प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘बलसागर भारत होवो’ या विषयावर ऑनलाईन शौर्य जागृती व्याख्यान
पुणे : भारतमातेला ‘इंडिया’ हे इंग्रजांनी दिलेले नाव नव्हे, तर भारत अर्थात ‘तेजाच्या उपासनेत मग्न’ असा अर्थ असलेले नावच आपल्या राष्ट्राला शोभते. ‘८४ लक्ष योनींतून गेल्यानंतर हिंदु धर्मात जन्म मिळतो’, असे म्हणतात. भारतात, हिंदु संस्कृतीत जन्म घेणे हे आपले अहोभाग्य आहे. भारतीय सैनिक कडाक्याच्या थंडीत उभे राहून भारतीय सीमेचे रक्षण करत असतात, याचा आपल्याला अभिमान असायला हवा. मातृभूमीसाठी संकल्पाचा दिवस म्हणजे प्रजासत्ताकदिन आहे. प्रजासत्ताकदिनी हिंदु प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘शौर्य जागरण शिबिरा’मध्ये ते बोलत होते. या व्याख्यानाला पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अकलूज, मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांतून पुष्कळ धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी श्री. सुमित सागवेकर यांनी सांगितलेल्या विषयातून प्रेरणा घेऊन सर्व धर्मप्रेमींनी राष्ट्र-धर्म कार्यासाठी कृतीच्या स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या ऑनलाईन कार्यक्रमात प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. या प्रात्यक्षिकांनाही उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
श्री. सुमित सागवेकर पुढे म्हणाले की,
१. आम्ही दिवे विझवत नाही, आम्ही दिवे लावतो. आमचा दिवस ब्राह्ममुहूर्ताला चालू होतो. तेजाची उपासना करणारा देश हे भारताच्या नावावरूनच स्पष्ट होते. भारताची खरी ओळख त्याच्या नावातून होते.
२. आज आमच्या देशात स्वामी विवेकानंदांचा पुतळा तोडला जातो. पुण्यात दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवला जातो. ही परिस्थिती पालटण्यासाठी आपल्याला कार्य करायला हवे.
३. हिंदु गणेशोत्सव साजरा करतात, मंत्रपुष्पांजली म्हणतात आणि ‘आमचे राज्य कल्याणकारी, आसक्तीरहित असावे, क्षितिजाच्या पर्यंत सुरक्षित असावे’, अशी प्रार्थना करतात.