Menu Close

ईश्‍वरप्राप्ती करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया राबवणे आवश्यक : पू. नीलेश सिंगबाळ

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उत्तर अन् पूर्वोत्तर भारत येथील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन

वाराणसी : ईश्‍वरप्राप्ती हेच मनुष्यजन्माचे प्रमुख ध्येय आहे. नामजप, प्रार्थना यांपासून साधनेला प्रारंभ करून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करून आपण साधनेत प्रगती करू शकतो. साधना केल्याने व्यक्ती तिच्या जीवनात येणार्‍या कठीण प्रसंगांना स्थिर राहून तोंड देऊ शकते. अध्यात्मात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांचे विशेष महत्त्व आहे. अहं शेतात उगवणार्‍या तणासारखा आहे, ज्याला संपूर्णत: नष्ट केल्याविना ईश्‍वरीकृपेचे पीक उगवत नाही. त्यामुळे सतत त्याची छाटणी करत रहावी लागते. अहंचा लय करणे, हा साधनेचा उद्देश आहे. त्यामुळे अहं न्यून करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. या समवेतच ईश्‍वराप्रती भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. श्रद्धेसह आपल्याला या साधनापथावर सतत पुढे जात राहिले पाहिजे. आपण सर्वांनी ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या भावाने शिकण्याचा उद्देश ठेवून या सत्संगांना नियमित उपस्थित राहूया. साधनेमुळेच आपले जीवन आनंदी होईल, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले.

कोरोना महामारीमुळे समाजात तणाव, निराशा, चिंता यांचे वातावरण आहे. अशा स्थितीत समाजाचे आत्मबळ वाढवण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ सत्संगांना प्रारंभ करण्यात आला. मागील ८ मासांपासून या सत्संगांचा सहस्रो जिज्ञासू लाभ घेत आहेत. या जिज्ञासूंना साधनेच्या पुढील टप्प्याचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी १२ डिसेंबर या दिवशी उत्तर आणि पूर्वोत्तर भारताच्या जिज्ञासूंसाठी एका ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सनातनचे संतद्वयी पू. प्रदीप खेमका आणि पू. सुनीता खेमका यांची ‘ऑनलाईन’ वंदनीय उपस्थिती लाभली. या सोहळ्याचा लाभ उत्तरप्रदेश, झारखंड, बंगाल, आसाम, बिहार आणि ओडिशा या राज्यांतील अनेक जिज्ञासूंनी घेतला.

या सोहळ्याचा प्रारंभ श्रीकृष्णाच्या श्‍लोकाने करण्यात आला. त्यानंतर सनातन संस्थेचे श्री. गुरुराज प्रभु यांनी सोहळ्याचा उद्देश सांगितला. या वेळी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि त्यांंचे एकमेवाद्वितीय कार्य यांचा परिचय करून देण्यात आला.

वैशिष्ट्यपूर्ण

जिज्ञासूंनी साधनेमुळे त्यांच्या जीवनात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती सांगितल्या. त्या अनुभूतींचे आध्यात्मिक विश्‍लेषण पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले. त्यामुळे उपस्थितांची भावजागृती झाली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *