सातारा : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मंगेश निकम, संजय मोरे, राहुल मुंडे आदी उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना, तर जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये म्हटले आहे की,
१. शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी एक कृती समिती स्थापन करावी. यामध्ये हिंदु जनजागृती समितीचाही समावेश करावा अशी विनंती आहे.
२. जिल्ह्यात कुठे प्लास्टिकच्या ध्वजाची निर्मिती होत आहे का, याची निश्चिती करावी. असे होत असल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात यावी.
३. नागरिकांचे प्रबोधन व्हावे याकरिता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ ही ध्वनीचित्रफीत सिद्ध करण्यात आली आहे. ती स्थानिक केबल आणि दूरचित्रवाहिन्या यांवर प्रसिद्ध करण्याची अनुमती द्यावी ही विनंती.