Menu Close

बाणगंगेच्या ऐतिहासिक जलस्रोताला दूषित करणार्‍या खोदकामाला महापौरांकडून स्थगिती !

‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्ट’ यांच्या मागणीला यश !

मुंबई – हिंदूंचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा असलेल्या वाळकेश्‍वर येथील बाणगंगा जलकुंडाच्या जवळ खासगी विकासकांकडून इमारतीचे बांधकाम चालू आहे. त्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे बाणगंगा कुंडातून नैसर्गिकरित्या येणारे निर्मळ पाणी पूर्णत: गढूळ होऊन हा जलस्रोत दूषित झाला आहे. या बांधकामामुळे भविष्यात हा ऐतिहासिक जलस्रोत कायमचा लुप्त होण्याचा धोका आहे. त्यामुळे हे बांधकाम आणि त्यासाठी चालू असलेले खोदकाम यांना तत्परतेने अन् कायमस्वरूपी स्थगिती द्यावी, अशी मागणी ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्ट’ यांच्यासह अन्य संघटनांच्या वतीने मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली होती. या मागणीनंतर महापौरांनी तातडीने प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन बाणगंगा तलावाची पाहणी केली. खोदकामामुळे बाणगंगेचा जलस्रोत दूषित होत असल्याने संबंधित विकासाने भूगर्भशास्त्रज्ञाचा अहवाल मुंबई महापालिकेला सादर करेपर्यंत सदर काम ‘‘जैसे थे’’ ठेवण्याचे निर्देश महापौरांनी दिले. या भेटीच्या वेळी महापालिकेच्या ‘ड’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड, सचिव शशांक गुळगुळी, प्रकल्प अधिकारी ऋत्विक औरंगाबादकर, ‘गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. प्रवीण कानविंदे आणि ‘हिंदु जनजागृती समिती’चे श्री. सतीश सोनार उपस्थित होते.

या वेळी बोलतांना महापौर सौ. पेडणेकर म्हणाल्या, ‘‘बाणगंगेच्या जवळ चालू असलेल्या बांधकामामुळे बाणगंगेचा जलस्रोत दूषित होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यात हिंदु जनजागृती समितीने तक्रार दिली आहे. बाणगंगा हा ऐतिहासिक आणि प्राचीन ठेवा आहे. हा ऐतिहासिक ठेवा पुसू नये. हा नैसर्गिक जलस्रोत जिवंत राहावा म्हणून महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाद्वारे नोटिस देऊन ते बांधकाम ‘‘जैसे थे’’ ठेवण्यास सांगण्यात आले आहे. भूगर्भशास्त्रज्ञाचा अहवाल आल्यावर हा नैसर्गिक जलस्रोत कायमस्वरूपी जिवंत ठेवण्याविषयी पुढील निर्णय प्रक्रिया राबवण्यात येईल. बांधकाम व्यावसायिक तेथे जर रात्रीचे काम करत असेल, तर त्यांच्यावर महापालिका कायद्यान्वये कारवाई केली जाईल.’’ 31 डिसेंबर या दिवशी समितीने तक्रार दिल्यावर महापौरांनी तत्परतेने कारवाई केल्यामुळे समितीने त्यांचे आभार मानले आहेत.

प्रभु श्रीरामाने येथे वाळूपासून भगवान शिवाची पिंड (श्री वाळुकेश्‍वर) तयार केल्यावर त्यावर अभिषेक करण्यासाठी पाणी नव्हते. आजूबाजूला समुद्राचे खारे पाणी होते; म्हणून श्रीरामाने बाण मारून येथे गंगेची जलधारा आणली. म्हणून या तलावाला ‘बाणगंगा’ आणि या क्षेत्राला वाळकेश्‍वर नाव पडले. येथे शिवाचे आणि अन्य देवतांची मोठी मंदिर, तसेच मठ आहेत. दूरवरून लोक दर्शनासाठी येथे येतात. नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिक वारसा असलेल्या राज्यातील प्राचीन मंदिरांचे संवर्धन करण्यासाठी राज्यशासन योजना आणणार असल्याचे घोषित केले होते. त्यामुळे महापौरांनी तत्परतेने या विषयात लक्ष घातल्याची जनमानसात भावना आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *