Menu Close

‘स्टंटबाज’ तृप्ती देसाई

भल्या भल्या राजकारण्यांना लाजवेल, अशी ‘स्टंटबाजी’ करण्यात तृप्ती देसाई यांचा हात कुणी धरू शकणार नाही. मंदिर आणि महिला यांच्या संदर्भात जेव्हा जेव्हा म्हणून काही विषय येतो, तेव्हा मूळ सूत्र बाजूला राहून तृप्ती देसाई यांच्या दिखाऊपणाच्या मोहिमा चालू होतात. हिंदु धर्मशास्त्र किंवा सनातन धर्मातील नियम इतके वरवरचे आणि उथळ नाहीत की, कुणीही यावे आणि त्यांना वाटते म्हणून त्यांच्याप्रमाणे ते पालटावे. शनिशिंगणापूर आणि कोल्हापूर येथे देसाईबाईंनी केलेली स्टंटबाजी आणि तिथे त्यांचा उडालेला फज्जा लोक विसरलेले नसतांनाच परत शिर्डीला जाण्याची घाई त्यांना लागली. यातून ‘केवळ आणि केवळ सवंग लोकप्रियतेशिवाय दुसरा कुठलाही उद्देश असू शकत नाही’, हे स्पष्ट होते.

दुर्दैवाने आता प्रसिद्ध मंदिरे पर्यटनस्थळे होऊ लागली आहेत. तिथे येणारे भाविक हे कित्येकदा सहलीची भावना मनात ठेवून आलेले असतात. ‘मंदिरांमध्ये देवाचे दर्शन घ्यायला जात आहोत, त्यासाठी पारंपरिक धार्मिक पेहराव केला पाहिजे’, हे भान बहुसंख्य भाविकांना राहिलेले नाही. हिंदूंचा पारंपरिक पेहराव हा चैतन्य ग्रहण करणारा आहे. मंदिरात देवाचे दर्शन घेत असतांना पारंपरिक पेहरावाने अधिक चैतन्याचा लाभ होतो. पारंपरिक पेहराव सात्त्विक असतो; त्यात अश्‍लीलता नसते. त्यामुळे वृत्ती उत्छृंखल होण्यापासून टळते. सध्या देहप्रदर्शन करणारे पेहराव घालण्याची नवरूढी आली आहे. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींकडूनही या संदर्भात दिशादर्शन होत नाही. त्यामुळे नाईलाजाने मंदिरांमध्ये सात्त्विक पारंपरिक पेहराव करून येण्याविषयी नियम लिहिण्याची वेळ आली आहे. ‘भक्तीपुढे पेहराव महत्त्वाचा नाही’, हे सत्य आहे; परंतु समाजामध्ये मंदिरात जाण्याची कृती ही केवळ भक्तीपुरती मर्यादित रहात नाही. समाजात वावरतांना समाजाचे नियम पाळावे लागतात; जसे कारखाना, रुग्णालय, न्यायालय, शाळा, आस्थापने इथे विशिष्ट पोशाख घातले जातात, तसेच हे आहे. स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रियांनी पुरुषांप्रमाणे वागणे नव्हे. हिंदु धर्माने स्त्री आणि पुरुष यांना प्रकृतीनुसार वेगवेगळे अधिकार आणि कर्तव्ये दिली आहेत. त्यांची तुलना होऊ शकत नाही आणि एकमेकांवर कुरघोडी होऊ शकत नाही. यात बरोबरीचा प्रश्‍न नाही. सामान्य हिंदूंना हे कळते; परंतु देसाईबाईंसारख्या दिखाऊपणा करणार्‍यांना हे समजून घ्यायची इच्छा नसते. एकंदरीत त्यांचे आंदोलन संशयास्पदही वाटते. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अपलाभ उठवून पोलीस यंत्रणेला विनाकारण नाडणार्‍या देसाईबाईंना प्रशासनानेच आता योग्य ते शासन केले पाहिजे, असे भाविकांना वाटल्यास चूक ते काय ?

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *