Menu Close

‘अलीबाबा’ लुटणारे ‘चिनी’ चोर !

अलीबाबा’ या जगविख्यात ई-कॉमर्स क्षेत्रात कार्यरत असलेल्या चिनी आस्थापनाचे सर्वेसर्वा जॅक मा मागील २ मास ‘गायब’ आहेत. त्यांना चीनच्या साम्यवादी सरकारने ठार मारले कि कारागृहात डांबले आहे, याचा थांगपत्ता लागलेला नाही. मा यांनी मागील काही मास ज्या पद्धतीने चीनच्या साम्यवादी सरकारवर आणि त्याही पुढे जाऊन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर ‘हल्लाबोल’ केला होता, त्यावरून ‘असे काही तरी होणारच होते’, असा कयास बांधला जात होता. शांघायमधील त्यांच्या एका भाषणात जॅक मा यांनी ‘देशात संशोधनाला वाव मिळत नाही. चीन अजूनही जुन्या लोकांचा ‘क्लब’ आहे. आपण आपली सध्याची आर्थिक व्यवस्था पालटण्याची आवश्यकता आहे’, असे मत व्यक्त केले होते. ही वक्तव्ये करतांना त्यांनी थेट जिनपिंग यांचे नाव घेतले होते. चीनमध्ये जिनपिंग यांच्या विरोधात बोलणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे आहे. जिनपिंग यांनी मागील काही वर्षांत चीनमधील कायद्यांमध्ये फेरफार करून स्वतःकडे अनिर्बंध सत्ता कशी राहील, यासाठी धूर्तपणे चाली खेळल्या. भ्रष्टाचाराला विरोध करण्याच्या नावाखाली स्वतःच्या विरोधकांना त्यांनी अक्षरशः संपवले.

‘स्वतःचा एकही विरोधक शिल्लक रहाणार नाही आणि असला, तर त्याची जागा कारागृहात असेल’, याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले. त्यामुळे जॅक मा भविष्यात सार्वजनिक जीवनात दिसतील, याची शाश्‍वती अल्प आहे; कारण याआधी चिनी उद्योगपती ‘गायब’ होण्याचे प्रकार घडले आहेत. ‘डेलियन वांडा ग्रुप’चे वांग जियानलिन, ‘अनबंग इन्शुरन्स ग्रुप’चे वु शियाहुई, ‘टुमॉरो ग्रुप’चे शिओ जिआनहु आदी उद्योगपती सध्या कारागृहात खितपत पडले आहेत किंवा ‘काहींचे पुढे काय झाले’, हे त्यांच्या कुटुंबियांनाही अजून कळलेले नाही. मागील २ मासांत जॅक मा यांची संपत्ती ६० बिलियन डॉलर वरून १६ बिलियन डॉलर एवढी घसरली आहे. हे अचानक झालेले नाही. त्यांना संपवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले जात असतील, याची ही झलक आहे. या घटनांचा ऊहापोह करण्याचे कारण म्हणजे आपल्या शत्रूराष्ट्राचा प्रमुख किती महत्त्वाकांक्षी, हुकूमशाही वृत्तीचा आणि सत्तापिपासू आहे, हे या सर्व घटनाक्रमातून दिसून येते. चीनला प्रारंभीपासून भारताची प्रगती खुपते. त्यामुळेच भारताला घेरण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करतांना दिसतो. चीनला प्रगतीपथावर नेणार्‍या उद्योगपतींना संपवणारे जिनपिंग भारताला संपवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे या घटनेकडे डोळेझाक करून चालणार नाही.

लोकशाहीचे मूल्य ओळखा !

भारतियांनी जॅक मा यांच्याविषयी अश्रू ढाळण्याची तशी आवश्यकता नाही; कारण चिनी आस्थापने या भारतीय बाजारपेठेत वर्चस्व गाजवून येथील बाजारपेठ कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला चीन सरकारचीही फूस आहे. असो. जॅक मा हे जगातील पहिल्या धनाढ्यांपैकी एक होते. तरीही चीनने त्यांच्यावर कारवाई केली. हा पैलू भारतियांसाठी महत्त्वाचा आहे. भारतात भ्रष्टाचार्‍यांची कमतरता नाही. विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहूल चोक्सी आदी उद्योगपती मंडळींनी भारताला लुटले आणि ते देश सोडून पसार झाले. त्यांच्यावर कारवाई का होत नाही ? जॅक मा यांच्याकडे एवढा पैसा असतांनाही ते चीन सोडून अन्य देशात आश्रय घेऊ शकले नाहीत. ‘भारतीय व्यवस्थेत मात्र प्रशासन, पोलीस आदी ठिकाणी पैसा फेकल्यास स्वतःची कुकर्मे झाकता येतात’, हे भ्रष्टाचार्‍यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच मल्ल्या, मोदी, चोक्सी यांच्यासारख्यांचे फावते. सरकारी यंत्रणांकडे अधिकार, शक्ती आणि मनुष्यबळ असतांनाही भारतातील भ्रष्टाचार संपत नाही आणि भ्रष्टाचारी मोकाट आहेत. चीनमध्ये राष्ट्राला प्रगतीपथावर नेणारा उद्योगपती ‘गायब’ होतो, तर भारतात देशाला आर्थिक खाईत लुटणारे उद्योगपती मोकाट फिरतात, हे संतापजनक होय.

जॅक मा यांनी ९० च्या दशकात उद्योगक्षेत्रात पाऊल ठेवले. त्या काळी चीन आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी झटत होता. चीनच्या भांडवलशाही धोरणाचा जॅक मा हे तोंडवळा असल्याचे बोलले जाते. याचा अर्थ जॅक मा यांनी चीनला फसवले नाही, तर त्याच्या उत्कर्षात हातभार लावला; मात्र केवळ सरकारच्या विरोधात बोलल्यामुळे त्यांना जिनपिंग यांच्या कोपाला सामोरे जावे लागले. भारतात बोलण्याचे, लिहिण्याचे, (अती)स्वातंत्र्य आहे. त्याचा अपलाभ घेऊन राष्ट्रघातकी लोक भारतविरोधी बोलतांना आणि कृती करतांना दिसतात. चीनसारखी हुकूमशाही नकोच; मात्र अशांवर वचक बसण्यासाठी कायदे आणि त्यांची तात्काळ कारवाई होणे आवश्यक आहे.

चीनला चुका करू द्या !

फ्रेंच योद्धा नेपोलियन बोनापार्ट याचे प्रसिद्ध वाक्य आहे, ‘शत्रू चुका करत असेल, तर त्याला रोखू नका, त्याला चुका करू द्या !’ शी जिनपिंग अशाच प्रकारे घोडचुका करत सुटले आहेत. एखाद्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सरकार त्यासाठी धोरणे राबवू शकते; मात्र त्यांची कार्यवाही होण्यासाठी त्या देशातील सर्वच स्तरांतील लोकांचा हातभार असावा लागतो. सद्सद्विवेकबुद्धी गमावलेल्या शी जिनपिंग हे समजण्याच्या आणि समजावण्याच्या पलीकडे गेले आहेत. जॅक मा यांची अपकीर्ती करण्यासाठी जिनपिंग यांनी प्रसारमाध्यमांना हाताशी धरून ‘जॅक मा हे गरिबांचे शोषण करणारे आहेत’, अशी अपकीर्ती करण्यास आरंभ केला आहे; मात्र त्याचा कितीसा परिणाम होणार ? सत्य कधीतरी बाहेर येणारच. जिनपिंग यांना चीनमधील उद्योगक्षेत्र स्वतःच्या कह्यात घ्यायचे आहे. सरकारची ध्येयधोरणे उद्योगपतींनी मुकाट्याने अवलंबावीत, असे धोरण तेथे राबवले जात आहे. चीनमध्ये उद्योगपतींना संपवण्याचा परिणाम तेथील अर्थकारणावर नक्कीच पडणार. त्यामुळे ‘अलीबाबा’चे काय होणार ?’ याची चिंता भारतियांनी करू नये !  कारण चीनच्या अर्थकारणाला भगदाड पडले, तर ते भारताच्या पथ्यावर पडेल.

‘अलीबाबा आणि चाळीस चोरां’च्या कथेचा आस्वाद आपल्यापैकी बर्‍याच जणांनी लहानपणी घेतला असेल. आता ‘अलीबाबा आणि ‘चिनी’ चोरा’च्या कथेला आरंभ झाला आहे. या कथेचाही राष्ट्रप्रेमी भारतियांनी आस्वाद घ्यावा; कारण वेळ, शक्ती, पैसा न वापरता शत्रूचे स्वतःच्या कर्माने अधःपतन होत असेल, तर ते कुणाला नको आहे ? ‘अलीबाबा’ची ही चिनी कथा भारतियांना सुखावणारी आहे !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *