Menu Close

केंद्र सरकारने पुढाकार घेऊन राष्ट्र-धर्मविरोधकांवर कठोर कारवाई करावी ! – पायल रोहतगी

‘चर्चा हिंदु राष्ट्र्राची !’ या विशेष संवादांतर्गत ‘ईशनिंदाविरोधी कायद्याची मागणी का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ परिसंवाद

पुणे – हिंदु धर्माच्या विरोधात निश्‍चितच मोठे षड्यंत्र कार्यरत आहे. हिंदु सनातन धर्म अतिशय पुरातन असून त्याला मानणारे लोक बहुसंख्य आहेत. हे काही धर्मविरोधकांना रूचत नसल्याने हिंदु धर्म संपुष्टात आणण्यासाठी चित्रपट आणि वेब सिरीज यांच्या माध्यमांतून हिंदूंच्या मनावर आघात करून त्यांच्या मनात हिंदु धर्माविषयी वाईट प्रतिमा निर्माण केली जात आहे. ‘तांडव’ वेब सिरीजच्या माध्यमातूनही असाच प्रकार झाला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत प्रसिद्धी मिळवण्यासाठी, तसेच स्वतःची कारकीर्द पुढे नेण्यासाठी काही जण अशा गोष्टी करत आहेत. अशा प्रत्येक व्यक्तीला विरोध करायला हवा. केंद्र सरकारकडे बहुमत आहे. त्यांनी पुढाकार घेऊन अशा राष्ट्र-धर्मविरोधकांवर कठोर कारवाई करावी, तसेच स्वतःच्या ‘करिअर’साठी किंवा ‘फॅशन’साठी हिंदु देवतांची खिल्ली उडवणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन अभिनेत्री पायल रोहतगी यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘चर्चा हिंदु राष्ट्राची !’ या विशेष संवादामध्ये ‘ईशनिंदाविरोधी कायद्याची मागणी का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्या बोलत होत्या.

या ‘ऑनलाईन’ चर्चासत्रामध्ये ‘हिंदु आयटी सेल’चे संस्थापक श्री. रमेश सोलंकी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते. या परिसंवादाच्या प्रारंभी चित्रपट, मालिका, वेब सिरीज या माध्यमांतून हिंदु धर्म आणि समाज यांची कशा प्रकारे पद्धतशीरपणे अपकीर्ती करण्यात येत आहे, हे सांगणारी चित्रफीत दाखवण्यात आली. यू ट्यूब, फेसबूक आणि ट्विटर या माध्यमांतून प्रसारित झालेला हा कार्यक्रम ६१ सहस्रांहून अधिक जणांनी पाहिला.

अभिनेत्री पायल रोहतगी पुढे म्हणाल्या की…

१. मी केलेल्या एका वक्तव्यावरून मला कारागृहात पाठवण्यात आले. मी शब्द मागे घेऊनही मला जामीन देण्यात आला नाही. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य सीमित आहे’, असे मला सांगण्यात आले. मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे बंधन राष्ट्र-धर्मविरोधकांना का नाही ? या लोकांनाही कारागृहात पाठवायला हवे.

२. ब्रिटीश सैन्यात जसे भारतातील लोक क्रांतीकारकांच्या विरोधात लढत होते, तसेच आज या ‘ओटीटी’ माध्यमांतून भारतातील लोक देशविरोधी विचारसरणी पेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

३. ‘अ‍ॅमेझॉन प्राईम इंडिया’च्या ‘कन्टेन्ट’ विभागाच्या मुख्य अपर्णा पुरोहित यांची सरकारविरोधी विचारसरणी असल्याने त्या सातत्याने अशा वेब सिरीजला चालना देण्याचे कार्य करत आहेत.

४. सनी लिओनीसारख्या अभिनेत्रींना हिंदी चित्रपटसृष्टीत आणले जाते आणि कामही दिले जाते.

५. ओटीटी माध्यमांवरही अश्‍लील गोष्टी दाखवण्यात येत आहेत. त्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे खच्चीकरण करण्याचे षड्यंत्र चालू आहे. हे रोखण्यासाठी एकत्र यायला हवे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे नीती वापरून कार्य करायला हवे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

१. मुसलमान नागरिकांनी पाकिस्तानमध्ये अनेक आंदोलने केली आणि त्यानंतर ‘कलम २९५ अ’ अस्तित्वात आले. ‘ब्रिटिशांनी आणलेल्या या कलमाच्या अंतर्गत जर प्रथम नोंदणी अहवाल प्रविष्ट झाला, तर न्यायालयात जाण्याआधी शासनाची अनुमती घ्यावी लागते’, असे कायद्याचे स्वरूप आहे.

२. देवतांची विटंबना हा वैचारिक आतंकवादाचा भाग असून आपण त्याचे बळी आहोत. हिंदुद्वेष्टे चित्रकार एम्.एफ्. हुसेनच्या संदर्भात हिंदूंनी १ सहस्र २०० हून अधिक तक्रारी केल्या; पण त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे ते देश सोडून पळून गेले.

३. डॉ. झाकीर नाईक याने श्री गणेशाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात देशभरातून अनेक तक्रारी झाल्या. त्यानंतर झाकीर नाईक यांचे कार्यक्रम रहित झाले. त्यांना अनेक ठिकाणी अटकपूर्व जामीन घ्यावा लागला. ३० हून अधिक ठिकाणी झालेल्या तक्रारींच्या निवारणासाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागले आणि शेवटी त्यालाही देश सोडून पळून जावे लागले.

४. आपण हिंदूंनी आघातांविरोधात ठामपणे उभे राहायला हवे. ‘सेन्सॉर बोर्ड’मध्ये पालट आणण्यासाठी मोठी आंदोलने व्हायला हवीत.कायदा सर्वांसाठी समान असायला हवा. असा कायदा आल्यास याचा अपलाभ कोण घेऊ शकतो, हे आपल्याला ठाऊक आहे.

५. हे लक्षात ठेवून जागृती व्हायला हवी. ‘केवळ २९५ अ’ अंतर्गत तक्रार करणे एवढ्यावर न थांबता एखाद्या ओटीटी माध्यमाला कुठून अनुदान मिळत आहे, यांसारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून पूर्ण अभ्यासाने लढायला हवे. सध्या उपलब्ध असलेल्या कायदेशीर साधनांचा योग्य वापर करून हिंदुद्वेषाला आळा घातला गेला पाहिजे.

६. सध्या जागृत हिंदू अल्पसंख्यांक झाला आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची नीती वापरूनच आपल्याला कार्य करायला हवे. अहंकार अल्प झाल्यावर भक्ती वाढेल, तसेच शक्तीही वाढेल. त्यामुळे हिंदूंनी ईश्‍वराची कृपा संपादन करून संघटित होऊन कार्य करणे, हीच काळाची आवश्यकता आहे.

राष्ट्र-धर्मविरोधकांना वैध मार्गाने निश्‍चित सुधारू ! – रमेश सोलंकी

१. हिंदूंचे खच्चीकरण करण्यासाठी वेब सिरीजची निर्मिती केली जात आहे. या वेब सिरीज सनातन धर्माविषयी नकारात्मक प्रतिमा निर्माण करून हिंदूंची विचारसरणी पालटण्याचे एकमेव कार्य करत आहेत.

२. श्रीकृष्णाने शिशुपालाच्या १०० व्या अपराधानंतर त्याचा वध केला होता. हिंदूंचा इतिहास गौरवशाली असल्याने हिंदू भित्रे नाहीत. ते सातत्याने शांतपणे या सर्व घटनांचा विरोध करतात.

३. हिंदु आयटी सेलद्वारे आम्ही तक्रार करण्यास चालू केले. या माध्यमातून मोठे संघटन झाले. ४० ते ५० तक्रारींमध्ये काही तक्रारींचे प्रथमदर्शी अहवाल नोंदवले जातात. त्यातून ज्याने हिंदूंच्या देवतांची विटंबना केली, त्याला कायदेशीर शिक्षा होते. तक्रार केल्यानंतर मात्र पोलिसांकडून टाळाटाळ केली जाते.

४. हिंदूंचा अवमान करण्यामागे मोठे आर्थिक अनुदानही दिले जात आहे. अनेक प्रयत्नांतून ‘ओटीटी’ माध्यमांना सरकाराधीन करण्यात आले; परंतु त्यानंतर पडताळणीसाठी कार्यकारिणी स्थापन झालेली नाही.

५. आता हिंदू जागृत होत आहेत. जेव्हा जेव्हा हिंदूंचा छळ झाला, त्यानंतर हिंदूंनी इतिहास रचला आहे. हिंदू अतिशय सहिष्णू आहेत. यासाठी या सर्व गोष्टींना शासनाने बंधने घालायला हवीत. धर्मविरोधकांनो, स्वतःला सुधारा नाही, तर आम्ही वैध मार्गाने लढा देऊन तुम्हाला निश्‍चित सुधारू.

हिंदूंनी एकत्र लढल्यास निश्‍चितच आपला विजय होणार ! – रमेश सोलंकी

‘नेटफ्लिक्स’च्या विरोधात मी याआधी तक्रार केली होती. त्यानंतर हिंदु जनजागृती समिती माझ्या समवेत उभी राहिली. मी तक्रार मागे घेतली नाही. दुसर्‍याच दिवशी ट्विटरवर ‘नेटफ्लिक्स’वर बंदी आणण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्यामुळे या सर्व आंदोलनाला विदेशातील वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांनी प्रसिद्धी दिली. हिंदूंनी एकत्र लढल्यास निश्‍चितच आपला विजय होणार आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *