Menu Close

‘टुकडे आणि तैमुर गँग’ला दणका !

‘तांडव’ या वेब सिरीजमध्ये विवेकानंद विश्‍वविद्यालयाच्या कार्यक्रमातील नाटकात भगवान शिव आणि नारदमुनी या दोघांचेही विडंबन दाखवण्यात आले आहे. या दोन्ही पात्रांना पाश्‍चात्त्य पेहेरावात दाखवले आहे. ‘शिव’ नावाच्या पात्राच्या चेहर्‍यावर निळ्या रंगाचा क्रॉस रंगवला आहे. शिवाच्या वेशातील हे पात्र विद्यार्थ्यांना म्हणते, ‘तुम्हाला कुणापासून स्वातंत्र्य पाहिजे ?’ तेव्हा विद्यार्थी म्हणतात ‘आम्हाला सरंजामशाही, जातीवाद, भ्रष्टाचार आदींपासून स्वातंत्र्य पाहिजे.’ त्यावर शिवाचे पात्र म्हणते, ‘स्वातंत्र्य ‘देश तोडून नव्हे, तर देशात राहून हवे आहे’ हे त्यांना समजावून सांगा.’ हा संवाद वरवर दिसायला योग्य वाटतोे; परंतु तो देशद्रोह्यांचा भरणा असणार्‍या ‘जे.एन्.यू.’ विद्यापिठातील देश तोडण्याची भाषा करणार्‍या ‘टुकडे गँग’चे हे समर्थन आहे, हे कुणालाही सहज लक्षात येते. यातील ‘त्यांना’ म्हणजे कोण आहेत ? तर ‘टुकडे गँग’ला विरोध करणारे तमाम राष्ट्रभक्त आहेत. एकीकडे हिंदूंच्या देवतांचे विडंबन करायचे आणि त्यांच्याच तोंडून देशद्रोह्यांचे समर्थन करून राष्ट्र अन् धर्म प्रेमी हिंदु जनतेवर मोठा आघात करण्याचे धूर्त चातुर्य अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली लेखक, निर्माते, दिग्दर्शक यांनी ‘तांडव’ या वेब मालिकेतून दाखवले आहे. यावर आता प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या कारवाईमुळे असे करणार्‍या ‘सर्वच मंडळींनी यातून धडा घ्यावा’, अशी त्यांच्यासाठी चेतावणी ठरली, तर चांगले होणार आहे. या मालिकेत पंतप्रधानपदाची अस्मिताही धुळीला मिळवली आहे, हेही त्याला महत्त्वाचे कारण ठरले आहे. यानिमित्ताने का होईना भाजपने हिंदूंच्या श्रद्धास्थानाच्या अवमानाचे सूत्र एवढ्या जोरकसपणे उठवले आहे. उमर खालीद याला सोडण्याची मागणी करणारे सैफ अली खान यांनी रावणाला न्याय देण्याची भाषा केली आहे, हेही इथे विसरून चालणार नाही.

ठासून भरलेला राष्ट्रद्रोह !

‘व्ही.एन्.यू.’ असे ‘जे.एन्.यू.’शी साधर्म्य दाखवणारे नाव या मालिकेत का दिले आहे ? याचा अर्थ जे.एन्.यू.चे उदात्तीकरणच यात करायचे आहे, असेच सरळ लक्षात येत नाही का ? या विद्यापिठाच्या नाटकात ‘सामाजिक माध्यमातून श्रीरामाचे अनुयायी वाढत आहेत’, असे नारदमुनी झालेले पात्र भगवान शिव झालेल्या पात्राला म्हणते. याचा अर्थ थेट हिंदुत्वनिष्ठ संघटनांशी येतो की, जो आक्षेपार्ह आहे. यात शेतकरी आंदोलनात पोलीस दोन मुसलमान व्यक्तींना गोळी घालतात. यातून दर्शकांना काय दाखवायचे आहे ? मोदी सरकारचे पोलीस मुसलमानांवर असा अन्याय करत आहेत, असे दाखवायचे आहे, असाच याचा अर्थ होत नाही का ? मोदी शासनाने शाहीनबाग आंदोलन २ मास चालू दिले. त्या काळात देहलीत मोठी दंगल झाली. त्यात हिंदूंची अपरिमित हानी झाली, तरी आंदोलन बंद केले नाही. शेतकर्‍यांचे आंदोलनही १ मास उलटून गेला, तरी चालू आहे. असे असतांना अशा प्रकारचे खोटे चित्रीकरण करणारे ‘दंगलीत आणि अशा आंदोलनात राष्ट्रद्रोही काय करतात ?’, त्याचे चित्रीकरण दाखवण्याचे धैर्य दाखवणार का ? जे.एन्.यू. विद्यापिठातील कित्येक अपप्रकार आणि देशद्रोही वातावरण दाखवण्याचे धैर्य या मालिकेच्या निर्मार्त्यांमध्ये नाही. कलेच्या अभिव्यक्तीच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धांच्या विडंबनासमवेतच आता देशद्रोही विचारसरणीचा उदो उदो दाखवण्याची नवरूढी चित्रपट आणि वेब सिरीज यांत निर्माण झाली आहे.

राष्ट्र आणि धर्म द्रोह्यांना धडा !

‘विवादात रहाणे’ हे सध्याच्या चित्रपटांच्या सफलतेचे लक्षण मानले जाते. तेच या मालिकेविषयी झाले आहे. ‘ओटीटी (ओव्हर द टॉप) मिडिया सर्व्हिस’ म्हणजे थेट इंटरनेटच्या माध्यमातून लोकांपर्यंत येणार्‍या या सुविधेला केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाची (सेन्सॉर बोर्डाची) बंधने नाहीत. ‘ओटीटी’ माध्यमासाठीही ते हवे, अशी चर्चा झाली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी भारताच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत हे ‘ओटीटी’ येईल, असे ठरवण्यात आले आणि त्यामुळे तांडवसारख्या मालिकांवर तत्परतेने कारवाई करणे शक्य झाले. मुंबई आणि लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे धार्मिक भावना दुखावल्याची आणि पंतप्रधानपदाची पत खालावल्याची पोलीस तक्रार नोंद झाली. उत्तरप्रदेशातून पोलीस अधिकारी कलाकार आणि निर्माते यांना अटक करण्यासाठी निघाले, तेव्हा ‘टुकडे आणि तैमुर समर्थक’ गँगच्या पायाखालची माती सरकली अन् दिग्दर्शक अली अब्बास जफर याने लगोलग क्षमायाचना केली. उत्तरप्रदेश सरकारने ही तत्परता दाखवली आहे. ‘सरकार मनात आणले तर काय करू शकते’, याची ही झलक आहे. सूचना आणि प्रसारण खात्याने नोटीस दिल्यावर हे हिंदुद्वेषी विनाअट क्षमा मागण्यास सिद्ध झाले. त्यांच्यावर फौजदारी खटला प्रविष्ट करण्यात आला आहे; त्यामुळे यात अटक होण्याची दाट शक्यता आहे. मुंबईतही तक्रार प्रविष्ट करून भाजप प्रवक्ते राम कदम यांनी ‘यांना जोड्याने मारण्याची आवश्यकता आहे’, असे उघडपणे म्हटले आणि ‘अटक करूच’ अशी चेतावणी दिली. भाजपने ही मालिका प्रसारित करणार्‍या ‘अ‍ॅमेझॉन’ची उत्पादने विकत न घेण्याचे आवाहन केले.

अ‍ॅमेझॉनने ही वेब सिरीज हटवून नाक घासून हिंदूंची क्षमा मागेपर्यंत हिंदूंनी आंदोलन जराही अल्प करता कामा नये, असे धर्माभिमानी हिंदूंना वाटते. सरकारने यात लक्ष घातल्यामुळे ही क्षमायाचना झाली आहे, हे महत्त्वाचे आहे. देवतांची टिंगल करण्याची रुढी बनलेल्या वेब मालिका आणि विज्ञापन निर्माते यांनी यातून धडा घेणे शहाणपणाचे ठरेल. भाजपने एवढ्या वरच्या स्तरापर्यंत प्रथमच हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा हा अवमान थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. अन्यथा ‘रेड लेबल’सारख्या आस्थापनातून सातत्याने होणारा हिंदूंचा अवमान किंवा ‘पद्मावत’सारख्या चित्रपटातून होणारा ऐतिहासिक महापुरुषांचा अवमान थांबवला जात नाही. असेच प्रत्येक विज्ञापन, चित्रपट, नाटक यांतील हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान रोखण्यासाठी कडक बंधने परिनिरीक्षण मंडळ कसे घालेल, याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. एकदा आपली निर्मिती मंडळाकडून नाकारली जाईल, याची निश्‍चिती झाल्यावर निर्मातेही तशी काळजी घेतील. असे असले तरी ‘तांडव’ निर्मिती करणार्‍यांना उद्या शिक्षा होईल किंवा नाही, तरी भगवान शिवाची अवकृपा (म्हणजे खरे ‘तांडव’) त्यांच्यावर होणारच आहे, हे निश्‍चित !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *