Menu Close

भाषांतर म्हणजे धर्मांतर आणि पुढे राष्ट्रांतर !

इंग्रज गेले, तरी भारतात त्यांच्या भाषेची गुलामगिरी कायम !

धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे समर्पक म्हणणे होते. आज ते असते, तर भाषांतर म्हणजे धर्मांतर आणि पुढे राष्ट्रांतर असे मत त्यांनी खचित्च व्यक्त केले असते. आजचे दारुण वास्तव डोळे उघडे ठेवून पाहिले, तर दिसेल. अर्थात् दिसूनही नेमका उपयोग काय ? हा प्रश्‍न उरतोच. इंग्रज गेले; पण अनेक प्रकारची गुलामगिरी येथे ठेवूनच गेले. त्यांचा धूर्त कावा त्या वेळच्या नेतृत्वाने नीट ओळखला नाही कि त्यांच्या तो ध्यानात आला नाही ?, हे नेमके कळत नाही. येथे असतांना इंग्रजांनी स्वतःच्या भाषेच्या जोखडात आमच्या लोकांची मान इतक्या भक्कमपणे अडकवली की, प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडता येऊ नये, अशी व्यवस्था केली. ते गेले, तरी त्यांच्या भाषेविना जगात तरणोपाय नाही, हे आमच्या डोक्यात पक्के बसले. स्वराज्य मिळताच एतद्देशीय भाषांच्या शाळांना प्रोत्साहन द्यायचे सोडून इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रोत्साहन देण्यात आले. आज भारतातील प्रमुख भाषा या हळूहळू मृत्यूपंथाकडे निघाल्या आहेत. कित्येक लहान भाषांचे अस्तित्व संपून गेले; पण आपल्याला त्याची फिकीर नाही, अशी भयावह परिस्थिती आहे.

१. इंग्रजांनी जाणीवपूर्वक संस्कृतचे अस्तित्व मिटवले !

संस्कृत भाषेचे अस्तित्व इंग्रजांनी धूर्तपणे मिटवले. त्यांच्या काळात त्यांना या कामासाठी येथीलच काही कथित सुधारक कामाला आले. शाळेतून अवघड आणि विशिष्ट जातीची भाषा असे ठरवून शब्दसंपदेने समृद्ध असलेल्या या भाषेला जाणीवपूर्वक डावलण्यात आले. कोणतीही भाषा शिकेपर्यंत कठीणच असते. एकदा शिकली की, तिचे वैभव डोळ्याखालून घालता येते.

एका वस्तूला अनेक प्रकारचे पर्यायवाची शब्द ज्या भाषेत आहेत, ज्ञान आणि विज्ञानाची जी भाषा आहे, प्राचीन काळचे आपले शोध, अनेक प्रकारची शास्त्रे ज्या भाषेत आहेत, आज संगणकानुकूल म्हणून कैक अभ्यासक ज्या भाषेचा उल्लेख करतात, काव्य-शास्त्र-विनोद ज्या भाषेत विपुल प्रमाणात आढळतात, ती भाषा तिच्या जन्मस्थानी, परकियांच्या काव्यामुळे, उपेक्षित ठरावी, हे दुर्दैव आहे. संस्कृतमधील काव्यरचना बघितली, तर त्या तोडीची रचना आणि वैविध्य जगातील एकाही भाषेत नाही. हे अतिशयोक्त वा भाबडेपणाचे नसून वास्तव कथन आहे.

२. इंग्रजी भाषेतील उच्चारण आणि लेखन यांतील त्रुटी

प्रत्येक गोष्टीत सायंटिफिकचा धोशा लावणारे आपण मोस्ट सायंटिफिक स्क्रिप्ट असलेल्या देवनागरीचा उपयोग करण्याऐवजी अत्यंत अनसायंटिफिक असलेल्या रोमन स्क्रिप्टकडे वळण्याचा दांभिकपणा करतो. स्वर आणि वर्ण हे देवनागरी लिपीत स्वतंत्र अन् एका विशिष्ट क्रमाने येतात. इंग्रजीतील स्वर हे त्या लिपीमध्ये कसेही घुसलेले आढळतात. जसे उच्चारण तसे लेखन, हे आपल्या लिपीचे वैशिष्ट्य आहे. इंग्रजीत तसे आहे का ? असते तर सायकॉलॉजीचे स्पेलिंग P (पी) पासून आणि झेकोस्लोवाकियाचे C (सी) पासून का चालू झाले असते ? आयलंडच्या स्पेलिंगमध्ये येणार्‍या S (एस्) चे प्रयोजन काय ? तो सायलेंट का ? हे वानगीदाखल दिले आहे. असे अनेक प्रश्‍न लेखन आणि उच्चारणावरून निर्माण होऊ शकतात.

३. भाषिक गुलामगिरीचे उदाहरण असलेला स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंडला आम्हाला दोन ब्राझिलीयन तरुण भेटले होते. ते पोर्तुगीज बोलत होते; कारण त्यांचा देश वर्षानुवर्षे पोर्तुगालचा गुलाम होता. त्या देशाने ब्राझिलमधील शेकडो भाषा मारल्या आणि आपली भाषा लादली. आज भाषकदृष्ट्या तो देश पोर्तुगालचा गुलामच आहे. त्यांची अस्मिता आणि स्वत्व मिटून गेले आहे.

४. मातृभाषेचे अस्तित्व मिटत चालले असतांना परकीय भाषेचे जोखड वाहू नका !

आपण तर मान पुढे करून स्वखुशीने परक्या भाषेचे जोखड गळ्यात घालून घेतले आहे. इंग्रजीच्या वर्चस्वात आपण वाहून चाललो आहोत. आणखी काही वर्षांनी येथील सर्व प्रमुख भाषा आणि संस्कृती मिटून जाण्याकडे मार्गक्रमण करू लागेल, तेव्हा तो दोष इंग्रजांचा नसून आपलाच असेल. ते खेळी करून गेले; पण नंतरच्या नेत्यांनी देश आणि येथील भाषा सावरणे महत्त्वाचे होते. आम्ही व्यक्तीश: भाषा म्हणून इंग्रजीच्या विरोधात नाही, हे येथे स्पष्टपणे नमूद करतो. उलटपक्षी तरुणांनी अधिकाधिक अन्य भाषा शिकाव्यात, या मताचे पुरस्कर्ते आहोत; मात्र कुसुमाग्रजांच्या शब्दांत सांगायचे, तर माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका, हा संदेश आम्हाला जास्त महत्त्वाचा वाटतो.

५. देशात कॉन्व्हेंट शाळांचा सुळसुळाट होण्यामागे चर्चजवळील संपत्ती कारणीभूत

कोणतीही भाषा शिकायला लागलात की, तिची संस्कृती पाठोपाठ येतेच ! सध्या इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. चर्चजवळ असणारा पैसा आणि आमचे धर्मनिरपेक्षतेचे विकृत धोरण, हे कारण त्या पाठीमागे आहेच. या देशात चर्चकडे कित्येक क्षेत्रातील सरकारी आस्थापनांपेक्षा अधिक जमीन आहे; कारण स्वराज्य मिळाल्यावर चर्च येथून गेले नाही आणि त्यांना जा असेही कुणी सांगितलेले नाही. त्यांच्या पालनकर्त्या इंग्रजांनी येथील बक्कळ जमीन त्यांना दिली होती. हपापाचा माल गपापा, अशी अवस्था होती. त्या वेळच्या नेत्यांनी ती जमीन, स्वराज्य मिळताच सरकारजमा करण्याचा धोरणीपणा दाखवला नाही. आज बहुतेक ठिकाणी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेले मोठे भूखंड चर्चच्या मालकीचे आहेत. त्यांना बाहेरूनही जो निधी येतो, त्यातून चर्चचे कार्य निर्वेधपणे चालू आहे. आपल्याकडे मुलांना कॉन्व्हेंट शाळेत घालणे, हे प्रतिष्ठितपणाचे लक्षण मानले जाते. कॉन्व्हेंट या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे ?, हे पहाण्याचे आपण श्रमही घेत नाही. कित्येकांना कॉन्व्हेंट म्हणजे इंग्लिश माध्यम, असे वाटते. या दुर्दैवाला काय म्हणाल ? अ स्कूल रन बाय फादर अँड नन, ही कॉन्व्हेंट स्कूलची ढोबळ व्याख्या आहे.

६. परकीय भाषेमुळे मुले समाज आणि परंपरागत संस्कार यांपासून तुटतात !

साहजिकच अशा शाळांमधून मुलांना बायबलमधील साम्स शिकवल्या जाणार, परवचा नव्हे ! शाळेत घालेपर्यंत जी मुले घरी आई-बाबा म्हणत असत, ती एकदम ममी, डॅडी म्हणायला प्रारंभ करतात. कित्येक शाळांमध्ये तर इंग्रजीव्यतिरिक्त अन्य भाषेत बोलायला बंदी असते. कित्येक मिशनरी शाळेतील मुले देवाला नमस्कार करतांना हात जोडायचे असतात, हे विसरून कपाळ आणि खांद्याला स्पर्श करून ख्रिस्ती अदब दाखवतात. ख्रिस्ती नववर्षदिन आणि ख्रिसमस त्यांच्यासाठी महत्त्वाचे सण होतात. आपले देव, उत्सव आणि चालीरीती यांची निंदा ऐकायची सवय होऊ लागते. पुढे स्वतःही तशीच निंदा करू लागतात. मुलींच्या हातातील बांगड्या, कर्णफुले, लांब केस आणि कपाळावरील कुंकू या सर्वांना रजा दिली जाते. सरस्वती वंदना, आपली प्रार्थना अथवा वन्दे मातरम् तर कानीही पडत नाही, मग ते कंठस्थ होणे दूरच ! परभाषेने असा संस्कारलोप होण्याचा संभव सर्वांत जास्त असतो. स्वाभाविकच मुले समाज आणि परंपरागत संस्कार यांपासून तुटतात.

७. समाजात वाढत चाललेले बर्थ डे फॅड

आता तर बर्थ डे हे फॅड फारच बोकाळले आहे. आईवडिलच जर केक कापून आणि मेणबत्ती फुंकून वाढदिवस साजरा करत असतील आणि मुलांच्या पुढे तोच आदर्श ठेवत असतील, तर मुलाची काय चूक ? हा देशच विचित्र होत चालला आहे. इथे गेलेल्याच्या नावाने मेणबत्ती लावतात आणि असलेल्याच्या नावाने फुंकून विझवतात. आपण तेजाचे उपासक आहोत. आपल्या अपत्याला वाढदिवसाच्या वेळी निरंजनाने ओवाळायचे आणि त्याच्या डोईवर कापूस ठेवून दीर्घायुष्य चिंतायचे असते. ते सोडून केक कापणे आणि त्यावरील क्रीम इतरांच्या तोंडाला फासून अन्न वाया घालवण्याचा हिडीस प्रकार दिसतो. केकचा हिस्सा कापून तो एकेकाने बाईट (तुकडा) घेत खाणे, हा मोठाच हायजेनिक प्रकार चालतो !

८. हिंदु धर्माविषयी अज्ञानी असलेली पिढी टीकाकारांसमोर निरुत्तर होणे

८ अ. देश, परंपरा आणि येथील संतमहात्मे यांविषयी काहीच ठाऊक नसलेली पिढी ही केवळ जन्महिंदूच !

या सर्व प्रकारांमुळे पाश्‍चात्त्यांचे आचार-विचार, त्यांच्या संस्कृतीची वैशिष्ट्ये, त्यांची सभ्यता आणि रहाणीमान हेच आपल्याकडील सर्वसामान्य लोकांना आदर्श अन् प्रतिष्ठितपणाचे वाटतात. स्वाभाविकच जे आपले आहे, ते त्याज्य, परिवर्तनयोग्य आणि उपहासात्मक वाटू लागले. रामायण-महाभारतासारखे नीतीमूल्य शिकवणारे ग्रंथ आजची पिढी वाचत नाही. त्यापेक्षा त्यांना हॅरि पॉटर जवळचा वाटतो. इंग्रजी कादंबर्‍या वाचून शिव आणि राम कळत नसतो, हे यांना कसे समजवणार ? आपल्या धर्मातील साध्या गोष्टीही ठाऊक नसणारी ही मुले पुढे विदेशात गेली की, पेचात पडतात. तिथे अनेक जण त्यांच्या धर्माविषयी, अनेकेश्‍वर आणि अनेक धर्मग्रंथ असणे, याविषयी कुतूहलाने प्रश्‍न विचारतात. या मुलांना आपल्या धर्माविषयी काहीच ठाऊक नसल्यामुळे उत्तरे कुठून देता येणार ? अशा वेळी समोर एखादा टीकाकार आला, तरी तो जे बोलेल, त्याला मान तुकावण्याखेरीज त्यांच्याकडे गत्यंतर नसते. आपला देश, परंपरा, येथील वीरपुरुष, संतमहात्मे वगैरेंविषयी काहीच ठाऊक नसलेली ही पिढी केवळ जन्महिंदू ठरते. वृत्ती आणि कृती यांनी तिचे धर्मांतर आधीच झालेले असते.

याविषयी स्वामी राम म्हणतात, भारताचा विकृत इतिहास हेतूपूर्वक शालेय अभ्यासक्रमामध्ये घातला गेला. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना आपली संस्कृती आणि इतिहास यांचा विसर पडला. आपल्या परंपरेचे विस्मरण म्हणजे आपल्या आत्म्याचे विस्मरण ! भारतातील शिक्षण ब्रिटिशांनी फार विकृत केले. सर्व विषय इंग्रजी माध्यमातून शिकवायचे. मुलांनी ब्रिटीश मिशनर्‍यांनी शिकवलेल्या प्रार्थना म्हणायच्या. विचारांचे स्वातंत्र्य नाही. त्यामुळे वाणीचे आणि कृतीचे स्वातंत्र्य नाही; पण हे ब्रिटीश पद्धतीचे शिक्षण घेतले नाही, तर नोकर्‍या मिळत नसत. यावरून मला कळले की, सत्ता देशाला कशी भ्रष्ट करते आणि देशातील संस्कृतीचा नाश करते. भाषा पालटणे, हा देशाची संस्कृती उध्वस्त करण्याचा हमखास मार्ग आहे. ते करण्यात ब्रिटीश यशस्वी झाले. स्वातंत्र्यानंतर ३० वर्षे झाली, तरीही इंग्रजी ही भारताची राज्यकारभाराची भाषा आहे. (हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात, स्वामी राम, अनुवाद : स्वर्णलता भिशीकर, मंजुल प्रकाशन, पृ. २१७)

९. इंग्रजी भाषेचा बागुलबुवा हा भाषिक आतंकवादच !

इंग्रजी भाषेचा बागुलबुवा आपल्या खांद्यावर पक्का बसवला आहे. हासुद्धा एका परीने भाषिक आतंकवादच आहे. अनेक आस्थापनांमध्ये नोकरीसाठी इंग्रजीची अनिवार्यता कशासाठी असते ? देशातील कित्येक प्रतिष्ठित, मोठे क्लब आणि संस्था यांच्यामध्ये पाश्‍चात्त्य पद्धतीचा ड्रेसकोड आवश्यक का असतो ? इंग्रजी माध्यमात न घातल्याने आपल्या पाल्याला ती भाषा येणार नाही आणि स्पर्धेच्या जगात तो मागे पडेल, अशी पालकांची मानसिकता का झाली आहे ? जगात कुठेही नसलेली इंटरनॅशनल स्कूल नामक भंपक संकल्पना आपल्याकडे मोठे बकरे मिळावेत, म्हणूनच राबवली जाते ना ? आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण द्या, असे शिक्षणक्षेत्रातील जागतिक तज्ञ सांगत असतात. ते सरकार आणि पालक यांच्या कानी पडत नाही का ? या भाषांतर काव्यामुळे आपल्या पाल्यांचे सहजपणे मानसिकरित्या धर्मांतर होत असल्याचे पालकांना कळत नाही का ?

हेच धर्मांतर उद्याच्या राष्ट्रांतराला कारणीभूत ठरू शकेल. आग लागल्यावर आपण विहीर खोदायला घेणार का ? जे धर्मांतर मिशनर्‍यांच्या साहाय्याने जंग जंग पछाडूनही इंग्रजांना साध्य करता आले नाही, ते आपण आपल्या हाताने करत आहोत, याची जाग सुबुद्ध आणि सुशिक्षित म्हणवणार्‍या समाजाला कधी येणार ? हा प्रश्‍न अस्वस्थ करणारा आहे. आमच्या दोन्ही अपत्यांना आम्ही मराठी माध्यमाच्या शाळेत घातले होते. त्या वेळी कित्येक परिचित हसले होते. आपल्या मुलांसाठी योग्य आणि हितावह काय ? त्याचा निर्णय आपण करायचा असतो. आताशा मराठी शाळाच उरल्या नाहीत, हे कारण लटके आहे. आपली मुलेच तिथे जात नसली, तर शाळा बंद पडू लागणारच !

१०. परधर्म सहिष्णुता या वाक्याचे मर्म

परधर्म सहिष्णुता हा सद्गुण आहे, हे बोधामृत प्रत्येक हिंदूला अगदी आईच्या दुधासहच पाजलेले असते; परंतु या वाक्याचे मर्म मात्र त्याला कुणीही विशद केलेले नसते. जर तो परधर्म आपल्या स्वधर्माशीही सहिष्णुतेने वागणारा असेल, तर परधर्माशी आपणही तशा सहिष्णुतेने वागणे, हा सद्गुण होऊ शकेल; परंतु देशकालपात्राचा विवेक न करता हिंदु धर्माचा उच्छेद हाच आमचा धर्म होय, असे म्हणणार्‍या मुसलमान किंवा ख्रिश्‍चन यांच्या धर्माला ही परधर्म सहिष्णुतेची व्याख्या लागू पडत नाही. तिथे त्या परधर्माचा त्याच्या असहिष्णू कृत्यांचा प्रतिकृत्याने आणि अत्याचारांचा प्रत्याचाराने घेणारी संक्रुद्ध असहिष्णुता हाच खरा सद्गुण होय, असे सहा सोनेरी पाने मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर स्पष्टपणे सांगतात.

११. डाव्यांनी शिक्षणक्षेत्रात शिरून हिंदु संस्कृती मिटवण्यासाठी प्रयत्न करणे

एखादी संस्कृती मारायची असेल, तर लोकांची श्रद्धा उडवा आणि वाईट गोष्टींचा असा प्रसार करा की, लोकांना ते चांगले अन् आदर्शवत् वाटायला हवे, याला सबव्हर्जन म्हणतात. स्वराज्योत्तर काळात डाव्यांनी (साम्यवाद्यांनी) जवळपास ५० वर्षांहून अधिक काळ आपल्या शिक्षणक्षेत्रात घुसखोरी करून ते साध्य करायचा प्रयत्न केला. प्रस्थापित धर्म आणि संस्कृती यांना त्याज्य मानणारी मानसिकता निर्माण करून येथील लोकांची अस्मिता मिटवण्याचा भरघोस प्रयत्न करण्यात आला आणि केला जात आहे. एकदा आपल्या धर्माविषयी तुच्छता निर्माण झाली की, माणसामध्ये मानसिक गोंधळ आणि अपराधगंडाची भावना निर्माण होते. तसे झाले की, धर्मांतर घडवून आणणे सोपे जाते. मग तसे होण्यासाठी रामायण वा महाभारतासारख्या ग्रंथात जे खलनायक आहेत, त्यांचे उदात्तीकरण करणारी पुस्तके लिहायला काही लेखकांना प्रोत्साहित केले जाते. दुसरी आणि विचार करायला लावणारी बाजू, असे म्हणत अशा आणि देवादिकांवर टीका करणार्‍या पुस्तकांचा उदोउदो करण्यात येतो. साहित्य संस्थांचे पुरस्कार दिले जातात आणि अशा लेखकाला विचारवंत वगैरे ठरवले जाते. आपल्याकडील माध्यमांची साथ लाभल्याने सहसा असे विचारवंत वा बुद्धिवादी म्हणून गणले जाणारे लोक डावेच असतात, हे लक्षात यायला हरकत नसावी !

१२. धर्मांतर केल्यावरही उच्च-नीच भेदभाव केला जातो, हे लक्षात घेणे आवश्यक

धर्मांतरामुळे मूळ ओळख मिटत नसते, हे धर्मांतरित व्यक्तीच्या लक्षात येऊ दिले जात नाही. जर ओळख मिटत असती, तर केरळात वरच्या आणि खालच्या जातीच्या लोकांचे वेगळे चर्च का असते ? सुन्नींच्या लेखी शिया, अहमदिया वगैरे काफिर का ठरले असते ? पूर्वी जातीपातीच्या उच्च-नीच कल्पनेच्या जाचामुळे अनेकविध निम्न जातीतील लोकांनी स्वखुशीने धर्मांतर केल्याचे खोटे ठोकून दिले जाते. जर खरेच तसे झाले असते आणि जातपात विरहित म्हणून ते ख्रिस्ती अथवा मुसलमान बनले असते, तर ख्रिस्ती ओबीसी आणि मुसलमान ओबीसी असे ऐकायला मिळाले असते का ?; पण या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत, हे दुर्दैव आहे.

१३. धर्मांतरामुळे निष्ठा पालटते !

धर्मांतर झाले की, राष्ट्रांतर होण्यास वेळ लागत नाही. भूमीनिष्ठा ही आपल्या संस्कृतीची पायाभूत गोष्ट आहे. जननी जन्मभूमिश्‍च स्वर्गादपि, ही मान्यता नष्ट होईल. भूमाता, स्वमाता आणि गोमाता या आपल्या धर्मात माता म्हणून गौरवल्या आहेत. ते आदरस्थान नष्ट होण्याची भीती नक्कीच आहे. शाळेत शिकलेली जी प्रतिज्ञा आहे, त्यातील या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी; म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. यातील परंपरा नेमकी कोणती ? या देशाची परंपरा ऋषिमुनी संस्कृतीची आहे, वीर योद्धे आणि संतांच्या मांदियाळीची आहे. धर्मांतर झाले की, निष्ठा पालटते. अशा वेळी आपले आदर्श श्रीराम, श्रीकृष्ण, पृथ्वीराज, ललितादित्य, चंद्रगुप्त, विक्रमादित्य, शिवराय आदी रहाणार कि बाबर, खिलजी, अकबर, औरंगजेब आदी रहाणार ?

म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात, या धर्मांतराच्या काव्यावर करडी नजर ठेवा. धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर ! धर्म म्हणजे केवळ पारमार्थिक गोष्टींची चर्चा, केवळ द्वैत-अद्वैताचे वादविवाद किंवा चेतन कि अचेतन वस्तूंचा शोध नव्हे. धर्म म्हणजे इतिहास, धर्म म्हणजे राष्ट्र ! आणि धर्म कुणाला सुटला आहे ? इंग्लंडचा राजा प्रोटेस्टंट नसेल, तर त्याला गादीचे त्यागपत्र द्यावे लागते. मध्यपूर्वेतील लहान-लहान राष्ट्रेही धर्मप्रधान आहेत. आम्ही जग पाहून आलेले लोक. आम्हाला मिशनर्‍यांनी निधर्मीपणाच्या गप्पा काय सांगाव्यात ?

जातमात्रश्‍चिकित्स्यः स्यान्नोपेक्ष्योऽल्पतया गदः ।
वह्निशत्रुविषैस्तुल्यः स्वल्पोऽपि विकरोत्यसौ ॥

भावप्रकाशसंहिता, पूर्वखण्ड, भाग १, प्रकरण ५, श्‍लोक १४

अर्थ : रोग झाला रे झाला की, त्यावर लगेच उपचार करावेत, त्याची हेळसांड करू नये. नाहीतर अग्नी, शत्रू आणि विष यांप्रमाणे तो वाढत वाढत जाऊन अक्राळ-विक्राळ स्वरूप धारण करतो आणि असाध्य बनतो.

१४. धर्मांतर हे राष्ट्रांतर या सूत्रातील धर्म आणि धर्मांतर या शब्दांचा अर्थ

धर्मांतर हे राष्ट्रांतर केव्हा ठरते ? या सूत्राची चिकित्सा करतांना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर या सूत्रात धर्म नि धर्मांतर हे शब्द काय अर्थी योजिले आहेत, हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे. निरनिराळ्या धर्मातील किंवा स्वतंत्र दर्शनात तत्त्वज्ञानाचे तुलनात्मक चिंतन करणे किंवा त्यात जे स्वीकारार्ह वाटेल, असे दर्शन आपल्या व्यक्तीपुरते स्वीकारणे, या अर्थी काही वरील सूत्रात धर्म आणि धर्मांतर हे शब्द योजलेले नाहीत. अमुक पुस्तक ईशप्रेषित आहे, त्याच्या दोन पुठ्ठ्यात जे काही सांगितले आहे ते आणि तेच काय ते धर्म्य आहे अन् इतर सर्व असत्य नि पापमय आहे, अशा अभिनिवेशाने जी धर्मसंस्था त्या धर्मग्रंथातील तथाकथित तत्त्वज्ञानच नव्हे, तर आचार, विचार, निर्बंध (कायदे), व्यवहार, भाषा इत्यादी गोष्टी इतर धर्मसंस्थांच्या अनुयायांवर उपदेशाने न साधले, तर कपटाने, क्रौर्याने नि बलात्कारानेही लादण्यास अवमान करत नाहीत, त्या धार्मिक बलात्कारासही धर्म्यच समजते, अशा आक्रमक संस्थांच्या धर्मासच उद्देशून काय तो वरील सूत्रात धर्म शब्द वापरला आहे. अशा आततायी धर्मसंस्थांनी इतरांचे केलेले जे धर्मांतर, तेच परिणामी त्या इतरांचे राष्ट्रांतर ठरते. (सावरकर विचारदर्शन, डॉ. अरविंद गोडबोले, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, पृ.१६२-१६३)

१५. धर्मांतरामुळे माणसाची निष्ठा पालटते, याविषयीचे विवरण

धर्मांतरामुळे माणसाची ओळख पालटते आणि निष्ठा पालटतात. याचे उत्तम उदाहरण भारतीय अल्पसंख्यांकांचे दिसते. या सर्वांचे पूर्वज हिंदू होते. ही ओळख ते मानतात का ? तसे असते, तर श्रीरामजन्मभूमीला विरोध झाला नसता. आजही बाबराची बाजू उचलून धरणारे पाहिले की, आश्‍चर्य वाटते. भारतियांचे स्वत्व मारण्यासाठीच जणू अद्यापही परकीय आणि पाशवी अत्याचार करणारे आक्रमक यांनी दिलेली नावे आपण मिरवत असतो. ते पालटण्यासाठी अलाहाबादचे प्रयाग वा मुगलसरायचे दीनदयाळ असे नाव होताच माध्यमे गजरगोंधळ चालू करतात.

१६. हिंदु शब्दाचा अर्थ आणि धर्माची व्यापकता

हिंदु धर्माने कधीही धर्माची भीती निर्माण केली नाही. त्यामुळे विविध संप्रदाय या भूमीवर अचल निष्ठा ठेवून नांदू शकले. अगदी देव नाकारणार्‍यालाही या धर्मात स्थान आहे. अन्य ठिकाणी इतकी मोकळीक आहे का ? याचा शोध घ्या. धर्माला अफूची गोळी मानणार्‍या साम्यवाद्यांचाही एक संप्रदाय झाला आहे. जगात तुरळक उरलेल्या साम्यवादी देशांकडे त्यांचा ओढा अधिक दिसतो. चीन-भारत संबंधाविषयी सातत्याने भारतालाच सबुरीचा सल्ला देऊन शहाणपण शिकवू पहाणार्‍या या संप्रदायाची निष्ठा कुठे वाहिली आहे, ते यावरून सहज ध्यानात यावे.

धर्मांतर आणि विचारांतर यांमुळे आदर्श अन् निष्ठा पालटत असतील, तर ते येथील परंपरा आणि संस्कृती यांना घातक ठरणारे नव्हे का ? त्यामुळे सावरकरांची अतीव्याप्ती आणि अव्याप्ती या उभय दोषांपासून दूर असलेली हिंदु या शब्दाची व्याख्या लक्षात घ्यायला हवी.

आसिन्धुसिन्धुपर्यन्ता यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्‍चैव स वै हिन्दुरिति स्मृत: ॥ 

– स्वातंत्र्यवीर सावरकर

अर्थ : सिंधू नदीपासून दक्षिण सिंधूपर्यंत (समुद्रापर्यंत) पसरलेल्या विशाल भूभागाला जो आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी समजतो, तो हिंदु होय.

इथे पितृभू म्हणजे पूर्वजांची भूमी आणि पुण्यभू म्हणजे पावन, पवित्र भूमी हे मानणे महत्त्वाचे आहे. पवित्र भूमीच्या अर्थामध्ये येथील प्राचीनत्व, इतिहास आणि परंपरा अंतर्भूत आहे, हे वेगळे सांगायला नको. यावरून यात कुणाचा समावेश होतो आणि कुणाचा नाही, ते सहजपणे लक्षात यावे.

वर नमूद केलेली सूत्रे शांतपणे विचार करून समजून घेतली, तर आल्या संकटाला कसे तोंड द्यायचे ?, याचा ऊहापोह करता येईल. अंदमानात असतांना सावरकर अनेक भाषांसह उर्दूसुद्धा शिकले आणि त्यातून काव्यही केले. त्यांच्या शब्दातच लेखाचा समारोप करत आहे.

हंता रावण का है, अपना राम वीरवर सेनानी ।
कर्मयोग का देव हैं स्वयं, कृष्ण सारथी अभिमानी ।
भारत तेरे रथ को सेना, कौन रोकने वाली हैं ।
फिर देर क्यों उठो भाई, हम ही हमारे वाली हैं ॥

– डॉ. सच्चिदानंद शेवडे, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते

(संदर्भ : नवस्नेह, दीपावली विशेषांक २०२०)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *