कळसूत्री बाहुली लोककला जोपासणारे पद्मश्री पुरस्कारप्राप्त परशुराम गंगावणे यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने त्यांची भेट घेऊन अभिनंदन !
कुडाळ : कलेचा वापर भारतमाता आणि हिंदूंच्या देवता यांच्या विटंबनेसाठी करणे अयोग्य आहे. अशांवर कायदेशीर कारवाईच नाही, तर त्यांना हद्दपारच केले पाहिजे, असे प्रतिपादन नुकताच पद्मश्री पुरस्कार घोषित झालेले पिंगुळी येथील ठाकर आदिवासी कलांगणचे श्री. परशुराम गंगावणे यांनी केले. भारत सरकारचा कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार ठाकर आदिवासी कला आंगणचे श्री. परशुराम गंगावणे यांना ते ठाकर समाजाची कळसूत्री बाहुली यांसारख्या लोककलेचे जतन, प्रचार आणि प्रसार करत असल्याने नुकताच घोषित झाला. यानंतर सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने त्यांची त्यांच्या पिंगुळी गुढीपूर येथील निवासस्थानी भेट घेऊन विशेष अभिनंदन करण्यात आले.
या वेळी सनातन संस्थेचे संजोग साळसकर यांनी श्री. परशुराम गंगावणे यांच्याशी संवाद साधला. या वेळी श्री. साळसकर म्हणाले, कला ही ईश्वरप्राप्तीचेही एक साधन आहे. कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती कशी करता येऊ शकते, यासाठी सनातनने संशोधन केले असून याचा लाभ अनेक जण करून घेत आहेत; मात्र एम्.एफ्. हुसेन यांच्यासारखे कलाकार भारतमातेचे आणि असंख्य हिंदूचे श्रद्धास्थान असलेल्या देवता यांची अश्लील चित्रे रेखाटत आहेत. या माध्यमातून ते कलेचाही अनादर करत आहेत. आपल्यासारख्यांच्या माध्यमातून अनेक कला या क्षेत्रात घडत आहेत, इतरांनाही घडवत आहेत. अशा स्थितीत देवतांची अश्लील चित्रे रेखाटणार्या कलाकारांचीही पिढी निर्माण होत आहे. अशा कलाकारांना तेवढ्याच पातळीवर हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या माध्यमातून विरोध चालू आहे. अशांच्या विरोधात गुन्हा नोंद करणेही आम्ही चालू केले आहे. एम्.एफ्. हुसेन यांच्यावर अनेक गुन्हे प्रविष्ट करून त्याला देश सोडून जाण्यास भाग पाडण्याएवढे कार्य हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी केले आहे. सद्यःस्थितीत तांडव वेब सिरीज, आश्रम वेब सिरीज यांच्या माध्यमातून हिंदु धर्म नष्ट करण्यासाठी हे लोक उठलेले आहेत.
याविषयी श्री. गंगावणे म्हणाले, जे आपले मूळ आहे, त्याविषयी जर कलेच्या माध्यमातून असे कोण करत असेल, तर अशांवर गुन्हा प्रविष्ट झालाच पाहिजे. त्यांना सोडूच नये आणि त्यासाठी असे कार्य केलेच पाहिजे. त्यांच्या चित्रकथांमध्ये विष्णुपुराण, तसेच रामायण आणि महाभारत यांमधील अनेक विषयांचा समावेश करण्यात आला असल्याचे श्री. गंगावणे यांनी सांगितले.
श्री. परशुराम गंगावण यांना सनातनचा सात्त्विक रांगोळी कशी काढावी ?, हा लघुग्रंथ भेट !
या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सनातनचा सात्त्विक रांगोळी कशी काढावी ?, हा लघुग्रंथ श्री. परशुराम गंगावणे यांना भेट देण्यात आला, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ६ फेब्रुवारीला सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन हिंदु राष्ट्र जागृती सभेचे निमंत्रणही श्री. गंगावणे यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संदीप चिऊलकर, श्री. परशुराम धामनेकर आदी उपस्थित होते.