सातारा : मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी या दिवशी हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यावर चालून आलेले अफझलखानाच्या रूपातील संकट नष्ट केले होते. या घटनेला ३५२ वर्षे पूर्ण झाली. प्रतिवर्षी किल्ले प्रतापगड येथे शासनाच्या वतीने ‘शिवप्रतापदिन’ साजरा करण्यात येतो. आजही जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले प्रतापगड येथे शासकीय ‘शिवप्रतापदिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते प्रतापगडावरील श्री भवानीमातेचे विधीवत पूजन करण्यात आले. नंतर ध्वजारोहण पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये कलम १४४ लागू करण्यात आले होते. त्यामुळे काही मोजक्या शासकीय अधिकारी आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीतच हा सोहळा पार पडला. या वेळी कोरोनाचा संसर्ग टाळण्याविषयी (सामाजिक अंतर, मास्क आणि सॅनिटायझर आदी) काळजी घेण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात