काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या ‘द प्रेसिडेन्शिअल इयर्स’ या पुढील मासात प्रसिद्ध होणार्या पुस्तकात त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ‘मी राष्ट्रपती झाल्यानंतर काँग्रेसने राजकीय दिशा गमावली. सोनिया गांधी पक्षातील प्रकरणे हाताळण्यास असमर्थ ठरत होत्या, तर डॉ. मनमोहन सिंह हे संसदेत अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांचे खासदारांशी वैयक्तिक संबंध संपुष्टात आले’, असा दावा त्यांनी केला आहे.
प्रणवदा काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करणारे अथवा अप्रसन्नता व्यक्त करणारे पहिलेच नव्हेत. या आधीही काँग्रेसच्या कार्यपद्धती, धोरणे, नेतृत्व यांवर पक्षातीलच अनेकांनी आवाज उठवला आहे. प्रणवदा तसे काँग्रेसमधील पंतप्रधानपदाचे दावेदार असणारे नेते होते, तसेच पक्षात अनुभवीही. खरेतर वर्ष १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर ते पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार होते; मात्र राजीव गांधी यांना पंतप्रधानपद देण्यात आले. त्यांनी मुखर्जी यांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्यामुळे मुखर्जी यांनी नवीन पक्ष काढला. वर्ष २००४ मध्ये सोनिया गांधी यांनी त्या स्वत: ‘पंतप्रधान बनणार नाही’, असे घोषित केल्यावर मुखर्जी यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडायला हवी होती; मात्र काँग्रेसच्या परंपरेप्रमाणे गांधी कुटुंबाशी जवळीक, एकनिष्ठा असणारे यांनाच पदांच्या वेळी प्राधान्य दिले जाते. त्याप्रमाणे डॉ. मनमोहन सिंह हे पंतप्रधान झाले.
काँग्रेसचे दरबार राजकारण
असाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी झाल्याचे पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांनी पवारांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने काँग्रेसवर टीका करणारा लेख वर्तमानपत्रांमध्ये लिहिला. या लेखामध्ये महाराष्ट्रातून आलेले शरद पवार यांना काँग्रेसच्या ‘दरबार गट’ आणि ‘दरबार राजकारण’ यांमुळे अनेक वेळा क्षमता असूनही पंतप्रधानपद नाकारण्यात आले, तसेच त्यांचा सातत्याने अवमानही करण्यात आला, असे नमूद केले आहे. वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्यासमोर राहुल गांधी यांच्या काँग्रेसला दारूण पराभव पत्करावा लागला, तेव्हा राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले. त्यानंतर नवीन पक्षाध्यक्ष नियुक्तीच कित्येक दिवस झाली नाही. सोनिया गांधी यांना पुन्हा काळजीवाहू अध्यक्ष बनवण्यात आले. त्याच अद्यापपर्यंत अध्यक्षपद सांभाळत आहेत. असे असले तरी ‘सर्व निर्णय राहुल गांधीच घेऊन सोनिया गांधी केवळ त्याला अनुमोदन देतात’, अशी चर्चा आहे. म्हणजे इकडून तिकडून पुन्हा गांधी घराण्याच्याच हातात काँग्रेस पक्षाची धुरा आहे. काँग्रेस पक्षाच्या वाटचालीत अनेक काँग्रेसींना गांधी घराण्याचाच अडसर वाटू लागला आहे. बिहार निवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभव पत्करावा लागला. तेव्हा पक्षांतर्गत ‘नेते सुस्त आणि आळशी झाले आहेत’, ‘नेते अजून अहंकारी आहेत, त्यांना वाटते जनता त्यांच्याकडे येईल’, ‘नेत्यांना वास्तवाचे भान नाही. ते कार्यकर्ते आणि सामान्य जनता यांपासून तुटले आहेत’, ‘पक्ष बुडतोय, त्याचा शेवट जवळ आहे’ अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
पक्षात सुधारणा सांगणारे ‘पक्षद्रोही’
काँग्रेसचे माजी प्रवक्ते संजय झा यांनी मार्च २०२० मध्ये एका इंग्रजी दैनिकात लेख लिहून पक्षात सुधारणा आवश्यक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांचे प्रवक्तेपद तात्काळ काढून घेण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधील २३ ज्येष्ठ पदाधिकार्यांनी ‘पक्षात सुधारणा करणे आवश्यक आहे’, हे सांगणारे पत्र पक्ष नेतृत्वाला लिहिले होते. त्यानंतर त्यांच्यावर पक्षद्रोहाचा आरोप करण्यात आला. याविषयी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील पदाधिकार्यांनी ‘पक्ष नेतृत्वावर शंका घेणार्यांना राज्यात फिरू देणार नाही’, अशी टोकाची भूमिका घेतली. यावरून काँग्रेसची स्थिती किती बिकट आहे, हे लक्षात येते. काँग्रेसमध्ये सुधारणा करण्याची, नेतृत्व पालटाची आवश्यकता काहींना वाटते आणि त्याविषयी काही बोलले तर थेट नारळ दिला जातो. त्यांना थेट ‘पक्षद्रोही’, ‘गद्दार’ अशी विशेषणे लावली जातात. पक्षात सुधारणांची मागणी करणार्या अनेक नेत्यांनी त्यांची पूर्ण हयात काँग्रेसमध्ये घालवली आहे, तरी त्यांच्या सूत्रांची नोंद घेण्याची तसदी काँग्रेसच्या ‘दरबारी राजकारणाला’ वाटत नाही, यातच सर्व आले. काँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांनी ‘काँग्रेस निवडणुका ‘फाईव्ह स्टार कल्चर’ पद्धतीने लढवत आहे’, असा आरोप केला. ‘नेत्यांना निवडणुकीचे तिकीट मिळाल्यावर नेते पंचतारांकित हॉटेल आरक्षित करतात, वातानुकूलित गाडीविना प्रवास करत नाहीत आणि जिथे रस्ते खराब असतात, तिथे ते जात नाहीत’, असे आझाद यांनी विधान केले. ज्यांचे पायच भूमीवर नाहीत, ते काय देशातील आणि राज्यातील तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सोडवणार आणि त्यांचे जीवनमान उंचावणार ?
काँग्रेसचे जुने नेते गांधी कुटुंबाच्या घराणेशाहीला कंटाळले आहेत. ‘अन्य व्यक्तीकडे नेतृत्व दिल्यास पक्ष फुटेल’ अशी भीती गांधी घराण्याशी निष्ठा ठेवणार्यांना वाटते. काँग्रेसींना गांधी घराणे म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ असे झाले आहे. काँग्रेसने तिच्या देशावरील सत्ताकाळात केवळ मुसलमानांचे लांगूलचालन केले आणि हिंदूंवर अन्याय केला. आता बहुतांश मुसलमानांचे म्हणणे आहे की, काँग्रेसने त्यांना केवळ वापरून घेतले. त्यामुळे तेसुद्धा काँग्रेसपासून दूर होत आहेत. बहुतांश हिंदूंना काँग्रेसमध्ये स्वारस्य वाटत नाही.
गेल्या ७० वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेसने देशाची अवस्था एखाद्या धर्मशाळेप्रमाणे केली. कुणीही येवो-जावो कुणावर कसलेच नियंत्रण नाही. देशाच्या प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार फोफावू दिला. देशावरील कर्ज वाढू दिले आणि शेतकर्यांना मरू दिले. देवभूमी आणि ऋषिभूमी असलेल्या भारतावर मोगलांप्रमाणे राज्य करून दैन्यावस्था करणार्या काँग्रेस पक्षाची स्थितीही केविलवाणी होणे, ही नियतीने तिला दिलेली शिक्षाच नसेल कशावरून ? या पक्षाची स्थापनाच ब्रिटिशांच्या दूरदृष्टीतून झाली असल्याने तो भारतीय भूमीवर तग कसा धरेल ? काहींच्या पुण्यबळामुळे पक्ष इतकी वर्षे टिकला. आता ते पुण्यबळ संपत आल्याने पक्ष नामशेष होणेच शेष आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात