समर्थकांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न
केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी भारतीय संस्कृती, तसेच प्रथा-परंपरा यांना वारंवार विरोध करणार्या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे !
मुंबई : शिर्डी येथील साईबाबा मंदिरामध्ये भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा करून प्रवेश करण्याचे आवाहन करणारा मंदिर संस्थानने लावलेला फलक हटवण्यासाठी पुणे येथून शिर्डी येथे जाण्याचा प्रयत्न करणार्या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यासह त्यांच्या समर्थकांना नगरच्या सीमेवर पोलिसांनी कह्यात घेतले. या वेळी तृप्ती देसाई यांच्या समर्थकांनी पोलिसांशी वाद घालत, तसेच घोषणा देत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पुणे येथून सकाळी तृप्ती देसाई त्यांच्या समर्थकांसह शिर्डी येथे निघाल्या होत्या.
त्यांच्या गाडीच्या मागून पुणे पोलिसांची गाडी गेली होती. शिर्डीला पोचण्यापूर्वी १०० किलोमीटर आधी पुणे-नगर महामार्गावरील सुपे पथकर नाक्यावर पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. ‘तृप्ती देसाई या शिर्डी येथे जाणार’, या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे मोठ्या प्रमाणात पोलीस पहारा ठेवण्यात आला होता. तृप्ती देसाई यांनी शिर्डी येथील फलक काढण्याची चेतावणी दिल्यानंतर शिर्डी येथील विभागीय दंडाधिकार्यांनी त्यांना ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत शिर्डी येथे प्रवेशबंदीची नोटीस दिली आहे. या नोटिसीला न जुमानता तृप्ती देसाई यांनी शिर्डी येथे जाण्याचा प्रयत्न केला. (प्रशासनाचा आदेशही न मानणार्या तृप्ती देसाई आणि त्यांचे समर्थक यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे, असेच जनतेला वाटते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
महिलांवर अत्याचार होतात, त्या वेळी तृप्ती देसाई कुठे असतात ? – शिवसेनेची महिला आघाडी
तृप्ती देसाई मंदिरात दर्शनासाठी आल्यास त्यांचे स्वागत आहे; मात्र त्यांची ‘स्टंटबाजी’ चालू आहे. येथे येऊन ‘स्टंटबाजी’ करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू. हे सर्व त्या प्रसिद्धीसाठी करत आहेत. महिलांवर अत्याचार होतात, त्या वेळी तृप्ती देसाई कुठे असतात ?
ब्राह्मण महासंघाकडून फलकाला संरक्षण !
भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी कृतीशील असणारा ब्राह्मण महासंघ आणि शिवसेनेची महिला आघाडी यांचे अभिनंदन !
तृप्ती देसाई आणि त्यांचे समर्थक यांनी फलक हटवू नये. यासाठी शिर्डीच्या प्रवेशद्वारावर ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते संरक्षणासाठी उभे होते. या प्रकरणी नगर पोलिसांनी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनाही शिर्डीमध्ये प्रवेश न करण्याविषयी नोटीस दिली होती.
(म्हणे) ‘आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न !’ – तृप्ती देसाई
आम्हाला अडवून आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. पोलिसांनी आम्हाला नगरच्या आधीच अडवले. खरेतर आम्हाला अडवण्याऐवजी पोलिसांनी फलक हटवायला हवा होता. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात