पोलिसांवर तलवारी उगारल्या ! • पोलिसांकडून बंदुका हिसकावण्याचा प्रयत्न ! • काही पोलीस घायाळ !
• बस आणि पोलीस यांच्या गाड्यांची तोडफोड ! • पोलिसांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न !
• लाल किल्ल्यावर खालसा पंथाचा झेंडा फडकावला !
देशाच्या राजधानीत आंदोलक शेतकरी हिंसाचार करेपर्यंत पोलीस आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा झोपली होती का ? शेतरकर्यांना रोखू न शकणारे पोलीस आतंकवादी आणि नक्षलवादी यांना कधी तरी रोखू शकतील का ?
अशा प्रकारे हिंसा करून सार्वजनिक संपत्तीची हानी केल्याच्या प्रकरणी आणि हिंसाचार्यांवर नियंत्रण न केल्याच्या प्रकरणी शेतकरी आणि पोलीस दोघांकडून हानी वसूल केली पाहिजे !
नवी देहली : २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी देहलीमध्ये आंदोलन करणार्या शेतकर्यांनी कृषी कायदे रहित करण्यासाठी सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या सीमांहून ट्रॅक्टर मोर्चा काढला होता; मात्र यात मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून हिंसाचार करण्यात आला. आयटीओ, लाल किल्ला, नांगलोई, सिंघू, टिकारी सीमा आणि इतर ठिकाणी या वेळी हिंसाचार झाला. यात दोघा शेतकर्यांचा मृत्यू झाला, तर १८ पोलीस घायाळ झाले. या वेळी या शेतकर्यांकडून पोलिसांवर तलवारी उगारण्यात आल्या. पोलिसांकडील बंदुका हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. बस आणि पोलीस यांच्या गाड्यांची तोडफोड करून त्या उलटण्यात आल्या. काही ठिकाणी पोलिसांवर शेतकर्यांकडून ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न झाला. (हे शेतकरी असू शकतात का ? अशा समाजविघातक घटकांवर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक) या वेळी या हिंसाचारी शेतकर्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. हे हिंसाचारी शेतकरी ट्रक्टर घेऊन लाल किल्ला परिसरात घुसले आणि त्यांनी ज्या ठिकाणावरून राष्ट्रध्वज फडकावला जातो, तेथे जाऊन खालसा पंथाचा झेंडा फडकावला. नंतर पोलिसांनी तो काढून टाकला. या घटनेच्या वेळी पोलीस मूकदर्शक होते. (अशा पोलिसांना बडतर्फ करा ! – संपादक) या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्रालयाची तातडीने बैठक आयोजित करण्यात आली.
१. पोलिसांनी शेतकर्यांना अनुमती देतांना सांगितले होते की, प्रजासत्ताकदिनाचे संचलन संपल्यानंतर १२ वाजता ट्रॅक्टर मोर्चा काढावा; मात्र शेतकर्यांना संचलन संपण्याआधीच मोर्चा काढला. बॅरिकेड (अडथळे) तोडून शेतकरी पुढे सरसावले आणि आता ते पोलिसांनी दिलेल्या मार्गावरूनही गेले नाहीत.
२. मुकरबा चौक येथे पोलीस आणि आंदोलक शेतकरी यांच्यामध्ये हिंसक चकमक झाली. पोलिसांनी येथे लावलेले बॅरिकेड्स (अडथळे) मोडून आत घुसण्याचा प्रयत्न करणार्या शेतकर्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या.
३. किसान मजदूर संघर्ष समितीमधील शेतकरी मुकरबा चौक येथे पोचले होते. तेथून ते कांजवाला येथे जाणे अपेक्षित होते; मात्र बॅरिकेड्स मोडून हे शेतकरी रिंग रोडच्या दिशेने गेले.
४. देहलीतील आयटीओ भागात हिंसाचार करणार्या शेतकरी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. शेतकर्यांच्या दगडफेकीत काही पोलीस घायाळ झाले.
५. अक्षरधाम मंदिराजवळ अडथळे हटवून आत घुसण्याचा प्रयत्न करणार्या शेतकर्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी पोलिसांवर तलवार उगारली.
६. शेतकर्यांच्या या हिंसाचारामुळे जीटीके रोड, आऊटर रिंग रोड, बादली रोड, केएन काटजू मार्ग, मधुबन चौक, कंजावाला रोड, पल्ला रोड, नरेला आदी अनेक ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झाली.
७. या हिंसाचारामुळे पोलिसांनी शहरातील इंटरनेट यंत्रणा काही काळासाठी बंद केली.
८. देहलीतील डीडीयू मार्गावर ट्रॅक्टर पलटी होऊन एका शेतकर्याचा मृत्यू झाला. देहली-हरियाणा सिंघू सीमेवर एका शेतकर्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेचे अन्वेषण करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
९. देहलीत ट्रॅक्टर घेऊन घुसलेले शेतकरी लाल किल्ल्याच्या परिसरात घुसले. तेथे त्यांनी स्वातंत्र्यदिनी फडकावण्यात येणार्या राष्ट्रध्वजाच्या स्तंभावर खालसा पंथाचा झेंडा फडकावला. येथे शेतकर्यांनी केलेल्या आक्रमणात काही पोलीस घायाळ झाले. त्यानंतर पोलिसांनी या हिंसाचारी शेतकर्यांना येथून पिटाळून लावले.
१०. सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर देहली पोलिसांनी राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर या मोर्च्याला अनुमती दिली होती. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून देहलीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ३ वेगवेगळ्या ठिकाणांहून मार्गक्रमण करणार्या मोर्च्यात ५ सहस्र ट्रॅक्टर आणि तेवढ्याच संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याची अनुमती पोलिसांनी दिली होती.
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक)
(म्हणे) ‘हिंसा करणारे घुसखोर होते !’ – ४० शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाचा दावा
- असे म्हणणे म्हणजे झालेल्या हिंसाचारापासून स्वतःचे हात झटकण्यासारखेच आहे ! पोलिसांनी या शेतकरी संघटनांच्या प्रमुखांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात टाकणे अपेक्षित आहे !
- जर एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात येणार होता, तर त्या संदर्भात सतर्कता का बाळगली नाही ? पोलिसांचे यासाठी साहाय्य का घेतले नाही ?
शेतकरी आंदोलकांनी हिंसा केल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने अधिकृत भूमिका घोषित केली आहे. यात म्हटले आहे की, आंदोलनामध्ये झालेल्या हिंसक घटनांचा विरोध करत आहे. या घटनांसाठी जे लोक उत्तरदायी आहेत त्यांचा संयुक्त किसान मोर्चाशी काहीही संबंध नाही.
आमच्या सर्व प्रयत्नांनंतरही काही संघटना आणि व्यक्ती यांनी नियोजित मार्गाचे आणि नियमांचे उल्लंघन केले अन् त्यांनी निंदनीय कृत्य केली. समाजकंटकांनी शांततापूर्ण आंदोलनामध्ये घुसखोरी केली. आम्ही नेहमीच हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे ठरवले आहे. शांतता आमची सर्वांत मोठी शक्ती आहे. कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करून आंदोलनाला हानी पोचू द्यायची नाही, असा आमचा हेतू आहे. आज नक्की काय काय घडले यासंदर्भातील माहिती आम्ही घेत आहोत. यासंदर्भात लवकरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.
संसदेवर १ फेब्रुवारीला मोर्चा
कृषी कायदे रहित करण्यासाठी १ फेब्रुवारी या दिवशी संसदेवर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य आणि क्रांतीकारी किसान युनियनचे अध्यक्ष दर्शनपाल यांनी दिली.
२९ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन प्रारंभ होत असून १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात