Menu Close

नंदुरबार येथे ‘हिंदु सेवा साहाय्य समिती’च्या वतीने आमरण उपोषणास प्रारंभ !

  • पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने ५ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याचे प्रकरण

  • बालिकेच्या मृत्यूस उत्तरदायी असलेल्यांवर कारवाई करण्यासह अन्य मागण्या !

नंदुरबार : पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने ५ वर्षांच्या बालिकेला जीव गमवावा लागला. नंदुरबार नगरपालिकेने बालिकेच्या मृत्यूस उत्तरदायी असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ‘हिंदु सेवा साहाय्य समिती’चे धर्मसेवक नरेंद्र पाटील, मयूर चौधरी, तसेच मृत बालिकेचे वडील मुकेश माळी, सहा मासांपूर्वी कुत्रे आड आल्याने अपघात होऊन मृत्युमुखी पडलेले बलराज राजपूत यांचे भाऊ मोहित राजपूत यांनी १४ डिसेंबरपासून नंदुरबार नगरपालिकेसमोर मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.

उपोषणातील प्रमुख मागण्या

१. मृत्यूमुखी पडलेली निष्पाप बालिका हिताक्षी माळी हिच्या मृत्यूला उत्तरदायी असलेल्या नंदुरबार नगरपरिषदेच्या ठेकेदाराचा ठेका रहित करण्यात यावा.

२. कुत्र्यांचा प्रादुर्भाव वाढण्याचे एक कारण म्हणजे उघड्यावरील मांसविक्री आणि त्यापासून विविध पदार्थ बनवून विक्री करणार्‍या अनधिकृत गाड्या हे असून त्यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करून त्या कायमस्वरूपी बंद करण्यात याव्यात.

३. नंदुरबार नगरपालिकेचे कर्मचारी किंवा अधिकारी अथवा ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकास अपंगत्व आल्यास किंवा नागरिकाचा मृत्यू झाल्यास, अपंगत्व आलेल्या व्यक्तीला तात्काळ २ लाख रुपये आणि मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये हानीभरपाई नगरपालिकेने द्यावी.

४. मोकाट कुत्र्यांना ‘रेबीज इंजेक्शन’ देणे, तसेच नसबंदी कार्यक्रम त्वरित राबवण्यात यावा.

५. मोकाट गुरांमुळे अनेक लहानमोठे अपघात घडतात. त्यामुळे अशा मोकाट गुरांचाही प्रश्‍न कायमस्वरूपी सोडवावा.

६. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने मृत पावलेली कु. हिताक्षी माळी हिच्या कुटुंबियांना हानीभरपाई देण्यात यावी. ती हानीभरपाई मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या ठेकेदाराकडून वसूल करून त्वरित मुलीच्या कुटुंबियांना मिळवून द्यावी.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *