Menu Close

वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांचा देहत्याग

देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आयुष्यभर समर्पित भावाने कार्य करणारे योद्धा संत ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते !

ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) : हिंदु धर्माची बाजू परखडपणे मांडणारे, तसेच हिंदु धर्मावरील आघातांचे वेळोवेळी खंडण करणारे वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांनी २१ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजता शेगावजवळील त्यांच्या टाकळी या मूळ गावी देहत्याग केला. त्यांचे वय ८७ वर्षे होते. पू. वक्ते महाराज यांनी सनातन संस्थेवर पित्याप्रमाणे प्रेम केले. हिंदु जनजागृती समितीच्या विविध उपक्रमांना त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन नेहमी लाभत होते. राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी, तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा २०१६-१७ या वर्षाचा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांना देण्यात आला होता.

देवता, धर्म, संत, व्रत, हिंदु धर्मग्रंथ यांचा अपमान करणार्‍यांविरोधात संपूर्ण आयुष्य संघर्ष करण्यात घालवणारे ते महाराष्ट्रातील योद्धा संत होते. धर्मावर टीका करणार्‍यांचे पू. वक्तेबाबा यांनी वेळोवेळी योग्य आणि परखड स्वरूपात खंडण केले. राष्ट्रभक्ती आणि जाज्वल्य धर्माभिमानाचे ते चालते बोलते प्रतीक होते. त्यांची कीर्तने आणि प्रवचने या मध्यमांतून ते धर्मावरील आघात अन् राष्ट्रावरील संकटे यांविषयी उपस्थितांना अवगत करत. धर्माचरण आणि राष्ट्रभक्ती करण्याविषयी ते लोकांना कळकळीने आवाहन करत. विशेषतः ‘मनुस्मृति का वाचली पाहिजे’, हे त्यांनी वेळोवेळी ठामपणे सांगितले.

१. पू. वक्ते महाराज यांनी वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षापासून कुटुंबियांसमवेत मुक्ताबाई आणि पंढरपूर येथील वारी करण्यास प्रारंभ केला होता.

२. ‘ब्रह्मचित्कला दर्शन’, ‘विठ्ठल कवच’, ‘विठ्ठल सहस्रनाम’, ‘विठ्ठल स्तवराज’, ‘विठ्ठल अष्टोत्तरनाम’, ‘विठ्ठल हृदय’, ‘मुक्ताबाई चरित्र’, ‘ज्ञानेश्‍वर दिग्विजय’, ‘वाल्मिकी रामायण’, ‘संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन’ अशा अनेक ग्रंथांचे त्यांनी संपादन केले.

३. पू. वक्ते महाराज यांनी आरंभी सिद्ध करण्यात आलेला ‘जादूटोणा विरोधी कायदा’ कसा हिंदुविरोधी आहे, हे सातत्याने सांगितल्यामुळे त्यातील अनेक नियम शासनाला रहित करावे लागले.

‘तुम्ही पुष्कळ मोठे ईश्‍वरी कार्य करत आहात’, असे म्हणून सनातनच्या साधकांना आश्‍वस्त करणारे पू. वक्ते महाराज !

१. पू. वक्ते महाराज यांचे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्याविषयी पू. वक्ते महाराजांच्या मनात श्रद्धा होती. त्यांना परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्याविषयी आदर होता.

२. जादूटोणाविरोधी कायद्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या भूमिकेला पू. वक्ते महाराजांनी नेहमीच पाठिंबा दिला. या कायद्याच्या विरोधातील आंदोलन असो अथवा मुख्यमंत्र्यांची भेट असो किंवा पंढरपूरमध्ये वारीच्या काळात सर्व महाराजांची घेतलेली बैठक असो यांमध्ये पू. वक्ते महाराज यांचा सक्रीय सहभाग असायचा.

३. पू. वक्ते महाराजांना सनातनचे साधक भेटायला गेल्यावर ‘साधक कुठे रहात आहेत ?’, ‘साधकांची रहण्याची व्यवस्था झाली आहे ना ?’, ‘त्यांच्या भोजनाची व्यवस्था झाली आहे ना ?’, याची ते नेहमी आपुलकीने चौकशी करत असत. ते साधक आणि कार्यकर्ते यांना कौतुकाने म्हणत, ‘‘तुम्ही पुष्कळ मोठे ईश्‍वरी कार्य करत आहात.’’

४. त्यांनी अनेक वेळा हिंदु जनजागृती समितीच्या कार्यक्रमांना मुक्ताबाई मठही उपलब्ध करून दिला आहे.

५. सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात त्यांनी तळमळीने त्यांची परखड मते वारंवार समाजासमोर मांडली.

६. दैनिक ‘सनातन प्रभात’चे ते नियमित वाचक होते. त्यांचे मूळ गाव असलेल्या टाकळीहाट (शेगाव) येथे त्यांच्या कुटुंबातील आणि गावातील लोकांना सनातन संस्थेचे धर्मकार्य कळावे यासाठी त्यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ स्वखर्चाने चालू केले होते.

धर्मावर होणारी आक्रमणे रोखणारा धर्मयोद्धा हरपला ! – हिंदु जनजागृती समिती

‘धर्माचे पालन । करणे पाखंड खंडण ॥’ हा धर्मरक्षणाचा बीजमंत्र घेऊन अखंडपणे कार्यरत रहाणारे वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू पूज्य निवृत्ती महाराज वक्ते यांच्या देहत्यागामुळे धर्मावर होणारी आक्रमणे रोखणारा एक लढवय्या धर्मयोद्धा हरपला, अशा भावपूर्ण शब्दांत हिंदु जनजागृती समितीने आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.

समितीने म्हटले की, बुलढाणा जिल्ह्यात जन्मलेले पूजनीय वक्ते महाराज यांनी श्रीक्षेत्र पंढरपूरातील मुक्ताई मठात राहून महाराष्ट्रभरात धर्मरक्षण आणि धर्मजागृती यांचे मोठे कार्य केले. कीर्तन-प्रवचनांतून, तसेच अनेक जाहीर सभांतून पूज्य वक्ते महाराज यांनी तरुणांमध्ये धर्मप्रेम वाढवण्यासह धर्मद्रोही विचारांचे खंडणही केले आहे. वारकरी संप्रदायातील संतविभूती म्हणून परिचित असलेल्या महाराजांचे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याशी जवळचे संबंध होते. धर्मविरोधी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असो कि पुरोगामी आणि नास्तिक यांनी धर्मावर केलेली टीका असो या सर्वांच्या विरोधात पूजनीय वक्ते महाराज मैदानात उतरले. अनेक प्रसंगी पदरमोड करून महाराष्ट्रभरात जनजागृती केली. प्रतिवर्षी आळंदी, पंढरपूर वा पैठण येथे वारकरी अधिवेशन बोलावून हिंदु धर्मावर होणार्‍या विविध आघातांच्या विरोधात लढण्यासाठी ते वारकर्‍यांना कृतीशील करत असत. त्यांचे वय झालेले असतांना ऊन, वारा, पाऊस, थंडी आदींचा विचार केला नाही. धर्मरक्षणासाठी कार्यरत राहणार्‍या या संतविभूतीचा सन्मान करण्याचे भाग्य हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांना लाभले. सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमात हिंदु जनजागृती समितीचे (पूज्य) शिवाजी वटकर यांच्या हस्ते महाराजांचा सन्मान करण्यात आला.

पूज्य वक्ते महाराज यांचा वेद, स्मृती, पुराणे आदींचा केवळ गाढा अभ्यास नव्हता, तर ते चालते-बोलते विद्यालयच होते. तसेच त्यांनी अनेक धर्मग्रंथांचे लिखाणही केले होते. त्यांना महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार प्राप्त झाला होता. संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठगमनावर टीका करणारे असोत कि हिंदूंच्या धर्मग्रंथांवर अश्‍लाघ्य टीका करणारे नास्तिक असोत, महाराजांच्या सडेतोड वैचारिक प्रहारांतून कोणीही सुटत नसे. पूज्य वक्ते महाराजांनी अनेक वारकर्‍यांमध्ये धर्मप्रेम निर्माण करून त्यांनाही धर्मरक्षणासाठी कृतीशील केले आहे. पूज्य वक्ते महाराजांचे हे धर्मरक्षणाचे कार्य पुढे चालवणे हीच महाराजांना खरी श्रद्धांजली ठरेल !

ह.भ.प. (पू.) वक्ते महाराज यांच्या देहत्यागाविषयी मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली

वारकरी संप्रदायाची संरक्षक भिंत ढासळली ! – आचार्य तुषार भोसले, प्रदेशाध्यक्ष, भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी

ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायाची संरक्षक भिंत ढासळली आहे. समाजात महाराजांचा वैचारिक ठेवा तेवत ठेवण्याचे दायित्व सर्वच संप्रदाय मंडळींचे असणार आहे.

आपले विचार आम्हाला नेहमी पथदर्शन करतील ! – ह.भ.प. (सौ.) डॉ. नीलमताई पाचुपते (येवले, मुंबई)

हे दु:ख कायम राहील की, ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज यांची प्रत्यक्ष भेट कधी होऊ शकली नाही, तरी त्यांची तेजस्विता नेहमी जाणवली. स्पष्टवक्तेपणा, वारकर्‍यांविषयीची तळमळ यांसाठी आम्हाला (पू.) निवृत्ती बाबांचे उदाहरण देण्यात आले. त्यांचेे विचार आम्हाला नेहमी पथदर्शन करत रहातील.

पू. वक्ते महाराज यांनी वारकरी संप्रदायासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले होते ! – ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ

पू. वक्ते बाबा हे वारकरी संप्रदायातील भीष्माचार्य होते. त्यांनी हिंदु धर्मावर होणारा अन्याय कदापि सहन केला नाही. त्यांचे व्यक्तीमत्त्व त्यागी होते. त्यांनी वारकरी संप्रदायासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले होते. अशी व्यक्ती जाण्याने वारकरी संप्रदायाची पुष्कळ मोठी हानी झाली आहे. आताच्या कालखंडात पू. बाबांसारखे व्यक्तीमत्त्व पुन्हा होणे नाही. त्यांनी हिंदु धर्माचे रक्षण होण्यासाठी पुष्कळ मोठे कार्य केले आहे.

वारकरी संप्रदाय पोरका झाला आहे ! – ह.भ.प. राणा महाराज वासकर, पंढरपूर

वारकरी संप्रदायातील धर्माचार्य, धर्मवेत्ता आणि कट्टर वारकरी असा एक धर्मसूर्य ज्यांनी पंढरीचे आणि वारकर्‍यांचे महत्त्व वाढवण्यासाठी देह झिजवला. त्यामुळे वारकरी संप्रदाय पोरका झाला आहे. त्यांची उणीव भरून न येणारी आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्वीट केले आहे, ‘वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु, अखंड ज्ञानदानपरायण, तसेच शासनाचा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार प्राप्त झालेले ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.’

 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *