Menu Close

हिंदु राष्ट्र घोषित करून मगच शासनाने मंदिरांची व्यवस्था चालवावी ! – एम्. नागेश्‍वर राव, माजी प्रभारी संचालक, सीबीआय

‘चर्चा हिंदु राष्ट्राची !’ या विशेष संवादांतर्गत आंध्रप्रदेशमधील मंदिरांवर आघातांचे षड्यंत्र ?’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

पुणे : भारतात ‘सेक्युलरवाद म्हणजे हिंदुत्वाचा विरोध’ अशी व्याख्या झाली आहे. तुम्ही हिंदुत्वासाठी कार्य करत असाल, तर तुम्हाला ‘कट्टरतावादी, संघी’ असे म्हटले जाते. आंध्रप्रदेशमधील २४ सहस्र ६३२ हिंदु मंदिरे कह्यात घेतली गेली, असे मी मानतो. या सर्व मंदिरांची ४ लाख एकर भूमी शासकीय अधिपत्याखाली आहे. यात १ लाख एकर भूमीवर अतिक्रमण झाले आहे. हिंदूंकडून त्यांची मंदिरे, त्यांची भूमी आणि त्यांचे स्रोत काढून घेण्यात आले आणि हिंदू कमकुवत झाले. यामुळे मंदिरांविषयी हिंदूंची श्रद्धा आणि जवळीकता न्यून झाली. वास्तविक धर्मनिरपेक्ष सरकारला हिंदूंची मंदिरे बळकावण्याचा कोणताही अधिकार नाही. जर सरकारला हिंदूंची मंदिरे हवी असतील, तर ‘हे राष्ट्र हिंदु राष्ट्र घोषित करावे आणि मग शासनाने मंदिरांची व्यवस्था चालवावी’, असे प्रतिपादन सीबीआयचे माजी प्रभारी संचालक एम्. नागेश्‍वर राव यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या ऑनलाईन विशेष संवादात ‘आंध्रप्रदेशमधील मंदिरांवर आघातांचे षड्यंत्र ?’ या विषयावर ते बोलत होते. हिंदूबहुल आंध्रप्रदेशात मंदिरांचे सरकारीकरण झाले. तेथे वाय.एस्.आर्. काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डी यांचे सरकार आल्यानंतर हिंदूंच्या मंदिरांवर वारंवार आघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. नेल्लीमारला मंडल (जिल्हा विजयनगरम्) येथील ४०० वर्षे पुरातन असलेल्या श्रीरामाच्या मूर्तीचे शिर तोडून फेकण्यात आले. याच पार्श्‍वभूमीवर या चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्राला तेलंगाणा येथील प्रज्ञा भारतीचे राज्य उपाध्यक्ष श्री. गिरिधर ममिडी, तेलंगाणा अन् आंध्रप्रदेश येथील राष्ट्रीय शिवाजी सेनेचे व्यवस्थापक अध्यक्ष श्री. ताडोजु चारि, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीच्या कु. कृतिका खत्री आणि श्री. चेतन जनार्दन यांनी केले.

हिंदूंनी संघटित होऊन ‘शॅडो कॅबिनेट’प्रमाणे प्रत्येक मंदिरात ‘शॅडो’ न्यास स्थापन करून लढा देणे आवश्यक ! – एम्. नागेश्‍वर राव

एम्. नागेश्‍वर राव पुढे म्हणाले की, आंध्रप्रदेशच्या पोलीस महासंचालकांनी घोषित केले की, वर्ष २०२० मध्ये २२८ मंदिर आक्रमणांच्या घटना नोंद झाल्या होत्या. विजयनगरम् येथील राजवंश कुटुंबातील अशोक गजपती राजू यांनीही अनेक तथ्ये मांडली. त्यावरून या हिंदूविरोधी घटनांमागे एक नियोजित षड्यंत्र आहे, ते दिसून येते. मूर्तीभंजन करणारे लोक मूर्तीपूजेला विरोध करतात आणि मूर्ती, तसेच मंदिरांची तोडफोड करतात. विशिष्ट पंथांना अधिक अनुदान देण्यासह त्यांच्याशी निगडित लोकांची पदांवर नियुक्ती केली जात आहे. विशिष्ट पंथाला धरून कारभार केला जात आहे, असे प्रथमदर्शनी दिसते. राज्यघटनेनुसार सरकार आणि शासकीय संस्था यांनी एकसंध राहून कोणताही भेद न करता कार्य करायला हवे. खरे तर सरकारने सर्व धर्मियांना सुरक्षा पुरवली पाहिजे; मात्र सरकार एका विशिष्ट धर्माकडे झुकलेले दिसते. हे धर्मनिरपेक्षतेचे लक्षण नाही. हिंदूंवर होणार्‍या अन्यायाची जागृती व्हायला हवी. मंदिरांच्या रक्षणासाठी हिंदु समाजाने संघटित होऊन ‘शॅडो कॅबिनेट’प्रमाणे (विरोधकांच्या मंत्रीमंडळाप्रमाणे) प्रत्येक मंदिरात ‘शॅडो’ न्यास स्थापन करून लढा दिला पाहिजे.

सर्व भक्तांनी मंदिर रक्षणासाठी पुढाकार घ्यावा ! – सी.एस्. रंगराजन, प्रमुख पूजक, चिल्कूर बालाजी मंदिर, भाग्यनगर, तेलंगाणा

या चर्चासत्रामध्ये भाग्यनगर येथील चिल्कूर बालाजी मंदिराचे प्रमुख पूजक सी. एस्. रंगराजन यांच्या संदेशाची एक ध्वनीचित्रफित दाखवण्यात आली. सी. एस्. रंगराजन यांनी म्हटले की, आज प्राचीन मूर्तीपूजेची परंपरा, हिंदूंचा धर्म आणि विश्‍वास यांवर आघात होत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन धर्मरक्षणाचा संकल्प करायला हवा. माझी सर्व भक्तांना प्रार्थना आहे की, आपण सर्वांनी पुढाकार घेऊन मंदिरांचे रक्षण करायला हवे. हा अतिशय कठीण काळ आहे. राज्यात धार्मिक परिषदेची निर्मिती व्हावी, अशी आंध्रप्रदेश सरकारला विनंती आहे. निधर्मी सरकारला मंदिर व्यवस्थापनाचा कोणताही अधिकार नाही.

हिंदूंना जागृत करणे आवश्यक ! – गिरिधर ममिडी

जेव्हा ख्रिस्ती पंथ युरोपमध्ये पसरला, त्या वेळी अन्य सभ्यता नष्ट करण्यात आल्या. सेंट फ्रान्सिस झेविअर यानेही अशाच गोष्टी सांगितल्या आहेत. हे विष लोकांच्या बुद्धीमध्ये पेरले गेले असून त्यामुळे या घटना वारंवार घडत आहेत. अशा देशविरोधींची विचारसरणी समजून घेऊन त्यांचा प्रतिकार करायला हवा. तेलुगु देसम् पार्टीच्या काळातही विजयवाडा येथे उड्डाणपूल बनवतांना सर्व छोटी मंदिरे तोडण्यात आली. जगनमोहन रेड्डी सरकारच्या विरोधात केवळ हिंदुत्वाच्या सूत्रावर राजकारण केले जाऊ शकते. त्यामुळे व्यक्तीगत राजकीय लाभातून प्रत्येक पक्ष कार्यरत आहे. मंदिरांवरील आघाताच्या या घटना राज्य सरकार रोखत नसेल, तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा. या सर्वावर एकच उपाय म्हणजे हिंदूंना जागृत करणे होय.

सर्व आघातांचा संघटितपणे विरोध करणार ! – ताडोजु चारि

संपूर्ण षड्यंत्र सरकार बघत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मंदिरांवर आक्रमण झाले. आम्ही या सर्वांना खडसवायला गेल्यावर आमच्यावर पोलिसांद्वारे दबावतंत्र निर्माण करण्यात आले. बॅरिकेट्स लावून आम्हाला लाठीमार करण्याचीही सिद्धता करण्यात आली होती. आम्ही ‘धरणे आंदोलन’ केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ‘आम्ही कारवाई करू’, असे सांगितले. त्यानंतरही आणखी काही मंदिरांवर आक्रमणे झाली. त्यामुळे इथून पुढेही मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात येतील. हिंदूंवर होणार्‍या आघातांचा आम्ही सर्वजण संघटितपणे विरोध करणार.

हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे हनन म्हणजे नियोजित षड्यंत्रच ! – रमेश शिंदे

१. आंध्रप्रदेशात सरकार मंदिरांचे कोट्यवधी रुपये घेते, तर ते मंदिरांना सुरक्षा का पुरवत नाहीत ? दोनशेहून अधिक मंदिरांत एकाच पद्धतीने आघातांच्या घटना घटतात, तेव्हा ते हिंदूंच्या श्रद्धांचे हनन करण्याचे सुनियोजित षड्यंत्र आहे, हे सरकारला का कळत नाही ?

२. यापूर्वी गोव्यामध्येही मंदिरांच्या तोडफोडीच्या घटना झाल्या. तरीही ‘हे सर्व चोरीच्या कारणांमुळे झाले’, असे सांगण्यात आले. ‘चोर्‍या करून मूर्ती तोडणे, हे चोरीच्या उद्देशालाच खोटे ठरवते’, असे कुणालाही वाटल्यास चूक ठरणार नाही; मात्र तत्कालीन सरकार या गोष्टींवर पांघरूण घालत राहिले आणि देशातील हिंदु समाजाला निधर्मीवादाच्या नावाखाली भ्रमित करत राहिले.

३. कर्नाटकात ५-६ चर्चवर केवळ दगडफेकीच्या घटना घडल्यानंतर भारतातील चर्च धोक्यात असल्याचा प्रचार करून आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवला गेला; पण शेकडो मंदिरांवर आक्रमणे होऊनही त्याला गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे हिंदूंनीच यावर आवाज उठवून सरकारला कृती करण्यास भाग पाडले पाहिजे.

४. अन्नपुरवठा मंत्री कोडाली नानी म्हणतात की, हिंदु देवतांची मूर्ती फोडल्याने देवतांवर कोणताही परिणाम होत नाही. हेच मत चर्चमधील मूर्तींविषयी अथवा मशिदीविषयी केले जाते का ? यातूनच सरकारची नीती कळून येते.

५. ‘आंध्रप्रदेश प्रोपॅगेशन ऑफ अदर रिलिजन इन द प्लेसेस ऑफ वरशिप ऑर प्रेयर प्रोहिबिशन ऑर्डिनन्स २००७’ (प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी अन्य धर्मियांच्या धर्मप्रसारास प्रतिबंध करणारा कायदा) या अंतर्गत हिंदूंच्या मंदिर परिसरात अन्य धर्मीय त्यांच्या धर्माचा प्रसार करू शकत नाहीत. याचाच अर्थ ते तिथे येऊही शकत नाहीत. या कायद्याला तिथे त्वरित लागू करण्याची आवश्यकता आहे. या सर्व समस्या रोखण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव उपाय आहे.

विशेष

कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांनी झालेल्या सर्व घटनांविषयी निषेध व्यक्त करत ‘हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण व्हावे, यासाठी केंद्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी आणि दोषींना पकडण्यासाठी विशेष पथक स्थापन करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. हा कार्यक्रम फेसबूक आणि यू ट्यूब यांच्या माध्यमांतून ४४ सहस्र ४९६ जणांनी पाहिला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *