कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार सातत्याने स्वदेशी वस्तू, उत्पादने, उपचारपद्धती यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे. या अंतर्गतच केंद्रशासनाने आयुर्वेदाच्या प्रसारासाठी पदव्युत्तर आयुर्वेदीय वैद्यांना ५८ प्रकारची शस्त्रकर्मे करण्याची अनुमती दिली. केंद्रशासनाने एक चांगला निर्णय घेतलेला असतांना दुसरीकडे अॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी मात्र याला विरोध दर्शवत नुकताच एक दिवसाचा देशव्यापी संप केला.
जेव्हा पाश्चात्त्यांना शस्त्रकर्मामधील ‘अ’ही कळत नव्हते, तेव्हा ५ सहस्र वर्षांपूर्वी महर्षि सुश्रुत यांनी ‘सुश्रुत’ संहिता लिहून १०० हून अधिक शस्त्रकर्माच्या पद्धतींचा शोध लावला. इतकेच काय, तर आधुनिक वैद्यांच्या पुस्तकांमध्येही महर्षि सुश्रुत यांना ‘फादर ऑफ सर्जरी’ म्हणूनच ओळखण्यात येते. इतके सगळे स्वच्छ असतांना अॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी याला विरोध करणे अनाकलनीय आहे. इंग्रज भारतात येण्याअगोदर भारतात केवळ आयुर्वेद होता. वैद्य केवळ नाडी पाहून रुग्णांची पडताळणी करायचे. वैद्यांकडून दिल्या जाणार्या औषधाचे मूल्यही सामान्यांना परवडेल असेच असायचे. आयुर्वेदाची शिकवण अशी होती की, त्यामुळे रोग मुनष्यापासून चार हात लांबच असायचा.
अगदी अलीकडचे कोरोनोचे उदाहरण पाहिल्यास आयुष मंत्रालयाने दिलेला आयुर्वेदाचा काढा घेऊनही अनेकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढली. तुळस, गुळवेल आणि लोकांना सहजतेने आजूबाजूला उपलब्ध होणार्या वनस्पतींमुळे मुनष्याला निरोगी रहाण्याची गुरुकिल्ली मिळाली. याउलट पाश्चात्त्यांकडे यांपैकी विशेष काहीच नसल्याने ते अद्यापही पूर्णत: अॅलोपॅथीवरच अवलंबून आहेत. कोरोना काळात अॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी रुग्णांना कसे ‘लुटले’, याची अनेक वृत्ते प्रसिद्ध झाली. पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत अत्यल्प वैद्यकीय सुविधा असणार्या भारतात कोरोना काही प्रमाणात आटोक्यात येत आहे, तर अमेरिकेत अद्यापही प्रतिदिन २ ते ३ सहस्र मृत्यू होत आहेत.
योग आणि आयुर्वेद अशी प्राचीन मौल्यवान देणगी ऋषिमुनींनी भारतियांना दिली आहे, ज्यामुळे मनुष्याला अन्य औषधांची आवश्यकताच भासत नसे. आयुर्वेद परिपूर्ण शास्त्र असल्याने केंद्रशासनाने आता यावर संशोधन आणि अभ्यास करून त्याचा सर्वसामान्यांनाही कसा लाभ होईल, याकडेच लक्ष देणे आवश्यक आहे.
– श्री. अजय केळकर, सांगली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात