आतंकवाद्यांचे समर्थन करणार्या कन्हैया कुमारला पुणे प्रवेशबंदी करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी
पुणे : ९ फेब्रुवारी २०१६ या दिवशी आतंकवादी महंमद अफझलच्या फाशीला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देहलीतील जेएनयूत त्याच्या समर्थनार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याने भाषण केले. तसेच अफझल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, कश्मीरकी आझादीतक जंग रहेगी जंग रहेगी, भारतकी बर्बादीतक जंग रहेगी जंग रहेगी यांसारख्या देशविरोधी घोषणाही या वेळी देण्यात आल्या होत्या. हे लक्षात घेऊन कन्हैया कुमार याच्या कार्यक्रमास अनुमती देण्यात येऊ नये, यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस आणि प्रशासन यांना विनंती केली आहे. त्याचा विचार करून पोलीस प्रशासनाने कन्हैया कुमार यास जिल्हा प्रवेशबंदी करावी, कन्हैया कुमारसारख्या दुष्प्रवृत्तींना जे चालना देत आहेत, तेही देशविरोधीच आहेत. अशा देशविरोधी शक्तींवरही कारवाई करण्यात यावी, तसेच कन्हैया कुमारच्या दौर्यांसाठी कुठून पैसा येत आहे, याचीही शासनाने चौकशी करावी, अशी मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी पत्रकार परिषदेत केली. कन्हैया कुमार २४ एप्रिल या दिवशी पुणे येथे येत आहे. याच्या निषेधार्थ पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
कन्हैया कुमारच्या कार्यक्रमास अनुमती दिल्यास त्याला हिंदुत्ववादी संघटनांचा शेवटच्या क्षणापर्यंत विरोध कायम राहील आणि हा कार्यक्रम होऊ नये, यासाठी सर्व कायदेशीर मार्गांचा वापर करण्यात येईल, अशी चेतावणीही श्री. अभय वर्तक यांनी दिली.
या वेळी पनून कश्मीर संघटनेचे श्री. राहुल कौल, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. मंगेश कुलकर्णी, अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव समितीचे श्री. नितीन वाटकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले उपस्थित होते.
श्री. वर्तक पुढे म्हणाले, कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट असून त्याला न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. कन्हैया कुमारने या देशाचा अपमान केला आहे. देशासह राज्यातील विविध ठिकाणचे वातावरण यामुळे अशांत बनत असून देशभक्तीच्या भावनांना, देशाच्या एकात्मतेलाच तडा जात आहे. कन्हैया कुमारच्या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील स्वतःला पुरोगामी म्हणवणार्या काही देशद्रोही संघटनांनी केले आहे. समाजामध्ये विशेषतः युवकांमध्ये देशविरोधी भावना भडकवण्याचेच हे षड्यंत्र आहे. कोणताही देशभक्त नागरिक हे सहन करणार नाही. सभेचे आयोजन दूरच; परंतु अशा दुष्प्रवृत्तींना पुण्यामध्ये पाऊल ठेवण्यासही बंदी घातली गेली पाहिजे.
कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादाशी प्रतारणा होऊ शकत नाही ! – राहुल कौल, पनून कश्मीर
राहुल कौल म्हणाले, पुणे शहरातील वातावरण अत्यंत सौहार्दपूर्ण आहे. जी कोणी व्यक्ती देशद्रोही कृत्यांमध्ये सहभागी असेल, अशा व्यक्तीचे पुण्यात स्वागत होणेच उचित नाही. गेल्या २६ वर्षांपासून काश्मिरी हिंदु समुदाय आपल्याच देशात विस्थापित म्हणून रहात आहे. आजवर कोणत्याही शासनाने त्यांच्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत. तरीसुद्धा काश्मिरी हिंदूंची राष्ट्रनिष्ठा अबाधित आहे. दुसरीकडे मात्र देशविरोधी वक्तव्ये करणार्या कन्हैया कुमारला आयकॉन म्हणून सादर केले जात आहे. काँग्रेस, तसेच नक्षलवाद्यांचे समर्थन करणारे पक्ष यांचा त्याला पाठिंबा आहे, ही दुर्दैवाची बाब आहे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादाशी प्रतारणा होऊ शकत नाही. त्यामुळे पनून कश्मीर संघटनेचाही कन्हैया कुमारच्या पुणे येथील कार्यक्रमास विरोध असेल. अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे. पुणे येथे भारतविरोधी वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी आतंकवाद्यांचे समर्थन करणार्या कोणत्याही कार्यक्रमांना शासनाने अनुमती देऊ नये.
हिंदू एकता आंदोलन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. मंगेश कुलकर्णी म्हणाले, पुणे शहराला भारतीय स्वातंत्र्यलढ्यापासून देशभक्तीचा इतिहास आहे. अशा पुण्यनगरीमध्ये कन्हैया कुमारसारख्या देशद्रोह्याला येऊ देऊ नये.
क्षणचित्र
पत्रकार परिषदेत एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने कन्हैया कुमारला येऊ देण्यात आणि त्याचे काय म्हणणे आहे, ते मोठ्या मनाने ऐकून घेण्यात काय अडचण आहे, असा प्रश्न विचारला. त्या वेळी उत्तर देतांना सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक म्हणाले, कन्हैया कुमारने वेळोवेळी काय वक्तव्ये केली आहेत, ती सर्वांनी ऐकली आहेत. इथे मोठे मन आणि संकुचित मन असा प्रश्नच येत नाही. ज्या गोष्टींमुळे राष्ट्राची एकात्मता धोक्यात येते, त्याला विरोधच केला जाईल. याविषयी कोणतीही तडजोड करता येणार नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात