Menu Close

नेपाळला पुन्हा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी आम्ही मरायला आणि मारायला सिद्ध: नेपाळचे माजी उपपंतप्रधान

काठमांडू (नेपाळ) : नेपाळला पुन्हा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी मी आणि माझे कार्यकर्ते मरण्यास किंवा मारण्यास सिद्ध आहोत, असे विधान नेपाळचे माजी उपपंतप्रधान कमल थापा यांनी येथील एका सभेमध्ये बोलतांना केले. हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी काठमांडू येथे मोठ्या संख्येने हिंदूंनी मोर्चा काढला होता. त्याचे रूपांतर शेवटी सभेत झाल्यावर थापा बोलत होते. या मागण्या पूर्ण होईपर्यंत देशात निदर्शने करण्याची चेतावणीही त्यांनी दिली.

थापा पुढे म्हणाले की, प्रारंभी ही केवळ आमचीच मागणी होती; मात्र आता जनताही या मागणीसाठी पुढे येत आहे. लोकांना पुन्हा हिंदु राष्ट्राची आवश्यकता असून ते  त्याविषयी बोलत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सर्वपक्षांनी एकत्र येऊन बैठक करून चर्चा करायला हवी. अन्य राजकीय पक्ष संसद विसर्जित होण्याकडे गांभीर्याने पहात नाहीत. यामुळे देश अंधःकाराच्या दिशेने जात आहे. नुकतेच भारत आणि चीन येथील अधिकारी समस्या सोडवण्यासाठी नेपाळमध्ये आले होते. ‘आम्ही काय करायला हवे ?’, हे ठरवण्याचा अधिकार आपण दुसर्‍यांना देऊ शकत नाही.

डिसेंबर २०२० पासून हिंदु राष्ट्रासाठी आंदोलन प्रारंभ

नेपाळमध्ये डिसेंबर २०२० पासून देशात पुन्हा राजेशाही आणण्यासाठी आणि देशाला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी आंदोलन चालू करण्यात आले आहे. याला नेपाळमधील राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी आणि राजेशाहीचे समर्थक यांचे समर्थन मिळत आहे. नेपाळच्या गृहमंत्रालयाने देशातील ७७ जिल्ह्यांमध्ये चालू असलेली आंदोलने थांबवण्याचे आवाहन केले आहे अन्यथा बळाचा वापर करण्यात येईल, अशी चेतावणीही दिली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *