शालेय शिक्षणाशी संबंधित शैक्षणिक सूत्रांविषयी केंद्र आणि राज्य सरकारला साहाय्य अन् सल्ला देण्यासाठी, तसेच देशभर शिक्षणविषयक समान धोरण राबवले जाण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या एन्.सी.ई.आर्.टी. (राष्ट्रीय शिक्षण तथा प्रशिक्षण संस्था) या संस्थेवर स्थापनेपासूनच साम्यवाद्यांचा पगडा राहिला आहे. एन्.सी.ई.आर्.टी.ने बनवलेल्या पाठ्यपुस्तकांत आतापर्यंत शेकडो अक्षम्य चुका करण्यात आल्या आहेत. परकीय आक्रमकांचे उदात्तीकरण आणि हिंदु राजे-संस्कृती यांचे हनन या अलिखित धोरणानुसार जणू काही इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये लिखाण करण्यात येत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चार ओळींमध्ये मांडून संपवणे, त्यांचा एकेरी उल्लेख करणे, तर मोगल आक्रमकांचा इतिहास पाने भरून देणे, अत्याचारी अकबराचे उदात्तीकरण करून त्याची चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, संत ज्ञानेश्वर महाराजांचा जणेश्वर असा उल्लेख करणे, गुजरात दंगलीचा मुसलमानविरोधी दंगल असा उल्लेख करणे, जातीव्यवस्था आणि गोमांसभक्षण यांविषयीचे अयोग्य उल्लेख आदी कितीतरी घोडचुका एन्.सी.ई.आर्.टी.च्या पाठ्यपुस्तकांमध्ये करण्यात आल्या आहेत. आता त्यावर कडी करणारा संस्थेचा अक्षम्य हलगर्जीपणा समोर आला आहे. एन्.सी.ई.आर्.टी.ने क्रमिक पाठ्यपुस्तकांत जी माहिती छापली आहे, त्यामधील २ उल्लेखांविषयीचे पुरावे आणि कागदपत्रे माहिती अधिकारात मागवण्यात आली होती; पण त्याविषयीचे कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याचे एन्.सी.ई.आर्.टी.ने म्हटले आहे. कोणताही आधार नसलेले बिनबुडाचे लिखाण पाठ्यपुस्तकांत घुसडण्यात आले आहे, ते मोगल आक्रमकांचे महिमामंडन करणारे आहे.
१. इयत्ता बारावीच्या थीम्स ऑफ इंडियन हिस्टरी – पार्ट २ या पाठ्यपुस्तकात पान क्रमांक २३४ वर मोगल हिंदूंच्या मंदिरांची डागडुजी करत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे, बादशहा शहाजहान आणि औरंगजेब यांनी युद्धाच्या वेळी मोगल सैन्याकडून पाडण्यात आलेल्या मंदिरांची नंतर डागडुजी करण्यासाठी आर्थिक तरतूद करून ती केली.
२. इयत्ता सातवीच्या अवर पास्ट या पुस्तकात देहलीतील कुतुब मिनार ही वास्तू कुतुबुद्दीन ऐबक आणि इल्तुतमिश यांनी बांधल्याचे म्हटले आहे.
एन्.सी.ई.आर्.टी.चा पूर्वेतिहास पहाता माहिती अधिकारातून समोर आलेल्या चुका नवीन नसल्या, तरी त्या गंभीर आहेत. हे लिखाण मनमानीपणे लिहिले आहे, लिखाण पडताळण्याची व्यवस्था सदोष आहे, इतिहासाचे हिरवेकरण करून मोगलप्रेमी अजेंडा चालवण्याचा हा भाग आहे, असेच यातून ध्वनित होत नाही का ? चुकीचा इतिहास विद्यार्थ्यांच्या माथी मारून त्यांना म्हणजे देशाच्या भावी आधारस्तंभांना खिळखिळे करण्याची तर ही चाल नाही ना ? वास्तविक मोगलांचा इतिहासच मंदिरे उद्ध्वस्त करून त्यांची विटंबना करण्याचा राहिलेला आहे. धर्मांधांनी अनेक हिंदु शिल्पकला मुसलमानी ढाच्यामध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला आहे. हे लपवून किंबहुना धादांत खोटी माहिती शिकवणे म्हणजे परकियांचाच अजेंडा राबवणे आहे. याविषयी आताच आवाज उठवला नाही, तर उद्या भारताची शिल्पकला, मंदिरे ही मुसलमानांचीच देणगी आहे, असे म्हणायलाही ते कमी करणार नाहीत.
अशा घटना वारंवार घडण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे या संस्थेच्या स्थापनेपासूनच त्यामध्ये झालेला साम्यवाद्यांचा भरणा ! कोणत्याही साम्यवाद्याची भारतीय संस्कृती, धर्म-परंपरा, राष्ट्र यांच्याकडे पहाण्याची दृष्टी कलुषितच असते. अशा लोकांनी लिहिलेला इतिहास विद्यार्थ्यांवर थोपवला जात असेल, तर त्यातून राष्ट्रप्रेमी आणि धर्मनिष्ठ युवक घडणार कसे ? खरे तर सरकारकडून एन्.सी.ई.आर्.टी.च्या ऐतिहासिक घोडचुकांचे प्रमाण न्यून होईल आणि इतिहासाची भारताच्या दृष्टीने पुनर्मांडणी होईल, अशी अपेक्षा होती; पण तसे घडत असल्याचे दिसून येत नाही. उलट विद्यमान सरकारने जे नवे शैक्षणिक धोरण प्रस्तावित केले आहे, त्याचा अभ्यासक्रम बनवण्याचे काम एन्.सी.ई.आर्.टी.कडे सोपवण्यात आले आहे. त्यातून पुन्हा इतिहासाची विकृत मांडणी होणार नाही, याची शाश्वती काय ?
या विकृतीकरणाला प्रत्युत्तर द्यायचे असेल, तर राष्ट्रहिताचा दृष्टीकोन ठेवून इतिहासाची मांडणी करणार्या इतिहासकारांची पुस्तके एकाच व्यासपिठावर उपलब्ध व्हायला हवीत. पालकांनी त्यांच्या पाल्याला एन्.सी.ई.आर्.टी.च्या मंडळात घालणे टाळले पाहिजे, तसेच राष्ट्रप्रेम आणि शौर्याची भावना जागृत करणार्या देशप्रेमी लेखकांची पुस्तके विद्यार्थ्यांना वाचायला द्यायला हवीत. शिक्षणव्यवस्था राजकीय व्यवस्थेपासून दूर आणि स्वतंत्र ठेवायला हवी. पूर्वीच्या काळी राजे-महाराजांची मुले आचार्यांच्या गुरुकुलामध्ये शिकायला जायची; पण आचार्यांनी काय शिकवायचे ते राज्यसंस्था ठरवत नव्हती. अभ्यासक्रम आणि परीक्षा यांचे सर्वाधिकार आचार्यांकडे असायचे. त्याप्रमाणे शिक्षणव्यवस्थेची सूत्रे समाजातील विद्वानांकडे जायला हवीत. शौर्याचा इतिहासच उज्ज्वल भविष्य घडवण्याची प्रेरणा देतो; मात्र इतिहासामध्येच भेसळ झाली, तर शुद्ध देशभक्ती कशी निर्माण होणार ?
इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात घडलेल्या घटनांची मांडणी नसते, तर त्यातून एक दृष्टीकोन-संस्कार द्यायचा असतो. रामायणाची मांडणी कोणी अयोध्येऐवजी लंकेला केंद्रस्थानी ठेवून केली, तर त्याने रामासारखी माणसे घडतील कि रावणासारखी ? त्यामुळे इतिहास लिहितांना लेखकाला यथार्थ दृष्टी असणे आवश्यक आहे. तिचा अभाव असल्याने पाठ्यपुस्तकांमधून पराक्रमी हिंदु राजांचे शौर्य झाकोळले जात आहे, तर परकीय आक्रमकांचा कपटीपणा हा चांगुलपणा म्हणून दर्शवला जात आहे. अशा प्रकारे विकृत इतिहास लिहिणारी एन्.सी.ई.आर्.टी. इतिहासजमा का करू नये, हा प्रश्न आहे.
– सौ. गौरी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात