हिंदु धर्मात प्रवेश केल्यानंतर धमक्या मिळू लागल्याने पोलिसांकडून संरक्षण
कासिम असे या तरुणाचे नाव असून त्याने वर्ष २०१२ मध्ये अनिता कुमारी या तरुणीशी प्रेमविवाह केला होता
अलीगड (उत्तरप्रदेश) : येथे एका मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीशी विवाह करतांना घरवापसी केल्याची घटना घडली आहे. राज्यात नव्या धर्मांतरविरोधी (लव्ह जिहादविरोधी) कायद्यानुसार धर्मांतरापूर्वी २ मास आधी जिल्हा दंडाधिकार्यांकडून अनुमती घेणे आवश्यक आहे; परंतु या तरुणाने तसे न केल्याने आणि पोलिसांनी त्याला संरक्षण दिल्याने टीका केली जात आहे. त्यांच्या या टीकेला या तरुणानेच उत्तर दिले असून त्याने म्हटले आहे, ‘मी घरवापसी केली आहे.’ तसेच ‘या तरुणाला धमक्या मिळत असल्याने त्याला संरक्षण देण्यात आले’, असे स्पष्टीकरण पोलिसांनीही दिले आहे. कासिम असे या तरुणाचे नाव आहे. त्याने वर्ष २०१२ मध्ये अनिता कुमारी या तरुणीशी प्रेमविवाह केला होता. त्यांना २ मुलेही आहेत.
(सौजन्य : News24 UP & Uttarakhand)
१. अनिताच्या म्हणण्यानुसार विवाहानंतर तिने धर्मांतर केले नव्हते. कासिमही त्याच्या धर्माचे पालन करत होता; परंतु मुलांसमोर नमाजपठण करण्यासाठी तो बिचकत होता. त्यामुळे तो बाहेर जाऊन नमाजपठण करत होता. आता मात्र कासिम याने धर्मांतर केल्याने मला आनंद झाला आहे.
२. कासिम याने घरवापसीसाठी आर्य समाजात शुद्धीकरण प्रक्रिया करून हिंदु धर्मात प्रवेश केला. त्यानंतर त्याला धमक्या मिळू लागल्याने त्याने पोलिसांत तक्रार केली.
३. कासिम याला शुद्धीकरणासाठी साहाय्य करणारे नीरज भारद्वाज यांनी म्हटले की, हे धर्मांतर नाही, तर घरवापसी आहे. कासिमचे धर्मांतर करण्यात आलेले नाही. त्यांचे केवळ शुद्धीकरण करण्यात आले आहे.
४. कासिम याने म्हटले की, माझे पूर्वज बाबरचे वंशज नव्हते, असे मला वाटत होते. आमचे पूर्वजही हिंदु समाजाचाच भाग होते. मी आज माझ्या समाजामध्ये आलो आहे. संपूर्ण कुटुंब माझ्यासमवेत आहे. कोणत्याही दबावाविना मी धर्मांतर केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात