नवी देहली : येथील इस्रायलच्या दूतावासाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटासाठी ‘पी.ई.टी.एन्.’ प्रकारची स्फोटके वापरण्यात आल्याचे सुरक्षादलातील सूत्रांनी सांगितले. ही स्फोटके सैन्याकडून वापरली जाणारी स्फोटके आहेत. ही स्फोटक सहज उपलब्ध होत नाहीत. यापूर्वी अल् कायदासारख्या आतंकवादी संघटनांनी बॉम्ब बनवण्यासाठी या स्फोटकांचा वापर केला होता.
(सौजन्य : India Today)
अन्वेषण यंत्रणांना घटनास्थळावरून ९ वोल्ट बॅटरीचे काही अवशेषही सापडले आहेत. याआधी इंडियन मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनांनी बॉम्ब बनवण्यासाठी अशा प्रकारच्या बॅटरीचे वापर केला होता, असे सूत्रांनी सांगितले. इंडियन मुजाहिदीनचे आतंकवादी बॉम्ब बनवण्यासाठी सहजतेने उपलब्ध होणार्या अमोनियम नायट्रेटचा वापर करायचे.
पॅरिसमध्येही इस्रायल दूतावासाजवळ बॉम्ब सापडला
देहलीमध्ये ज्या दिवशी इस्रायलच्या दूतावासाजवळ बॉम्बस्फोट झाला, त्या दिवशी काही घंट्यांनंतर पॅरिसमध्ये इस्रायली दूतावासाजवळ ठेवण्यात आलेला बॉम्ब सापडला. त्यामुळे देहलीतील स्फोट हा आंतरराष्ट्रीय कटाचा एक भाग असू शकतो, त्या अंगाने अन्वेषण चालू आहे.
(सौजन्य : News Nation)
वर्ष २०१२ मध्ये देहलीतील इस्रायलच्या राजनैतिक अधिकार्याच्या चारचाकी वाहनावर बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. त्याच दिवशी जॉर्जियामध्ये इस्रायली दूतावासाजवळ पार्क केलेल्या गाडीमध्ये बॉम्ब सापडला होता. थायलंडमध्येही इस्रायली दूतावासाजवळ आक्रमण झाले होते. या तिन्ही आक्रमणांमागे इराणचा हात असल्याचा संशय होता. आताही देहलीतील स्फोटाच्या मागे इराणचा हात असल्याचे समोर येत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात