पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके यांचा पत्रकार परिषदेत आरोप
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !
तुळजापूर (जिल्हा सोलापूर) : येथे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी बंधनकारक असलेल्या ‘अॅक्सिस कार्ड’मध्ये (दर्शनपासमध्ये) अपप्रकार होत असल्याचा आरोप श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके यांनी केला आहे. मंदिर संस्थानकडे ‘अॅक्सिस कार्ड’ ‘स्कॅन’ करण्याची सक्षम यंत्रणा नसल्याचा अपलाभ घेत मंदिर संस्थानचे काही कर्मचारी आणि व्यावसायिक मोजक्या पुजार्यांना हाताशी धरून ‘अॅक्सिस कार्ड’चा अपवापर करत सहस्रो रुपये कमावत आहेत. ‘अॅक्सिस कार्ड’मध्ये होत असलेल्या या अपप्रकाराची चौकशी करण्याची मागणी सज्जनराव साळुंके यांनी पत्रकार परिषदेत केली. (अशी मागणी का करावी लागते ? मंदिर संस्थानच्या हे लक्षात येत नाही का ? सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या व्यवस्थेतील त्रुटी सुधारण्यासाठी मंदिराचे व्यवस्थापन भक्तांच्या कह्यात हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपीन शिंदे, कोषाध्यक्ष किरण क्षीरसागर, संचालक प्राध्यापक धनंजय लोंढे आदी उपस्थित होते.
या वेळी सज्जनराव साळुंके पुढे म्हणाले की,
१. दळणवळण बंदीच्या ८ मासांनंतर श्री तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले; मात्र मंदिर संस्थानने भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी उपाययोजना केली नसल्याने राज्यासह देशाच्या कानाकोपर्यांतून येणार्या भाविकांना दर्शनापासून वंचित रहावे लागत आहे.
२. तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याकडे मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक पदाचाही अतिरिक्त पदभार आहे; मात्र यापूर्वी पदवीधर निवडणूक आणि सध्या ग्रामपंचायत निवडणूक आदी कामांमुळे तहसीलदार तांदळे यांना मंदिर संस्थानच्या कारभाराकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. या संधीचा अपलाभ मंदिरातील कर्मचारी घेत आहेत, त्यामुळे मंदिर संस्थानमध्ये पूर्णवेळ तहसीलदारांची नेमणूक करण्यात यावी.
३. यासाठी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांना निवेदन दिले आहे.
मंदिर बंद असतांना कोणत्याही सुधारणा केल्या नाहीत ! – सज्जनराव साळुंके
कोरोनाच्या काळात ८ मास मंदिर बंद होते; मात्र या संधीचा लाभ घेत मंदिर संस्थानने मंदिरात कोणत्याही सुधारणा केल्या नसल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप साळुंके यांनी या वेळी केला.
‘अॅक्सिस कार्ड’ ‘स्कॅन’ करून मंदिरात प्रवेश दिला जातो ! – सौदागर तांदळे, तहसीलदार तथा व्यवस्थापक, तुळजाभवानी मंदिर संस्थान
मंदिर संस्थानकडून ‘अॅक्सिस कार्ड’ ‘स्कॅन’ करून आणि आधारकार्ड पडताळूनच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जातो. ओळखपत्र पडताळणी होत नसल्यास मंदिरात सोडण्यात येत नाही. काही दिवसांपूर्वी ‘अॅक्सिस कार्ड’विषयी अपप्रकार करतांना पुजारी आढळून आले असून त्यांच्यावर देऊळ कवायत कलमानुसार कारवाई होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात