या अन्वेषणातून खरे आरोपी सापडू देत, अशीच हिंदूंची अपेक्षा !
अमरावती (आंध्रप्रदेश) : राज्यात मंदिरांवर होत असलेल्या आक्रमणांची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली १६ सदस्यांचे एक विशेष अन्वेषण पथक स्थापन करण्यात आले आहे. सप्टेंबर २०२० पासून झालेल्या आक्रमणांची हे पथक चौकशी करणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या विजयवाडा विभागाचे अतिरिक्त महासंचालक अशोक कुमार यांना याचे प्रमुख करण्यात आले आहे. हे पथक थेट मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करणार आहे. या पथकात १ पोलीस अधीक्षक, २ अतिरिक्त पोलीस अधीक्षक, २ उपअधीक्षक, २ साहाय्यक पोलीस आयुक्त, तसेच अन्य पोलीस अधिकारी असणार आहेत.
सरकारने म्हटले की, मंदिरांवर झालेली आक्रमणे आणि मूर्तींची तोडफोड या घटनांमुळे राज्यातील धार्मिक शांतता भंग करण्यात आली आहे. यामुळे या चौकशी समितीची स्थापना करण्यात येत आहे. या समितीतील सर्व पोलीस अधिकार्यांना योग्य सुविधा पुरवण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच गुप्तचर विभागालाही या समितीला साहाय्य करण्याचा आदेश देण्यात आला आहे. हे पथक आक्रमणांच्या पद्धतीचा अभ्यास करून चौकशी करणार आहे.
मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मंदिरांची ठेवली आधारशिळा आणि भूमीपूजन
मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी विजयवाडा येथे मंदिरांच्या उभारणीसाठी आधारशिळा ठेवली. यात आंजनेय स्वामी, राहु-केतु, सीतम्मावरी आणि वेणुगोपाल मंदिर यांचा समावेश आहे.
याखेरीच मुख्यमंत्री रेड्डी यांनी कनकदुर्गा मंदिर परिसरातील ८ मंदिरांचे भूमीपूजन केले. यासाठी ७७ कोटी रुपये खर्च येणार आहेत. ३ जानेवारीला विजयवाडामध्येच सीताराम मंदिरातील माता सीतादेवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात