. वैदिक कालगणना अतिशय प्राचीन आणि अचूक आहे. ‘सनातन पंचांग’मध्ये महापुरुषांचे अवतरण दिवस दिलेले आहेत. जे बघतो ते दृश्य स्वरूपात आपल्यासमोर सिद्ध होते आणि त्यातून प्रेरणा मिळते. काळ अनंत असतो. तरी सनातन धर्मामध्ये काळाचे परमाणू ते महाकल्प असे कालमापन केले आहे. इतका व्यापक अभ्यास अन्य कोणत्याही संस्कृतीमध्ये उपलब्ध नाही. सनातन धर्मातील अशा अनेक तत्त्वांना, वैज्ञानिकतेला पुढे आणण्याची आवश्यकता आहे. सनातन पंचांगाच्या माध्यमातून हे कार्य चांगल्या रितीने होत आहे.

हिंदु कालगणनेचे संवर्धन करून सर्वच ठिकाणी ती उपयोगात आणायला हवी ! – डॉ. लोकराज पौडेल, संस्थापक अध्यक्ष, विश्‍व ज्योतिष महासंघ, नेपाळ

सर्वत्रचे हिंदू विक्रमसंवत आणि शकसंवत यांनुसार सण-उत्सव साजरे करतात. मेष राशीत सूर्य ग्रहाने प्रवेश केल्यावर नूतन वर्ष चालू होते. या कालगणनेनुसार ३६५ दिवस, ६ घंटे, १२ मिनिटांचे एक वर्ष असते. नेपाळमध्ये मुख्यत्वे विक्रमसंवतचे, तसेच शकसंवत यांचे एकत्रितपणे पालन केले जाते. येथे शासकीय कामांमध्येसुद्धा ही कालगणना प्रचलित आहे. ही अतिशय शास्त्रीय आणि योग्य कालगणना असल्याने या कालगणनेचे संवर्धन करून सर्वच ठिकाणी ही कालगणना उपयोगात आणायला हवी.

विशेष : हा कार्यक्रम फेसबूक आणि यू-ट्यूब यांच्या माध्यमांतून ३६ सहस्र २७ लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर १ लाख ३४ सहस्र ९४९ लोकांपर्यंत पोचला.

 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *