-
पोलीस आणि प्रशासन मूकदर्शक !
-
अद्याप कुणालाही अटक नाही !
- पाकिस्तान आणि बांगलादेश येथीलच काय, तर जगात कुठेही हिंदूंवर अन्याय होणे, हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी काहीही न केल्याचे फलित !
- हिंदूंनो, पाकमधील हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण होण्यासाठी भारतासह जगातील एकही देश पुढे येत नाही, हे लक्षात घ्या आणि संघटित होण्याचे महत्त्व जाणा !
पाकच नव्हे, तर जगभरातील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी प्रथम भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणे आवश्यक ! - पाकिस्तानकडून हिंदू धर्माप्रती द्वेषाचे भयानक चित्र समोर आले आहे ! शेकडो आततायी धर्मांधांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन तेथील हिंदू मंदिराचा विध्वंस केला आहे. मंदिरातील मूर्तींची तोडफोड करून आगही लावण्यात आली आहे !
करक (पाकिस्तान) : पाकच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील करक जिल्ह्यात शेकडो धर्मांधांच्या जमावाने हिंदूंच्या एका मंदिराची तोडफोड करत ते पेटवून दिले. एका मौलवीच्या नेतृत्वाखाली हे हिंदुद्वेषी कृत्य करण्यात आले. याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. त्यात शेकडो धर्मांध मंदिराच्या भिंती आणि छत पाडतांना, तसेच मंदिराला आग लावतांना दिसत आहेत. ‘जमावाने मंदिराच्या जुन्या ढाच्यासह नवे बांधकामदेखील पाडले’, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिकारी इरफान मरवत यांनी दिली. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. पाकमधील हिंदू प्रत्येक गुरुवारी या मंदिरात दर्शनासाठी येत होते. या घटनेनंतर जगभरातील मानवी हक्क कार्यकर्त्यांकडून तीव्र टीका होत आहे.
‘डेली टाइम्स’च्या वृत्तानुसार येथे पाकमधील सुन्नी देवबंदी राजकीय पक्ष असलेल्या जमीयत उलेमा-ए इस्लाम-फज्ल यांच्याकडून मंदिराजवळ एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रक्षोभक भाषणे करण्यात आली. त्यानंतर धर्मांधांच्या जमावाने मंदिरावर आक्रमण केले.
पाकच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिराचा केला जात होता जीर्णोद्धार !
येथील तेरी गावात असणारे हे मंदिर प्राचीन आहे. येथे वर्ष १९१९ मध्ये परमहंसजी महाराज यांची समाधी बांधण्यात आली. वर्ष १९९७ मध्ये एका मुफ्तीच्या आदेशावरून धर्मांधांनी या मंदिरावर आक्रमण करत त्याची तोडफोड केली होती. तेव्हापासून हिंदू या मंदिराच्या उभारणीसाठी न्यायालयीन लढा देत होते. वर्ष २०१५ मध्ये पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने मंदिराच्या जीर्णोद्धाराला आणि विस्तार करण्याला अनुमती दिली होती. त्यानुसार येथे बांधकाम चालू असतांना आता पुन्हा धर्मांधांकडून हे आक्रमण करण्यात आले.
पोलीस आणि प्रशासन मूकदर्शक !
१. याविषयी कराचीतील पत्रकार मुबाशीर झैदी यांनी ट्वीट करून म्हटले, ‘स्थानिक मौलवींच्या नेतृत्वाखाली मंदिर पाडण्यात आले. या मंदिराच्या उभारणीसाठी स्थानिक हिंदूंनी प्रशासनाची पूर्वअनुमती घेतलेली होती; तरीही हे मंदिर उद्ध्वस्त केले जात असतांना पोलीस आणि प्रशासन मूकदर्शक बनले होते.’
२. लंडनमधील मानवी हक्क कार्यकर्ते शमा जुनैजो यांनी म्हटले की, हा ‘नवा पाकिस्तान’ आहे. हा लज्जास्पद दिवस असून हे कृत्य निंदेच्याही पलीकडे आहे. हा जमाव ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत होता; म्हणूनच पोलिसांनी त्यांना अडवले नाही, ही एक लज्जास्पद गोष्ट आहे.
३. मानवीहक्क कार्यकर्ते इहतेशाम अफगाण यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांना कसे वागवले जाते, याचेच हे ठळक उदाहरण आहे.
४. पाकिस्तानच्या मानवी आयोगाचे सचिव लालचंद माल्ही यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. ‘काही समाजविघातक शक्ती पाकिस्तानची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने त्यांना थारा देऊ नये. जिल्हा प्रशासनाने याविषयी तातडीने गुन्हा नोंद करून दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी’, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मंदिरावरील आक्रमण दुर्दैवी ! – खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान
‘मंदिरावरील आक्रमण आणि तोडफोड दुर्दैवी आहे’, असे खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी म्हटले. (मेहमूद खान यांचे नक्राश्रू ! पाकमधील नेते आणि राजकारणी हे कधीही हिंदूंचे हित पहात नाहीत. त्यामुळेच तेथे हिंदूंवर अत्याचार होत आहेत ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
(वरील चित्रे आणि व्हिडीओ प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. वस्तुस्थिती कळावी यासाठी प्रसिद्ध केली आहेत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
त्यांनी या प्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागितला असून दोषींना तत्काळ अटक करण्याचा आदेश दिला आहे. ‘या घटनेमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत’, असे हिंदु समुदायाचे नेते पेशावर हारून सरबयाल यांनी म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात