पाकमधील बलुचिस्तानमध्ये एका पोलीस चौकीवर बलुची लोकांच्या संघटनेने आक्रमण करून ७ पोलिसांना ठार मारले. बलुचिस्तानमध्ये पाकच्या विरोधात लोकांच्या मनातील खदखद अशा प्रकारे कधीकधी बाहेर पडत असते. अलीकडेच कॅनडामध्ये आश्रय घेतलेल्या बलुची नेत्या करिमा बलुच यांचा तेथे संशयास्पद मृत्यू झाला. पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.ने त्यांची हत्या केल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर बलुची समुदायाकडून जगात विविध देशांत निदर्शने झाली. ‘करिमा बलुच यांच्या हत्येचे हिंसक पडसाद बलुचिस्तानमध्ये उमटणार’, असा कयास होता आणि तो खरा ठरला. पाकच्या निर्मितीपासून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा लढा चालू आहे. वर्ष २००० पासून या लढ्याने जोर पकडला आहे. वर्ष २००० पासून आतापर्यंत बलुचिस्तानमध्ये ५५ सहस्र लोक बेपत्ता आहेत. त्यांतील १८ सहस्र लोकांचे मृतदेह सापडले आहेत. बलुचिस्तानमधून एखादा बलुची नागरिक अचानक ‘गायब’ होण्याचे प्रकार आता नित्याचे झाले आहेत. बलुची लोकांना ‘आतंकवादी’ संबोधून किंवा ‘तुमचे आतंकवादी संघटनांशी संबंध आहेत’, असे सांगून कुणालाही उचलायचे आणि नंतर त्यांची अमानुष हत्या करायची, हा पाक सैन्याचा नित्यक्रम झाला आहे. बलुची बुद्धीजिवी, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते असे अनेकांचे बळी पाकने घेतले आहेत. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्याला विचारांद्वारे बळ देणार्या सर्वांनाच संपवून हे आंदोलन चिरडून टाकण्याचे पाकचे षड्यंत्र आहे. बलुची लोकांना भारताकडून आशा आहेत. पाकच्या विरोधातील बलुची लोकांच्या आंदोलनाला बळ द्यायचे कि त्याकडे दुर्लक्ष करायचे, हे भारतावर अवलंबून आहे.
आंतरराष्ट्रीय समुदायाची उदासीनता !
करिमा बलुच यांच्याप्रमाणे स्विडन येथील बलुची नेते साजिद हुसैन यांचाही काही मासांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. करिमा बलुच यांची हत्या नव्हे, तर त्यांनी आत्महत्या केल्याचे कॅनडाच्या पोलिसांचे म्हणणे आहे. वर्ष २०१६ मध्ये करिमा बलुच यांना पाककडून धमक्या येऊ लागल्याने त्यांनी कॅनडात आश्रय घेतला आणि जगात बलुची लोकांवर होणार्या अन्यायाला वाचा फोडली. मागील काही मास त्यांनी ‘माझ्या जिवाला धोका आहे’, असे विधान केले होते, तसेच ‘कनॅडामध्ये आय.एस्.आय.च्या माजी अधिकार्यांनी घुसखोरी केल्यामुळे तेथील बलुची कार्यकर्ते आणि नेते यांचा जीव धोक्यात आला आहे’, असेही त्यांनी सांगितले होते. याविषयी कॅनडाच्या यंत्रणांना करिमा बलुच यांनी सावध केले होते; मात्र तरीही त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला, हे संतापजनक होय.
करिमा बलुच
येथे कळीचे सूत्र म्हणजे याच कॅनडाने भारतात शेतकर्यांनी आंदोलन केल्यावर भारतीय शेतकर्यांच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली होती. ‘शेतकर्यांच्या मागण्या मान्य करून कृषी कायदे रहित करावेत’, अशी मागणीही त्याने भारत सरकारकडे केली होती. भारतातील आंदोलनाविषयी बोलणारा कॅनडा करिमा बलुच यांच्या हत्येविषयी गप्प का ? मानवाधिकारांविषयी कणव असणारे स्वतःच्या देशात मात्र करिमा बलुच यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचे रक्षण करू शकले नाहीत, हेच खरे. भारतातील मानवाधिकार्यांच्या कथित हननाविषयी बोलणारे बलुची लोकांवरील अत्याचारांविषयी बोलत नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे.
भारताची भूमिका महत्त्वाची !
जगभरात प्रचलित व्यवस्थेला होणारा विरोध मोडून काढतांना बळाचा आणि छळाचा वापर होतो. हाँगकाँग येथील नागरिकांनी चीनच्या अन्याय्य कायद्यांच्या विरोधात दिलेला लढा किंवा रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या विरोधात बोलणार्यांची हत्या, या सर्व घटनांवरून हेच सूत्र अधोरेखित होते. हे देश विरोधकांचे विचारस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य किंवा व्यक्तीस्वातंत्र्य यांविषयी विचार करत बसत नाहीत. पाक त्याच्या विरोधकांना कशा प्रकारे संपवत आहे, हे बलुचिस्तानमधील लोकांच्या पाशवी घटनांतून दिसून येते. या उलट भारतात मात्र विरोधकांना काहीही बोलण्याची मुभा आहे. काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांवर दगड फेकले जातात, देशाच्या राजधानीत ‘भारत तेरे टुकडे होंगे’, अशा घोषणा दिल्या जातात, शेतकरी आंदोलनामध्ये ‘मोदी तू मर’ अशा धमक्या दिल्या जातात; मात्र त्यांचा आवाज ‘बंद’ केला जात नाही. आता विरोधकांना कसे हाताळायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न; पण भारतात सर्व प्रकारचे स्वातंत्र्य असतांनाही ‘येथे मानवाधिकारांचे हनन होते’, आदी आवया उठवणे, हे हास्यास्पद होय.
करिमा बलुच यांनी सातत्याने ‘भारताने बलुचिस्तान स्वतंत्र करण्यासाठी साहाय्य करावे’, अशी मागणी केली होती. त्यांनी वर्ष २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी पाठवून त्यांना भाऊ मानले होते. केवळ बलुचिस्तानच नव्हे, तर हाँगकाँग येथे चीनच्या विरोधात नागरिकांनी केलेल्या आंदोलनात भारताचा राष्ट्रध्वज फडकावण्यात आला होता. त्यासह तिबेट आणि तैवान हे देशही भारताकडे आशेने बघतात. एकदंरीत आशिया खंडाचा विचार करता भारतासाठी हे आश्वासक चित्र आहे; मात्र त्याचा म्हणावा तसा लाभ भारताकडून उठवला जात आहे का, हेही पहावे लागेल. भारताला अस्थिर करण्यासाठी चीन आणि पाक भारतात नक्षलवाद, खलिस्तानी चळवळ यांना खतपाणी घालत आहे. त्याचप्रमाणे भारतानेही या दोन्ही शत्रूदेशांना अस्थिर करण्यासाठी त्यांची मर्मस्थळे शोधून तेथील परिस्थिती अस्थिर ठेवणे आवश्यक आहे. एखाद्या देशात शांतता नांदण्यासाठी तेथील कायदा आणि सुव्यवस्था उत्तम असणे आवश्यक असते. अशा वातावरणात देशाचा विकास किंवा जनतेसाठी राबवण्यात येणारे जनहितकारी प्रकल्प मार्गी लागतात; मात्र जर देशात अराजकसदृश परिस्थिती असल्यास ती हाताळण्यास वेळ, पैसा आणि शक्ती वाया जाते. भारताने शत्रूराष्ट्रांतील अस्थिर परिस्थितीचा लाभ उठवून त्याला जेरीस आणणे आवश्यक आहे. येणार्या काळात भारताला अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही तर्हेच्या शत्रूंशी लढा द्यावा लागेल. जागतिक घडामोडी या भारतासाठी पोषक आहेत. त्याचा १०० टक्के लाभ उठवून शत्रूपेक्षा वरचढ होण्यासाठी भारताने आतापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात