Menu Close

ब्रिटनचे ‘पाकिस्तानी ‘ऑफकॉम’!

ब्रिटनमधील दळणवळण नियामक कार्यालय ‘ऑफकॉम’ने अर्णव गोस्वामी यांच्या ‘रिपब्लिक भारत’ या वृत्तवाहिनीला नुकताच १९ लाख ७३ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला. ‘पूंछता है भारत’ नावाच्या कार्यक्रमात पाकिस्तानी नागरिकांना आतंकवादी संबोधणे, तसेच द्वेषयुक्त भाषा वापरल्याचा वाहिनीवर आरोप आहे. पाकिस्तानी नागरिकांना आतंकवादी संबोधल्याविषयी भारतातील एका वाहिनीवर विदेशी संस्थेकडून कारवाई होणे, हे कुणा भारतीय नागरिकासाठी केव्हाही आश्‍चर्य वाटण्याजोगे आहे. आतंकवादी आक्रमणांचे समर्थन करणे, भारतात आतंकवादी आक्रमण करणार्‍यांना साहाय्य करणे, भारताविरुद्ध पाकच्या क्रिकेट सामन्यांच्या वेळी भारत जिंकल्यावर दूरचित्रवाणी संच फोडणे, भारताचा राष्ट्रध्वज जाळणे, ‘भारत हिंदूंचा देश आहे’, असे म्हणत तेथील हिंदूंवर आक्रमण करणे आणि हिंदूंची घरे, मंदिरे यांची तोडफोड करणे असे करणार्‍यांना आतंकवादी नाही, तर काय शांतीदूत म्हणावे ?

ब्रिटनमध्ये हिंदू आणि भारत यांच्या द्वेषाचे प्रमाण वाढत आहे. भारताने जम्मू-काश्मीर येथून जाचक कलम ३७० हटवल्यावर तेथे पाकच्या नागरिकांकडून भारताविरुद्ध निदर्शने करण्यात आली. तेव्हा भारत आणि हिंदू यांविरोधी घोषणा देणार्‍यांना एका ब्रिटीश ज्येष्ठ पत्रकार महिलेने विरोध केला. या महिलेला पाकच्या नागरिकांनी धक्काबुक्की केली, ते तिच्या अंगावर धावून गेले, तेव्हा या महिलेच्या समर्थनार्थ कुणी ब्रिटीश संस्था पुढे आली नाही. या महिलेने तेव्हा असाहाय्यपणे ‘ब्रिटन या लोकांपुढे हतबल आहे, अमेरिकेने तरी त्यांच्या देशात असे होणार नाही, याची काळजी घ्यावी’, असे आवाहन केले.

पाकिस्तान्यांचे क्रौर्य

काही वर्षांपूर्वी एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाला होता. त्यामध्ये पाकचे नागरिक ‘हिंदुस्थान बम बनाये, तो हम बम बनकर हिंदुस्थानपर बरसेंगे’ असे सांगत असल्याचे ऐकू आले. भारताने पाकवर हवाईमार्गे ‘एअर स्ट्राईक’ केल्यावर दुसर्‍या दिवशी पाकच्या वायूदलाने आगळीक करत भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा झालेल्या झटापटीत भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकचे ‘एफ् १६’ लढाऊ विमान पाडले. त्या वेळी पाकचा वैमानिक हवाई छत्रीद्वारे पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरला. तेव्हा तो भारताचा सैनिक आहे, असा ग्रह झाल्याने पाकच्या नागरिकांनी त्याची ठेचून हत्या केली. अभिनंदन यांना पकडणारे पाकचे नागरिक त्यांना ठार करणार होते; मात्र पाकच्या सैनिकांनी त्यांना कह्यात घेतल्याने ते वाचले.

पाक नागरिकांच्या रक्तामध्येच भारतद्वेष भिनला आहे. भारताची फाळणीच मुळात भारत आणि हिंदू यांच्याविषयीच्या तीव्र द्वेषातून झाली आहे. हा द्वेष त्यांच्या प्रत्येक कृतीतून उमटत असतो. त्यांची पुस्तके, बोलणे आणि भारतविरोधी कृती यांमधून त्याचा प्रत्यय येतो. नुकतेच इस्लामाबादमध्ये एक मंदिर उभारण्यासाठी भूमीपूजन झाले आणि त्या ठिकाणी मंदिर उभारण्यासाठी एक छोटेसे बांधकाम झाले. याचे वृत्त ‘हा हा’ म्हणता वेगाने इस्लामाबादेत पसरले. तेथे धर्मांध नागरिकांच्या एका गटाने येऊन ते बांधकाम तोडले, तेथे उभे राहून मौलवीने बांग दिली. तेथील लहान मुलेही सरकारला उद्देशून ‘तुम्ही जर मंदिराचे बांधकाम केले, तर येथील प्रत्येक हिंदूला वेचून ठार करू’, असे सांगत असल्याचे व्हिडिओ प्रसारित झाले. यातून द्वेषाला काही सीमाच नाही, असे लक्षात येते. भारतावर आक्रमण करणारा आतंकवादी अजमल कसाब याने ‘भारतात मुसलमानांवर अनन्वित अत्याचार करण्यात येतात, मशिदीवर आक्रमणे करण्यात येतात’, असे सांगून ‘भारतावर आक्रमण करण्याची मानसिकता निर्माण केली जाते’, असे पोलिसांनी कह्यात घेतल्यावर जबाबात सांगितले. सैन्यदलाच्या गुप्तचर सूत्रांकडून काही काही दिवसांनी ‘शेकडो आतंकवादी पाकव्याप्त काश्मीर येथील ‘लाँच पॅड’वर भारतात घुसण्यासाठी सज्ज आहेत’, अशी माहिती दिली जाते.

पाक हा आतंकवाद जोपासणारा, आतंकवादी हाफीज सईद इत्यादींची मानमरातब करणारा, त्यांना संरक्षण देणारा आणि आतंकवादाचे उगमस्थान असणारा, जगभरात आतंकवाद निर्माण करणारा ओसामा बिन लादेन, कुख्यात दाऊद इब्राहीम यांना पाक वास्तव्याला सुरक्षित ठिकाण वाटत असेल, तर तेथील प्रत्येकाला आतंकवादी म्हटल्यास वावगे काय ?

भारतियांवरील अत्याचारांविषयी क्षमा कधी ?

ब्रिटनने १५० वर्षे भारतियांवर राज्य करून लाखो देशवासियांच्या हत्या केल्या, भारताच्या अगणित संपत्तीची लूट केली, भारतियांची छळवणूक केली आणि वैभवसंपन्न भारताला भिकेकंगाल केले. याविषयी ब्रिटनने कधी क्षमा मागितलेली नाही, ना तेथील कोणत्याही संस्थेने भारतियांवर केलेल्या अत्याचारांविषयी ब्रिटीश शासनाने भारत सरकार आणि भारतीय यांची क्षमा मागावी, याचा आग्रह धरलेला नाही. याचा अर्थ भारताचे त्यांच्या लेखी मूल्य शून्य आहे.

हिंदुत्वनिष्ठांविषयी अपसमज पसरवणारी किंवा द्वेषमूलक वार्ता प्रसारित करणारी बी.बी.सी. वृत्तवाहिनी द्वेष पसरवत आहे’, असे ‘ऑफकॉम’ला वाटत नाही. भारतातीलच साम्यवादी विचारसरणी जोपासणार्‍या काही वाहिन्या मोदी सरकारविषयी एकतर्फी वार्तांकन केल्यावर त्यांच्यावर कारवाई करावी वाटत नाही. एवढेच काय, तर जगप्रसिद्ध ‘टाइम’ नियतकालिकाचे मूळचे पाकिस्तानी असलेले पत्रकार आतीश तासिर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी ‘डिवायडर इन चीफ’ असा उल्लेख केला होता, तेव्हा त्यांची अपकीर्ती केल्याप्रकरणी नियतकालिकाला दंड करावा, असे ‘ऑफकॉम’ला का वाटले नाही ? राष्ट्रहितैषी वार्तांकन करणार्‍या ‘रिपब्लिक भारत’ वाहिनीवर कारवाई केल्याविषयी भारत सरकारने भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी ब्रिटीश संस्थांवर कारवाई करून परतफेड करावी आणि अशा पाकधार्जिण्या संस्थांवर बंदीही घालावी, अशी राष्ट्रप्रेमींची मागणी आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *