देशाची राजधानी नवी देहलीतील लुटियन्स या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असणार्या भागातील इस्रायलच्या दूतावासाजवळ अल्प क्षमतेचा एक बॉम्बस्फोट झाला. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी ३ वाहनांच्या काचा मात्र फुटल्या. भारतीय अन्वेषण यंत्रणा हा स्फोट कोणी केला, याचा शोध घेत आहेत. येथील सीसीटीव्हीचे चित्रीकरण धुंडाळले जात आहे. घटनेच्या वेळी येथे कोण आले होते, हे शोधले जात आहे. ‘हा स्फोट कुणाला हानी पोचवण्यासाठी नव्हता, तर एक चेतावणी देण्यासाठी होता’, असे घटनास्थळी सापडलेल्या एका चिठ्ठीतून समोर आले आहे. यात म्हटले आहे, ‘इराण रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’चे प्रमुख कासिम सुलेमानी आणि इराणचे शास्त्रज्ञ मोहसीन फखरीजादेह यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी हा स्फोट घडवण्यात आला आहे.’ या चिठ्ठीत ‘हा ट्रेलर आहे’, अशी धमकीही देण्यात आली आहे. या स्फोटामागे इराणचा हात आहे, हे यातून स्पष्ट होते. इराणी सैन्याचे प्रमुख सुलेमानी यांना अमेरिकेने ड्रोन आक्रमणाद्वारे दीड वर्षांपूर्वी ठार केले होते, तर मोहसीन यांना काही मासांपूर्वी इस्रायलने गोपनीय पद्धतीने ठार केल्याचा आरोप आहे. मोहसीन हे इराणसाठी अणूबॉम्ब बनवण्याच्या प्रयत्नात होते, यामुळे इस्रायलने त्यांचा काटा काढला, तर सुलेमानी यांनी अमेरिकेच्या एका क्षेत्रावर आक्रमण केल्याने त्यांना ठार करण्यात आले. सुलेमानी यांच्या हत्येचा सूड उगवण्याचा इराण प्रयत्न करत असला, तरी त्याच्या सैन्यक्षमतेची अमेरिकेसमोरील मर्यादा पहाता त्याला काही करता आलेले नाही. पुढे तो काही करू शकेल, हे सांगता येत नाही. इराण आणि इस्रायल यांचे शत्रुत्व इस्लाममुळे आहे. इस्रायलच्या शेजारी असणार्या इस्लामी देशांपासून इस्रायलला धोका असल्याने तो या देशांच्या सैन्यक्षमतेचा विकास होणार नाही, यासाठी प्रयत्नरत असतो. जर इराणने अणूबॉम्ब बनवला तर तो इस्रायलसाठी सर्वांत मोठा धोका ठरू शकत असल्यानेच इस्रायलने इराणच्या शास्त्रज्ञाला ठार केले; मात्र हे कुठेही अधिकृतपणे उघड झाले नाही. इराण या हत्येचाही अपेक्षित असा सूड घेऊ शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर देहलीतील इस्रायलच्या दूतावासाबाहेर करण्यात आलेला हा स्फोट फुटकळच म्हणावा लागेल. ‘यातून केवळ एक सनसनाटी निर्माण करण्याचा उद्देश असू शकतो’, असेच म्हणावे लागेल. इराणला खरेच अमेरिका आणि इस्रायल यांचा सूड घ्यायचा असेल, तर तो त्या क्षमतेनेच घ्यावा लागेल. असे फुटकळ स्फोट घडवून काहीही साध्य होऊ शकत नाही. अमेरिका आणि इस्रायल सतर्कता बाळगतील; मात्र अशा स्फोटांना विशेष किंमत देणार नाहीत किंवा इराणवर पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचाही ते प्रयत्न करू शकतील, जेणेकरून इराणने सूड घेण्याचा विचारच करू नये. त्यातही जर इराणने खरेच मोठा घातपात घडवून आणलाच, तर इराणला ते महागात पडू शकते, हे वेगळे सांगायला नको. आधीच अमेरिकेने इराणवर अनेक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे त्याची कोंडी झालेली आहे. अशा वेळी अमेरिका आणि इस्रायल यांनी एकाच वेळी सैनिकी कारवाई केली, तर त्याचे कंबरडे मोडले जाईल. देहलीतील या स्फोटांवर अद्याप या दोन्ही देशांकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
अधिक कठोर सुरक्षा हवी !
ज्या दिवशी आणि ज्या वेळी हा बॉम्बस्फोट झाला, त्या वेळी घटनास्थळापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असणार्या विजय चौकात प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने सैन्यादलांच्या बँड पथकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, अन्य केंद्रीय मंत्री मान्यवर आदी, तसेच मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. यावरून राजधानी देहलीतील सुरक्षाव्यवस्था किती तकलादू आहे, हे पुन्हा एकदा उघड झाले. जर स्फोट करणार्यांना हानी पोचवायची असती, तर त्यांना विजय चौकात स्फोट घडवून हानी पोचवता आली असती, हे यातून लक्षात येते. यापूर्वी वर्ष २०१२ मध्येही इस्रायलच्या दूतावासातील अधिकार्यांच्या पत्नीच्या गाडीवर बॉम्ब चिटकवून त्याचा स्फोट घडवून आणण्यात आला होता. हा स्फोट पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या जवळ झाला होता. या प्रकरणी इराणचा हात असल्याचेही नंतर उघड झाले होते. आताही घटनास्थळापासून अडीच किमी अंतरावर पंतप्रधानांचे निवासस्थान आहे. याचा अर्थ देहलीमध्ये पूर्वी आणि आताही घातपात करणार्यांना घातपात करायचा असेल, तर ते कधीही करू शकतात, हेच लक्षात येते. प्रजासत्ताकदिनानिमित्त राजधानीत मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था असतांना अशी घटना घडते आणि ती घडवणारे सहजपणे पसार होतात, हे भारताला लज्जास्पद आहे. मागील स्फोटातील आरोपी आणि सूत्रधार भारताला सापडू शकले नव्हते, आताच्या स्फोटातील आरोपी सापडतील का, हे पहावे लागेल. यातून लक्षात येते की, भारतात अन्य देशातील लोकांना घातपात घडवून पसार व्हायचे असेल, तर ते सहजपणे कार्य करू शकतात, असा अर्थ होतो. भारत किती असुरक्षित देश आहे, हे यामुळे जागतिक स्तरावर पाहिले जाईल. लुटियन्स हा भाग सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. ते पहाता येथील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक असण्याची अपेक्षा आहे. या घटनेनंतर तरी सरकार याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देईल, आणि भविष्यात अशी घटना घडणार नाही, अशी अपेक्षा करावी लागेल. आताचा स्फोट करणार्यांनी हा ट्रेलर असल्याचे म्हटले असल्याने ते मोठा स्फोट घडवून आणतील, अशी शक्यता धरून उपाययोजना काढण्यासह आरोपींचा शोध घ्यावा लागेल. आरोपींचा शोध लागल्यावर त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणेही तितकेच आवश्यक असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्ष २०१४ मध्ये पहिल्यांदा सरकार आल्यापासून देशात काश्मीरवगळता देशात कुठेही बॉम्बस्फोटाची किंवा आतंकवादी आक्रमणाची घटना घडलेली नाही. काँग्रेसच्या काळाच्या तुलनेत या सरकारच्या काळात घातपाती कारवायांवर लगाम लावण्यात आला आहे, हे नाकारता येणार नाही. या पार्श्वभूमीवर आताच्या झालेल्या स्फोटाकडे सरकार गांभीर्याने लक्ष देईल आणि ते करणार्यांची पाळेमुळे खणून काढील, हीच अपेक्षा !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात