Menu Close

आंध्र नव्हे, ख्रिस्तीप्रदेश !

आंध्रप्रदेशमध्ये वाय.एस्.आर्.सी.पी. या पक्षाचे सरकार असून पक्षाध्यक्ष जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी त्यांचे वडील वाय.एस्. राजशेखर रेड्डी काँग्रेसचे सरकार असतांना राज्याचे मुख्यमंत्री होते. रेड्डी कुटुंबाने ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला आहे. राजशेखर रेड्डी यांच्या, तसेच आता जगनमोहन यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात हिंदूंच्या मंदिरांचे ख्रिस्तीकरण केले जात आहे, त्यांच्यावर आक्रमणे होत आहेत, अशा घटना घडल्या आहेत आणि घडत आहेत. मंदिरांवरील आक्रमणांमुळे राज्यातील वातावरण संतप्त आहे. दोन दिवसांपूर्वी श्रीराममंदिरातील भगवान श्रीरामाच्या मूर्तीचे शिर अज्ञातांकडून तोडण्यात आल्याची घटना घडल्यानंतर पुन्हा एका मंदिरावर आक्रमण करून देवतेच्या मूर्तीचे हात तोडण्यात आले आहेत. ‘गेल्या दीड वर्षांत १२० हून अधिक मंदिरांवर आक्रमणे झाली’, असा आरोप तेलुगु देसम् पक्षाचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांनी केला आहे. काही वर्षांपूर्वी गोव्यामध्ये काँग्रेसचे सरकार असतांना हिंदूंच्या अनेक लहान मंदिरांवर म्हणजे घुमटींवर आक्रमणे झाली आणि त्यांची तोडफोड करण्यात आली होती. काँग्रेसचे सरकार गेल्यानंतर या घटना थांबल्या. आताही आंध्रप्रदेशमध्ये रेड्डी यांचे सरकार आल्यानंतर या घटना घडू लागल्या आहेत. त्यापूर्वी या घटना घडत नव्हत्या, हे विशेष.

‘आंध्रप्रदेश बहुसंख्य हिंदू असणारे राज्य असतांना तेथे अशा प्रकारच्या घटना घडतातच कशा?’, असा प्रश्‍न कोणत्याही अन्य धर्मियाला वाटू शकतो, तर मग हिंदूंना का वाटत नाही ?आणि तेही याविरोधात पेटून कसे उठत नाहीत ?’, असा प्रश्‍न उपस्थित होतो. देशातील प्रसारमाध्यमे अशा घटना दडपून टाकत असल्याने देशभरातील हिंदूंना याविषयी विशेष माहिती मिळत नाही. सामाजिक माध्यमांतून याविषयी थोडीफार माहिती मिळते. त्यामुळे अनेक हिंदू अशा घटनांविषयी अनभिज्ञ आहेत. उलट पाकमध्ये हिंदूंचे मंदिर धर्मांधांनी पाडल्याची माहिती लगेच जगभरात पोचते, हे विशेष. तरीही त्या घटनेचा जगभरातील हिंदूंकडून विशेषतः भारतातील हिंदूंकडून किंवा त्यांच्या संघटना आणि पक्ष यांच्याकडून हवा तसा विरोध किंवा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत नाही, हीसुद्धा हिंदूंना एक लज्जास्पद गोष्ट आहे. अशी घटना एखाद्या चर्च किंवा मशीद यांच्याविषयी घडली असती, तर जगभरातील ख्रिस्ती आणि मुसलमान यांनी आकाशपाताळ एक केले असते; मात्र हिंदूंनी असे काहीही केलेले नाही. विदेशातील घटनेविषयी ते काही करत नाहीत आणि भारतातील घटनांविषयी ते काही करत नाही; मग देवाने तरी अशा हिंदूंचे आपत्काळात का रक्षण करावे ?, असा प्रश्‍न पुन्हा उपस्थित होतो. जगनमोहन यांच्या पक्षाचे आमदार आणि सरकारमधील मंत्री रघु रामकृष्ण राजू यांनी काही मासांपूर्वीच सांगितले होते, ‘आंध्रप्रदेशात सरकारी आकडेवारीनुसार ख्रिस्त्यांची संख्या २.५ टक्के असली, तर प्रत्यक्षात राज्यात २५ टक्के लोक ख्रिस्ती आहेत.’ यातून ‘या २५ टक्क्यांमधील लोकांकडून मंदिरांवर आक्रमणे होत आहे’, असा आरोप कुणी केला, तर त्याला चुकीचे कसे म्हणता येईल ?

केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा !

भारतीय लोकशाही निधर्मी असल्याने देशात धार्मिक भेदभाव करता येत नाही. हिंदु धर्माच्या शिकवणीमुळे हिंदु व्यक्ती कधीही धर्मानुसार भेदभाव करत नाही. त्याच्या वृत्तीतच ही गोष्ट नाही. ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ असा हिंदूंचा व्यापक दृष्टीकोन आणि भाव असतो. त्यामुळेच हिंदूंनी कधी अन्य धर्मियांवर आक्रमण केली किंवा त्यांची हेटाळणी केली, त्यांच्यावर अत्याचार केले, असा इतिहास, वर्तमान नाही आणि भविष्यातही तसे होणार नाही; मात्र याच्या उलट हिंदु धर्मावर आणि हिंदु धर्मियांवर अन्य धर्मियांकडून गेली एक सहस्र वर्षे आक्रमण आणि अत्याचार झाले, आजही होत आहेत. मोगलांच्या आक्रमणांमध्ये लाखो हिंदु मंदिरांची तोडफोड करण्यात आली, तर अनेकांना इस्लामी ओळख देण्यात आली. काही मंदिरे परत मिळवण्यासाठी हिंदूंकडून न्यायालयीन लढाई दिली जात आहे. आंध्रप्रदेशात आजही हिंदूंची मंदिरे तोडली जातात, हे आताच्या काळात हिंदूंना लज्जास्पद आहे. तेही राज्याचे मुख्यमंत्री ख्रिस्ती असतांना होत आहे. येथे कुठल्याही धर्माचा द्वेष करणे नसून ‘त्यांच्याच कार्यकाळात ते का होते आणि जगनमोहन रेड्डी इतक्या घटना घडल्यानंतरही का गप्प आहेत ?’, असा प्रश्‍न उपस्थित होतो. ‘ही आक्रमणे ठरवून केली जात आहेत का ?’ ‘यामागे टोळी आहे का ?’ असे अनेक प्रश्‍न उपस्थित होतात. समजा आंध्रमधील एखाद्या चर्चमध्ये तोडफोड करण्यात आली असती, तर जगनमोहन असेच गप्प राहिले असते का ? आणि चर्च संस्थांनीही मौन पाळले असते का ? हे एकीकडे चालू असतांना जगनमोहन यांनी त्यांचे काका सुब्बा रेड्डी यांना हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र तिरुपती मंदिराचे प्रमुख केले आहे. सुब्बा रेड्डी म्हणतात ‘मी धर्मांतर केलेले नाही.’ असे असले, तरी ‘पुतण्याने सांगितलेले ते ऐकणार नाहीत’, असे म्हणता येऊ शकत नाही. जगनमोहन रेड्डी यांचे वडील मुख्यमंत्री असतांना त्यांनी या मंदिराच्या लाडू बनवण्याचे कंत्राट ख्रिस्त्याला दिले होते, तसेच येथे ख्रिस्ती कर्मचार्‍यांची भरती केली होती. त्या वेळी हिंदूंनी काही प्रमाणात विरोध केला होता; मात्र त्याला त्यांनी दाद दिली नव्हती. ही भारतीय निधर्मी लोकशाहीची शोकांतिकाच म्हणावी लागेल. ज्या वेळी हिंदू म्हणून एखादी व्यक्ती सत्तेवर असते, तेव्हा ती नेहमीच धर्मनिरपेक्षतेचे पालन करते. त्यासाठी ती नेहमीच अन्य धर्मियांना झुकते माप देत हिंदूंकडे दुर्लक्ष करत असते. याउलट जेव्हा जेव्हा अन्य धर्मीय व्यक्ती सत्तेवर असते, तेव्हा ती स्वधर्मियांकडे अधिक लक्ष देते आणि हिंदूंकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते, हे पहायला मिळत आहे. याविरोधात हिंदूंनी आवाज उठवला, तर त्यांना धर्मांध, जातीयतावादी, तालिबानी अशा उपमा देऊन त्यांचे खच्चीकरण केले जाते. हे लोकशाहीला मारक आहे. त्यातून पुढे हिंदूंना उद्रेक झाला, तर आश्‍चर्य वाटू नये. काँग्रेस, समाजवादी पक्ष आदी राजकीय पक्षांच्या हिंदुविरोधी आणि मुसलमानप्रेमी धोरणांमुळे आज काही प्रमाणात जागृत झालेल्या हिंदूंनी त्यांना सत्तेवरून हाकलले आहे; मात्र अद्यापही या पक्षांना त्याची जाणीव झालेली नाही. आंध्रप्रदेशातही उद्या हिंदूंनी असे केल्यास आश्‍चर्य वाटू नये. हिंदूंनी ते केलेच पाहिजे. भाजपने जगनमोहन सरकारला पाठिंबा दिला आहे. हे पहाता केंद्रातील भाजप सरकारनेही या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारवर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यातून हिंदूंच्या धार्मिक स्थळांचे रक्षण होईल, अशी अपेक्षा करू शकतो. अन्यथा उद्या आंध्रप्रदेश ‘ख्रिस्तीप्रदेश’ म्हणून ओळखला जाऊ लागला, तर आश्‍चर्य वाटू नये !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *