-
भाजप खासदार तापिर गाओ यांचा दावा
-
चीनने अरुणाचल प्रदेशातील भारतीय सीमेत घुसखोरी करून वसवले गाव !
काँग्रेसच्या काळात झालेल्या चुका भाजपच्या राज्यात सुधारणे आवश्यक आहेत, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
ईटानगर (अरुणाचल प्रदेश) : १९८० च्या दशकापासून चीन सतत भारतीय भूभागांवर नियत्रंण मिळवत आहे. चीनकडून गावे वसवणे, सैनिकी छावणी बांधणे ही काही नवीन गोष्ट नाही. काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे संपूर्ण देशाला याची किंमत मोजावी लागत आहे, असा आरोप भाजपचे खासदार तापिर गाओ यांनी केला आहे. चीनने अरुणाचल प्रदेशमधील भारताच्या हद्दीत घुसखोरी करून एक गाव वसवल्याची माहिती समोर आली आहे. या गावामध्ये सुमारे १०१ घरे असल्याचे दिसत आहेत. हे गाव भारताच्या प्रत्यक्ष सीमेपासून साडे चार किलोमीटर आत वसले असल्याचा दावा करण्यात आला आहे. सरकारी मानचित्रानुसार हा भाग भारतीय सीमेमध्ये येतो; मात्र वर्ष १९५९ पासून त्यावर चीनने नियंत्रण मिळवलेले आहे. पूर्वी येथे केवळ चिनी सैन्याची चौकी होती; मात्र नव्या छायाचित्रात येथे गाव वसवण्यात आल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गाओ यांनी वरील आरोप केला आहे.
चीनने अरुणाचल प्रदेशमधील भारताच्या हद्दीत घुसखोरी करून वसवलेले एक गाव
तापिर गाओ म्हणाले की, अरुणाचल प्रदेशमधील सीमेपर्यंत पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्याचे काम काँग्रेस सरकारकडून करण्यात आलेले नाही. यामुळे ३ – ४ किलोमीटरचा बफर झोन सुटला. यावर आता चीनकडून नियंत्रण मिळवले जात आहे. या उलट चीनने १९८० च्या दशकापासून या भागात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यावर भर दिला. एवढेच नव्हे, तर लोंग्जू आणि माजा या भागांपर्यंत रस्ते बांधणी केली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात चीनने तवांग येथील सुमदोरोंग चू खोर्यावर नियंत्रण मिळवले. तत्कालीन सैन्यदलप्रमुखांनी एका मोहिमेची आखणीही केली होती; मात्र सरकारने त्यांना अनुमती दिली नाही.
(सौजन्य : Times Now )
भारतही सीमेवर स्वतःची मूलभूत यंत्रणा बळकट करत आहे ! – परराष्ट्र मंत्रालय
परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण देतांना म्हटले आहे, ‘आम्ही भारताच्या सीमांवर चीन गाव वसवत असल्याच्या बातम्या पाहिल्या आहेत. अशा वादग्रस्त ठिकाणांची निर्मिती चीन गेली अनेक वर्षे करत आहे. याचेच उत्तर म्हणून भारतही सीमेवर स्वतःची मूलभूत यंत्रणा बळकट करत आहे. आम्ही रस्ते, पूल अशा गोष्टींची उभारणी करत आहोत. यातून लोकांच्या भविष्यातील समस्या सुटतील. सीमावर्ती प्रदेशांवर सतत लक्ष ठेवले जात आहे. देशाचे सावभौमत्व आणि सीमांची अखंडता टिकवून ठेवण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत. सरकार सीमावर्ती भागात विविध गोष्टी उभारण्यासाठी कटीबद्ध आहे. यातून स्थानिकांचे आयुष्य सुसह्य होईल. यात अरुणाचल प्रदेशाचाही समावेश आहे.’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात