गाजीपूर (उत्तरप्रदेश) : देशभरात दुष्काळाची स्थिती आहे. पाण्यासाठी हाणामारीची स्थिती काही ठिकाणी निर्माण झाली आहे. अशा वेळी काशीच्या सिद्धपीठ हथियाराम मठाचे महामंडलेश्वर भवानी नंदन यति महाराज यांनी शासनाला आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, जर देशात आमच्यासारख्या साधूसंतांचे एक पथक बनवून त्यांच्यावर देशात वेळेवर पाऊस पाडण्याचे दायित्व सोपवले, तर आम्ही ते करून दाखवू. जर तसे करण्यात आम्ही अयशस्वी ठरलो, तर आम्ही देश सोडून निघून जाऊ. येथील कालीधाममध्ये चालू असणार्या महायज्ञाच्या ठिकाणी पत्रकारांशी बोलतांना महामंडलेश्वर भवानी नंदन यति महाराज बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,
१. आपल्या मंत्रांमध्ये मोठी शक्ती आहे. श्रीमद्भगवद् गीतेतही याचा उल्लेख आहे. यज्ञ केल्यानंतर पाऊस पडला नाही, असे कधीच होऊ शकत नाही.
२. देशातील गोहत्या बंद करण्यासाठी लोकांनी पुढे यायला हवे.
३. पर्यावरणाचा असमतोल हा चिंतेचा विषय आहे. याकडे कोणीच लक्ष देत नाही.
४. नैसर्गिक प्रकोपामुळे शेतकरी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होत आहेत. यासाठी मनुष्यही तितकाच उत्तरदायी आहे. त्यामुळे सर्वत्र अशांती आहे. हवन, यज्ञ यांमुळे वातावरण शुद्ध रहाते आणि योग्य वेळी पाऊस पडतो.
महामंडलेश्वर यांनी पाण्याच्या संरक्षणासाठीही सतर्क केले. यासाठी बुद्धीवंतांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात